मुंबई : राज्यात महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असतानाच, उमेदवारी अर्ज बाद झालेल्या इच्छुकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. अर्ज फेटाळण्यात आलेल्या उमेदवारांच्या जनहित याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने दखल घेत सुनावणी निश्चित केली असून ही सुनावणी उद्या, शुक्रवारी होणार आहे. त्यामुळे अर्ज बाद झालेल्या उमेदवारांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवीत झाल्या आहेत. कोरोनानंतर प्रथमच होणाऱ्या महापालिका निवडणुकांमध्ये मोठ्या संख्येने इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. मात्र, किरकोळ व तांत्रिक कारणांचा आधार घेत अनेक उमेदवारांचे अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांकडून फेटाळण्यात आले. या कारवाईविरोधात मुंबईतील वांद्रे (पूर्व) येथील मोझम अली मीर यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेत निवडणूक अधिकाऱ्यांच्या कारभारावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. विरोधी पक्षांच्या उमेदवारांचे अर्ज मनमानीपणे बाद करण्यात आले असून ही कृती असंवैधानिक व अरेरावीची असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. यामुळे अनेक इच्छुक उमेदवार निवडणूक लढवण्याच्या मूलभूत हक्कापासून वंचित राहिल्याचेही नमूद करण्यात आले आहे. तसेच, महापालिका प्रशासनाने राज्य निवडणूक आयोगाच्या 12 डिसेंबर 2025 रोजीच्या अधिसूचनेतील अटींमध्ये बदल करून अधिकारांचा गैरवापर केल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. आयोगाने आधी जाहीर केलेल्या कागदपत्रांच्या यादीचे उल्लंघन करत, केवळ अंमलबजावणी करणारी संस्था असतानाही महापालिकेने स्वतःच्या अटी लादल्याचेही याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. दरम्यान, पुढील आठवड्यात मुंबई महापालिकेची निवडणूक होणार असून, अर्ज फेटाळल्या गेलेल्या उमेदवारांना पुन्हा संधी मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विविध कारणांनी बाद ठरवण्यात आलेले अर्ज पुन्हा स्वीकारण्याची मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली आहे. आता या प्रकरणात उच्च न्यायालय काय निर्णय देते, यावरच उमेदवारांचे भवितव्य अवलंबून असणार आहे.