Bhigwan Kidnapping Case : गेल्या काही दिवसांपासून इंदापूर तालुक्यातील भिगवणमध्ये एका २१ वर्षीय तरुणीचे अपहरण प्रकरणाची चर्चा आहे. या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. अपहरण वाटणाऱ्या प्रकरणाने वेगळे वळण घेतले आहे. १७ फेब्रुवारी या दिवशी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास २१ वर्षीय तरुणीचे अपहरण करण्यात आल्याचे समोर आले होते. पण त्यानंतर काल १९ फेब्रुवारी रोजी एक व्हिडिओ समोर आला असून, या व्हिडिओत तरुणीने आपण स्व: इच्छेने निघून गेल्याचे सांगितले आहे. काल मध्यरात्री तरुण तरुणी दोघेही बारामती पोलिस ठाण्यात मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास हजर झाले. तरुणीने पोलिसांना जबाब दिला असून, आता एक प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. यामध्ये तिने मोठे दावे केले आहेत. तरुणीच्या घरच्यांच्या दाव्यानुसार, तरुणीची आई व भावाला बांबूने मारहाण केली आणि मिरचीपूड डोळ्यात टाकून तरुणीचे अपहरण केले असल्याचे तक्रारीत म्हटले होते. आता याचा मेडिकल रिपोर्ट समोर आला असून, त्यामध्ये आईच्या आणि भावाच्या डोळ्यात मिरचीपूड नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तसेच तरुणीला अपहरण करून जबरदस्तीने टेम्पोमध्ये नेल्याची फिर्याद तरूणीच्या घरातील व्यक्तींनी पोलिसांना दिली होती. मात्र हे सगळं खोटं असल्याचे तरुणीने स्पष्ट केले आहे. ज्या मुलासोबत तरुणी निघून गेली होती. तो तिच्या घराशेजारी राहणार असून दोघांचे प्रेमसंबंध एक वर्षापासून होते. पण घरच्यांना विरोध होता आणि तरुणीच्या परवानगीशिवाय तिचे परस्पर लग्न घरच्यांनी ठरवल्याचा गंभीर आरोप तरुणीने प्रतिज्ञापत्रात केला आहे. या प्रतिज्ञापत्रात तरुणीने आईला व भावाना दांडक्याने मारहाण करत त्यांच्या डोळ्यात मिरचीच पूड टाकल्याचा दावा खोटा असल्याचे स्पष्ट केले आहे. तरुणीने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानंतर तिच्या घरच्यांकडून या आरोपांवर काय प्रतिक्रिया येते याकडे लक्ष असणार आहे. प्रतिज्ञापत्रात तरुणीने काय म्हटलयं? माझं आणि त्याचं प्रेम होतं. मी हे घरच्यांना सांगितलं होतं. दुसऱ्या मुलांसोबत लग्नास माझा विरोध होता. त्यामुळे संबंधित मुलासोबत मी स्वमर्जीने पळून गेले. मिरचीपूड फेकल्याची जो गुन्हा दाखल केला आहे. तो खोटा असल्याचे तरुणीने प्रतिज्ञापत्रात सांगितले आहे. मी स्वतः माझ्या राजीखुषीने व मर्जीने 1 वर्षापासून असलेल्या प्रेमसंबंधामुळे आमचा एकमेकांवर विश्वास असल्याने निघून गेली होती. मी पुर्णपणे सज्ञान असलेने मला माझ्या आयुष्याबद्दल निर्णय घेण्याचे अधिकार आहेत, असेही तिने या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे. हेही वाचा : Maternal Health: मातेचा लठ्ठपणा ते जंकफूडचा धोका; संशोधनातून धक्कादायक निष्कर्ष!