Yuvraj Singh Revealed about MS Dhoni and Abhishek Sharma : भारतीय क्रिकेटचा ‘सिक्सर किंग’ युवराज सिंगने आपल्या आंतरराष्ट्रीय निवृत्तीबाबत अनेक वर्षांनंतर मौन सोडले आहे. माजी टेनिस स्टार सानिया मिर्झाच्या ‘सर्विंग इट अप विथ सानिया’ या चॅट शोमध्ये बोलताना युवीने निवृत्तीच्या वेळी त्याला मिळणाऱ्या वागणुकीबद्दल आणि महेंद्रसिंग धोनीने त्याला दिलेल्या स्पष्ट संदेशाबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे. जेव्हा खेळातील आनंद आणि सन्मान संपला… युवराजने सांगितले की, कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यावर त्याला क्रिकेट खेळण्यात पूर्वीसारखा आनंद मिळत नव्हता. “मला असं वाटू लागलं होतं की मला जो सन्मान मिळायला हवा, तो मिळत नाहीये. जेव्हा मला जाणीव झाली की मी आता संघासाठी पूर्वीसारखं योगदान देऊ शकत नाही, तेव्हा मी थांबण्याचा निर्णय घेतला,” असे युवराज म्हणाला. निवृत्तीपूर्वीचा काळ त्याच्यासाठी मानसिकदृष्ट्या खूप कठीण होता. धोनीचं ‘ते’ स्पष्ट बोलणं आणि निवृत्तीचा निर्णय – युवराज सिंगचा त्याच्या निवृत्तीबद्दल खुलासा युवराजने निवृत्तीशी संबंधित एक महत्त्वाचा प्रसंग शेअर केला. तो म्हणाला, “एक वेळ अशी आली होती जेव्हा महेंद्रसिंग धोनीने मला स्पष्टपणे सांगितले होते की, मी आता भारतीय संघाच्या भविष्यातील नियोजनाचा भाग नाहीये.” धोनीच्या या विधानानंतर आणि स्वतःच्या ढासळत्या फॉर्ममुळे युवीला आपले करिअर ओझे वाटू लागले होते. अखेर २०१९ मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय घेतला. अभिषेक शर्मा: ४ वर्षे ३ महिन्यांची तपश्चर्या! या संवादात युवराजने आपला लाडका शिष्य अभिषेक शर्मा याच्यावरही भाष्य केले. अभिषेकच्या यशामागे कोणतीही जादुई काठी नसून प्रचंड मेहनत असल्याचे त्याने सांगितले. अभिषेकसाठी मेंटॉरची भूमिका बजावत असणारा युवराज म्हणाला, “अभिषेकची फलंदाजी पाहून मला माझे सुरुवातीचे दिवस आठवतात. आमची खेळण्याची शैली सारखीच आहे.” युवीकडून अभिषेकच्या मेहनतीचे कौतुक – युवीने सानियाला सांगितले की, अभिषेक आज जे काही मैदानात करत आहे, ते गेल्या ४ वर्षे आणि ३ महिन्यांच्या कठोर परिश्रमाचे फळ आहे. “मी त्याला स्पष्ट सांगितलं होतं की मी तुला फक्त आयपीएल किंवा रणजीसाठी नाही, तर टीम इंडियासाठी तयार करत आहे. त्याने ४ वर्षे मी सांगेन तेच केलं आणि आज तो भारताचा स्टार आहे,” अशा शब्दांत युवीने कौतुक केले. हेही वाचा – Tamim Rahman : क्रिकेट विश्वात खळबळ! फिक्सिंग प्रकरणी ‘दांबुला थंडर्स’च्या मालकाला ४ वर्षांची शिक्षा कर्करोगाशी लढा आणि कारकिर्दीचा प्रवास – २०११ च्या विश्वचषकाचा हिरो ठरल्यानंतर युवराजला कर्करोगाचा सामना करावा लागला. आजारातून सावरल्यानंतर त्याने २०१७ मध्ये इंग्लंडविरुद्ध १५० धावांची अविस्मरणीय खेळी केली, पण कामगिरीत सातत्य राखणे त्याला कठीण जात होते. आज क्रिकेटपासून दूर असला तरी अभिषेक शर्मासारखे हिरे घडवून तो भारतीय क्रिकेटची सेवा करत आहे.