ZP Election 2026: परभणी जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालांनी जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे. भाजपचे दिग्गज नेते आणि माजी मंत्री सुरेश वरपुडकर यांच्या कुटुंबाला मतदारांनी जोरदार धक्का दिला असून, रिंगणात उतरलेल्या ५ सदस्यांपैकी तब्बल ४ जणांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. मतदारांनी या निवडणुकीत ‘घराणेशाही’ स्पष्टपणे नाकारल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. वरपुडकर यांच्या बालेकिल्ल्याला खिंडार – या निवडणुकीत वरपुडकर कुटुंबाचे वर्चस्व सिद्ध करण्यासाठी ५ सदस्य रिंगणात होते. मात्र, एका पाठोपाठ एक निकाल जाहीर होताच वरपुडकर समर्थकांमध्ये शांतता पसरली. झरी जिल्हा परिषद गटातून ठाकरे गटाच्या उमेदवार म्हणून निवडणूक लढवणाऱ्या मुलगी सोनल देशमुख यांचा भाजपचे उमेदवार दिलीप देशमुख यांनी पराभव केला. शिंगणापूर गटातून नशीब आजमावणारे चिरंजीव समशेर वरपुडकर यांना ठाकरे गटाचे पांडुरंग खिल्लारे यांनी पराभूत केले. तसेच सून प्रेरणा वरपुडकर यांनाही पराभवाचा धक्का लागला. दैठणा गटात काँग्रेसच्या ज्योत्स्ना गणेश घाडगे यांनी प्रेरणा वरपुडकर यांचा पराभव करत विजय मिळवला. हेही वाचा – Zilla Parishad Election Result 2026 : सोशल मीडियावर बोलबाला पण निवडणुकीत पराभव; निर्मला नवलेंना मतदारांनी नाकारले पुतण्यांमधील लढतीत घरातीलच एकाचा विजय- लोहगाव जिल्हा परिषद गटात वरपुडकर कुटुंबातील दोन पुतणे आमनेसामने ठाकले होते. यात काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या अजित वरपुडकर यांनी भाजपचे उमेदवार ऐश्वर्य वरपुडकर यांचा पराभव केला. कुटुंबातील ५ उमेदवारांपैकी केवळ अजित वरपुडकर यांनाच विजयाची चव चाखता आली आहे. घराणेशाहीला मतदारांचा ‘रामराम’ – नांदेड महापालिका आणि बदलापूर नगरपरिषदेनंतर आता जिल्हा परिषदेतही मोठ्या नेत्यांच्या नातेवाईकांना मतदारांनी नाकारले आहे. परभणीतील हा निकाल आगामी राजकीय गणितांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.