Strait of Hormuz: इराण-अमेरिका तणावाच्या पार्श्वभूमीवर होर्मुझ सामुद्रधुनी (Strait of Hormuz) येथे अमेरिकेने नाकेबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला असून, त्याची अंमलबजावणी सोमवारपासून सुरू करण्यात आली आहे. सेंटकॉम (United States Central Command ) च्या माहितीनुसार, १३ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता (भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७.३०) ही नाकेबंदी प्रभावी झाली आहे. या निर्णयानुसार, इराणमधील बंदरे, किनारी भाग किंवा तळांकडे जाणाऱ्या किंवा तेथून येणाऱ्या सर्व देशांच्या जहाजांना रोखण्यात येणार आहे. मात्र, गैर-इराणी बंदरांकडे जाणाऱ्या जहाजांना सामुद्रधुनीतून मार्ग दिला जाणार असल्याचे सेंटकॉमने स्पष्ट केले आहे. नाकेबंदीची अंमलबजावणी कशी? अमेरिकन नौदलाच्या २०२२ च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, अशा नाकेबंदीमध्ये शत्रूच्या नियंत्रणाखालील बंदरांमध्ये जाणाऱ्या सर्व समुद्री वाहतुकीवर निर्बंध आणले जातात. यासाठी व्यावसायिक शिपिंग कंपन्यांना आधीच औपचारिक सूचना दिल्या जाणार आहेत. हेही वाचा – Iran Isreal US War: महायुद्धाचा भडका उडणार? अमेरिकेकडून ‘स्ट्रेट ऑफ होर्मुज’ची नाकेबंदी; नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा अमेरिकेचा हेतू काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणवर आर्थिक दबाव आणण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे. इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांकडून शुल्क वसूल केल्याचा आणि काही जहाजांना अडविल्याचा आरोप आहे. त्यामुळे जागतिक बाजारात तेल-गॅस दर वाढले होते. ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, “इराणला तेलातून पैसा कमावू देणार नाही,” आणि हा निर्णय अमेरिकेच्या अटींवर करार करण्यासाठी दबाव तंत्राचा भाग असल्याचे विश्लेषकांचे मत आहे. इराणवर काय परिणाम? विशेषज्ञांच्या मते, तातडीने मोठा परिणाम होण्याची शक्यता कमी आहे. शिपिंग तज्ज्ञ लार्स जेनसन यांच्या मते, सध्या या मार्गावरून कमी जहाजे प्रवास करत असल्याने प्रत्यक्ष अडथळा मर्यादित राहील. तथापि, दीर्घकालीन परिणाम गंभीर असू शकतात. इराणच्या तेल निर्यातीवर परिणाम होऊ शकतो. परकीय चलन उत्पन्न घटण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय व्यापारात अडथळे येतील. जागतिक परिणामांची शक्यता – होर्मुझ सामुद्रधुनी ही जगातील सर्वात महत्त्वाची तेल वाहतूक मार्गांपैकी एक आहे. त्यामुळे, तेल व गॅस दरात वाढ होण्याची शक्यता आहे. महागाईत वाढ होऊ शकते. चीनसारख्या इराणी तेलावर अवलंबून देशांची चिंता वाढणार आहे. लष्करी तणाव वाढण्याचा धोका – नाकेबंदीची अंमलबजावणी करताना अमेरिकन नौदलाला इराणी हल्ल्यांचा सामना करावा लागू शकतो. बारूदी सुरंग हटविणे, जहाजांची तपासणी आणि नाकेबंदी तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या जहाजांवर कारवाई यामुळे संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे. अमेरिकन सिनेटर मार्क वॉर्नर यांनी या निर्णयाबाबत शंका व्यक्त करताना म्हटले की, “ही नाकेबंदी इराणला झुकवेलच असे नाही.” तर रिपब्लिकन खासदार माइक टर्नर यांनी याला “ताकदीच्या जोरावर सामुद्रधुनी उघडण्याची रणनीती” असे म्हटले आहे. राजकीय आणि आर्थिक जोखीम – अमेरिकेतही या निर्णयावर मतभेद आहेत. सर्वेक्षणानुसार, ५९% अमेरिकन नागरिकांना हा संघर्ष अमेरिकेसाठी नुकसानकारक वाटतो. येत्या मध्यावधी निवडणुकांमध्ये याचा राजकीय फटका बसू शकतो. दरम्यान, होर्मुझ सामुद्रधुनीतील नाकेबंदी ही अमेरिकेची मोठी रणनीतिक चाल असली तरी तिचा इराणवर तात्काळ मर्यादित परिणाम होण्याची शक्यता आहे. मात्र, दीर्घकालीन आर्थिक दबाव, जागतिक तेल बाजारातील अस्थिरता आणि संभाव्य लष्करी संघर्ष यामुळे परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते.