BMC Election 2026: गेल्या पाव शतकापासून (25 Years) मुंबई महापालिकेवर अधिराज्य गाजवणाऱ्या ठाकरे कुटुंबाची सत्ता अखेर संपुष्टात आली आहे. ‘आवाज कुणाचा’ या प्रश्नाचे उत्तर गेली २५ वर्षे ‘शिवसेना’ असे घुमत होते, मात्र २०२६ च्या महापालिका निवडणुकीच्या निकालांनी या आवाजावर मर्यादा आणल्या आहेत. भाजप आणि महायुतीने ठाकरेंच्या सत्तेला सुरुंग लावत आशियातील सर्वात श्रीमंत महापालिकेवर आपला झेंडा फडकवला आहे. ठाकरे बंधूंची युतीही ठरली निष्प्रभ – या निवडणुकीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे २० वर्षांनंतर एकत्र आलेले उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे. दोन्ही कुटुंबे एकत्र आली, ‘मराठी अस्मिते’ची साद घातली गेली आणि मुंबईला ओरबाडणाऱ्यांविरोधात रणशिंग फुंकले गेले. मात्र, भावनिक साद घालूनही ठाकरे बंधूंना शंभरीचा आकडा गाठता आला नाही. ७४ हजार कोटींचे बजेट असलेल्या या पालिकेची सूत्रे ठाकरेंच्या हातातून निसटली आहेत. पराभवाची पाच प्रमुख कारणे: १. मराठी मतांचे विभाजन: शिवसेनेतील उभ्या फुटीमुळे (शिंदे गट) मुंबईतील हक्काच्या मराठी मतांमध्ये मोठी विभागणी झाली. याचा थेट फटका ठाकरे गटाला बसला. २. उत्तर भारतीय मतदारांची पाठ: मनसे सोबत आल्याने मराठी मुद्दा तापला, मात्र यामुळे गेल्या दशकात शिवसेनेकडे वळलेला २२ ते २५ टक्के उत्तर भारतीय मतदार दुरावला. भाजपने याच ‘अमराठी’ कार्डाचा वापर करत विकासाच्या मुद्द्यावर मते खेचली. ३. मुस्लिम मतदारांची भूमिका: लोकसभा निवडणुकीत ठाकरेंसोबत असलेला मुस्लिम मतदार पालिकेत मात्र पुन्हा काँग्रेस आणि एमआयएमकडे वळल्याचे चित्र दिसले. ४. अँटी-इन्कबन्सी आणि नागरी समस्या: रस्ते, पाणी आणि नालेसफाई यांसारख्या मूलभूत प्रश्नांबाबत मुंबईकरांमध्ये असलेली नाराजी आणि प्रशासकीय राजवटीतील समस्यांचा फायदा महायुतीने उचलला. ५. मतविभाजनाचा फटका: काँग्रेस स्वतंत्र लढल्यामुळे अनेक प्रभागांत तिरंगी आणि चौरंगी लढती झाल्या. यामुळे विरोधी मतांची विभागणी झाली आणि भाजपचा विजयाचा मार्ग सुकर झाला. (मतचोरी, ईव्हीएम घोटाळा, दुबार मतदार, महायुतीकडून साम-दाम-दंड-भेद, निवडणूक आयोगाची भाजपला मदत… असे दावे ठाकरे गटाने केली आहेत. यामुळेच सत्ता दूर गेल्याचे ठाकरे गटाचे म्हणणे आहे.) दरम्यान, मुंबई महापालिका हे केवळ सत्ताकेंद्र नसून ठाकरेंच्या राजकारणाचे ‘पॉवर सेंटर’ होते. लोकसभा आणि विधानसभेनंतर आता पालिकेतही अपयश आल्याने ठाकरे गटासमोर अस्तित्वाचे संकट उभे राहिले आहे. तरीही, सर्व बाजूंनी घेरलेले असताना ठाकरेंनी दिलेली झुंज राजकीय वर्तुळात दखलपात्र मानली जात आहे.