पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी गुरूवारी (दि. १५) मतदान प्रक्रिया उत्साहात पार पडली. शहरातील ३२ प्रभागातून ६९२ मतदार रिंगणात होते. महापालिकेत १२८ नगरसेवकपदाच्या जागा असून त्यापैकी २ जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. तर १२६ जागांसाठी मतदान प्रक्रिया झाली असून ६९२ मतदारांचे भवितव्य ईव्हीएम मशिनमध्ये बंद झाले आहे. शुक्रवारी (दि. १६) सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात होणार असून दुपारपर्यंत शहराचे कारभारी कोण हे ठरणार आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेवर २०१७ साली भाजपाची सत्ता आली. मार्च २०२२ मध्ये नगरसेवकांची मुदत संपली.त्यानंतर आतापर्यंत महापालिकेवर प्रशासकराज होते. सर्व कारभार प्रशासकाच्या हाती असला तरी निर्णयप्रक्रिया सत्ताधारी लोकप्रतिनिधींच्या हातामध्ये होती. हीच सत्ता कायम ठेवण्यासाठी भाजपाने जोरदार प्रयत्न केले आहेत. तर पूर्वीचा बालेकिल्ला पुन्हा ताब्यात घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतःची प्रतिष्ठा पणाला लावली आहे. दुरंगी, तिरंगी आणि चौरंगी लढतींमुळे निकालाचे गणित गुंतागुंतीचे त्यासोबतच शिवसेना (एकनाथ शिंदे), शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस, मनसे आणि आपने देखील उमेदवार रिंगणात उभे केले होते. शहरात प्रभागानुसार लढती पहायला मिळाल्या. काही ठिकाणी दुरंगी, तिरंगी, चौरंगी आणि बहुरंगी लढती झाल्या आहेत. दुरंगी लढतीत बहुसंख्य प्रभागांत मुख्यतः भाजप विरुद्ध राष्ट्रवादी किंवा शिंदेसेना अशी थेट लढत झाली आहे. तिरंगी लढतीत तीन पक्षांची थेट लढत रंगली. तेथे भाजप विरुद्ध राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असे चित्र होते. चौरंगी लढतीमध्ये भाजप, राष्ट्रवादी आणि दोन्ही शिवसेनेच्या उमेदवारांसह अपक्षही रिंगणात होते. काही प्रभागांत बहुरंगी लढत झाली आहे. दुरंगी, तिरंगी, चौरंगी आणि बहुरंगी लढतीमुळे निकालाकडे लक्ष लागले आहे. अजित पवार Vs महेश लांडगे दरम्यान, निवडणुकीच्या संपूर्ण प्रचारकाळात राज्यात महायुतीमध्ये सत्तेत असलेल्या भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शहरात जुंपली होती. आरोप-प्रत्यारोपांने महापालिका निवडणूक गाजली. संपूर्ण निवडणूक उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार महेश लांडगे यांनी एकमेकांवर केलेल्या आरोप-प्रत्यारोपांनी रंगली होती. मतदारांनी काय कौल दिला ? ते आज स्पष्ट होणार आहे.