BJP national president election: भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नवीन यांची वर्णी लागल्यानंतर आता राजकीय वातावरण तापू लागले आहे. या निवडीवर काँग्रेसने बोचरी टीका केली आहे. “ही कसली निवडणूक? आधी अध्यक्षांचे नाव जाहीर केले जाते आणि मग निवडणुकीचा सोपस्कार पार पाडला जातो,” असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला असून भाजपमध्ये केवळ ‘बॉस-बॉस’चा खेळ सुरू असल्याचे म्हटले आहे. काँग्रेसचे प्रसारमाध्यम आणि प्रचार विभागाचे प्रमुख पवन खेडा यांनी पत्रकार परिषदेत भाजपच्या निवडणूक प्रक्रियेवर टीका केली. खेडा म्हणाले की, “भाजपमध्ये लोकशाहीचा केवळ दिखावा केला जातो. प्रत्यक्षात कोणतीही निवडणूक झालेली नाही. आधी नाव ठरवले जाते आणि नंतर निवडणूक झाल्याचे भासवले जाते. मग यात निवडणूक नेमकी आहे कुठे?” पंतप्रधान मोदींच्या ‘बॉस’ विधानावर टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नितीन नवीन यांचा उल्लेख ‘माझे बॉस’ असा केला होता. त्यावर भाष्य करताना खेडा म्हणाले, “भाजपमध्ये कधी मोहन भागवत कोणाचे बॉस बनतात, तर कधी मोदी कोणाचे बॉस होतात. संतांच्या डोळ्यांतील आसवांची कोणालाही पर्वा नाही, मात्र येथे सत्तेचा आणि पदांचा ‘बिग बॉस’सारखा खेळ सुरू आहे. हे काय एखादे रियालिटी शो सुरू आहे का?” असा खोचक प्रश्नही त्यांनी विचारला. स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांच्या वादाचा संदर्भ स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांना गंगा स्नानापासून रोखल्याच्या प्रकरणाचा उल्लेख करत खेडा म्हणाले की, “एकीकडे हिंदू धर्मातील मोठे संत अश्रू ढाळत आहेत आणि दुसरीकडे भाजप केवळ स्वतःच्या प्रसिद्धीत आणि संघटनात्मक खेळात व्यस्त आहे.” नितीन नबीन: भाजपचे सर्वात तरुण अध्यक्ष नितीन नबीन यांनी मंगळवारी भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली आहेत. भाजपच्या इतिहासातील ते आतापर्यंतचे सर्वात तरुण (45 वर्ष) राष्ट्रीय अध्यक्ष ठरले आहेत. या पदाची जबाबदारी मिळण्यापूर्वी त्यांनी बिहार सरकारमधील विधी आणि नगरविकास मंत्री पदाचा राजीनामा दिला होता. ते बिहारमध्ये 5 वेळा विधानसभा जिंकले आहेत.