Prabha Bhandari: करचोरीचे प्रकरण मिटवण्यासाठी दीड कोटी रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) मोठी कारवाई केली आहे. झाशी येथे तैनात असलेल्या २०१६ च्या बॅचच्या भारतीय महसूल सेवा (IRS) अधिकारी प्रभा भंडारी यांना ७० लाख रुपयांची पहिली हप्त्याची लाच घेताना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत त्यांच्यासह दोन जीएसटी अधीक्षक आणि एका वकिलासह अन्य पाच जणांनाही बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. नेमके प्रकरण काय? मिळालेल्या माहितीनुसार, १८ डिसेंबर रोजी प्रभा भंडारी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने झाशीतील ‘जय दुर्गा हार्डवेअर’वर छापा टाकला होता. या फर्मवर १३ कोटी रुपयांच्या करचोरीचा आरोप होता. छाप्यादरम्यान पथकाने मोठ्या प्रमाणावर कागदपत्रे जप्त केली होती. ही केस रफादफा करण्यासाठी व्यावसायिकाकडे दीड कोटी रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली होती. यामध्ये वकील नरेश कुमार गुप्ता मध्यस्थाची भूमिका बजावत होता. सीबीआयचा सापळा आणि अटक या प्रकरणाची तक्रार सीबीआयकडे प्राप्त होताच पथकाने सापळा रचला. ७० लाख रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना अधीक्षक अनिल कुमार तिवारी आणि अजय कुमार शर्मा यांना रंगेहाथ पकडण्यात आले. चौकशीदरम्यान त्यांनी प्रभा भंडारी यांचे नाव घेतले. सीबीआयने एक धक्कादायक फोन कॉल रेकॉर्ड केला आहे, ज्यामध्ये प्रभा भंडारी यांनी लाचेची ही रक्कम सोन्यात रूपांतरित करून आपल्याकडे सोपवण्याचे निर्देश दिल्याचे उघड झाले आहे. या पुराव्याच्या आधारे सीबीआयने भंडारी यांना दिल्लीतून अटक केली. झाशीतील निवासस्थानावर ४ तास छापेमारी प्रभा भंडारी यांच्या अटकेनंतर सीबीआयने त्यांच्या झाशी येथील निवासस्थानाची सुमारे चार तास झडती घेतली. या झडतीमध्ये रोख रक्कम, दागिने आणि मालमत्तेची महत्त्वाची कागदपत्रे हस्तगत करण्यात आली आहेत. प्रभा भंडारी या गेल्या सहा महिन्यांपासून झाशीत तैनात होत्या आणि त्यांनी काही महिन्यांपूर्वीच ६८ लाख रुपयांचा फ्लॅट खरेदी केल्याचेही तपासात समोर आले आहे. न्यायालयीन कोठडीत रवानगी ३० डिसेंबर रोजी सीबीआयने प्रभा भंडारी यांच्यासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सध्या भंडारी आणि दोन्ही अधीक्षकांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून, या प्रकरणाचा अधिक तपास सीबीआय करत आहे. एका वरिष्ठ महिला आयआरएस अधिकाऱ्याला अशा प्रकारे लाच घेताना पकडल्यामुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे.