Keralam : शपथविधीनंतर मुख्यमंत्री सतीशन यांनी तातडीने घेतली पहिली मंत्रिमंडळ बैठक; ‘या’ आश्वासनांच्या अंमलबजावणीची घोषणा
Keralam : शपथविधी सोहळ्यास काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, प्रियंका गांधी, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार, तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी आदी मान्यवर उपस्थित होते.

Keralam : व्ही. डी. सतीशन यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसप्रणीत संयुक्त लोकशाही आघाडी (यूडीएफ) सरकारने सोमवारी केरळमध्ये सत्तेची सूत्रे हाती घेतली. राजधानी तिरुअनंतपुरम येथील सेंट्रल स्टेडियमवर झालेल्या भव्य शपथविधी सोहळ्यात सतीशन यांनी राज्याचे १३ वे मुख्यमंत्री म्हणून पद व गोपनीयतेची शपथ घेतली. तब्बल दहा वर्षांनंतर केरळमध्ये यूडीएफची सत्ता परतली आहे.
मुख्यमंत्री सतीशन यांनी शपथविधीनंतर तातडीने पहिली मंत्रिमंडळ बैठक घेत निवडणूक जाहीरनाम्यातील महत्त्वाच्या आश्वासनांच्या अंमलबजावणीची घोषणा केली. महिलांना १५ जूनपासून केरळ राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (केएसआरटीसी) बसमध्ये मोफत प्रवासाची सुविधा दिली जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्याचाही निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
हेही वाचा – राष्ट्रवादीचे 40 नेते भाजपमध्ये प्रवेश करणार? यादी तयार? राज्यात खळबळ
१४० सदस्यीय केरळ विधानसभेच्या निवडणुकीत यूडीएफने १०२ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले. डाव्या लोकशाही आघाडीला (एलडीएफ) ३५, तर भाजपला ३ जागांवर समाधान मानावे लागले.
२१ सदस्यीय मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी –
मुख्यमंत्री सतीशन यांच्यासह २० मंत्र्यांनी शपथ घेतली. यामध्ये १४ प्रथमच मंत्री बनले असून दोन महिला आणि अनुसूचित जातीतील दोन प्रतिनिधींना स्थान देण्यात आले आहे. काँग्रेसचे ११, इंडियन युनियन मुस्लिम लीगचे (आययूएमएल) ५, तर केरळ काँग्रेस (जोसेफ), केरळ काँग्रेस (जेकब), रिव्होल्युशनरी सोशलिस्ट पार्टी (आरएसपी) आणि कम्युनिस्ट मार्क्सिस्ट पार्टी (सीएमपी) यांना प्रत्येकी एक मंत्रिपद देण्यात आले.
यूडीएफने वरिष्ठ आमदार तिरुवांचूर राधाकृष्णन यांची विधानसभा अध्यक्षपदी, तर शानीमोल उस्मान यांची उपाध्यक्षपदी निवड जाहीर केली आहे.
पाच हमी योजनांची अंमलबजावणी –
ज्येष्ठ काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांनी राहुल गांधी यांनी प्रचारादरम्यान दिलेल्या पाच हमी योजनांची अंमलबजावणी केली जाईल, असे स्पष्ट केले. यामध्ये महिलांसाठी मोफत बसप्रवास, महाविद्यालयीन विद्यार्थिनींना दरमहा एक हजार रुपये, सामाजिक सुरक्षा पेन्शन तीन हजार रुपये, प्रत्येक कुटुंबासाठी २५ लाख रुपयांचे ‘ऊम्मन चांडी हेल्थ इन्शुरन्स’ आणि लघुउद्योगांसाठी पाच लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्जाचा समावेश आहे.
विरोधी पक्षनेते ते मुख्यमंत्री –
सलग सहाव्यांदा पारावूर मतदारसंघातून निवडून आलेले सतीशन यांनी यापूर्वी पाच वर्षे विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून काम केले होते. आता त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी आणि माजी मुख्यमंत्री पिनराई विजयन विरोधी पक्षनेते म्हणून सभागृहात दिसणार आहेत.
शपथविधी सोहळ्यास काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, प्रियंका गांधी, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार, तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी आदी मान्यवर उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सतीशन यांचे अभिनंदन करत केंद्र सरकारकडून सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन दिले.





