Kamal Haasan – प्रसिद्ध अभिनेते आणि मक्कल नीधी मय्यम (एमएनएम) पक्षाचे संस्थापक अध्यक्ष कमल हासन यांनी बुधवारी मतदार यादीच्या विशेष सघन पुनरावृत्ती (एसआयआर) प्रक्रियेवर तीव्र टीका करताना, यामुळे तामिळनाडूतील आगामी निवडणुकांबाबत चिंतीत असल्याचे सांगितले. संसदेच्या संयुक्त अधिवेशनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर उत्तर देताना, राज्यसभेतील पहिल्याच भाषणात हासन म्हणाले की लोक मतदान करण्यास उत्सुक आहेत, मात्र निवडणूक आयोग त्यांच्या मतदानाच्या हक्काची तपासणी करत आहे. एसआयआरचा उल्लेख करत ते म्हणाले, स्पेलिंग आणि पत्त्यांच्या किरकोळ चुकांवरून नागरिकांचे नावे वगळली जात आहेत. साहित्य आणि इंटरनेट अशा चुका माफ करतात, पण निवडणूक आयोग तसे करत नाही, अशी टीकाही त्यांनी केली. यामुळे तामिळनाडूमध्ये कागदोपत्री मोठ्या संख्येने ‘जिवंत मृत’ तयार होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. लोकशाहीवर भर देताना हासन म्हणाले की, कोणतेही सरकार कायमस्वरूपी नसते आणि लोकशाहीत अंतिम विजय जनतेचाच असतो. त्यांनी सर्वांना वाढत्या प्रगतीशील लोकशाहीसोबत वाढण्याचे आवाहन केले.