बीड : मस्साजोग (जि. बीड) सरपंच संतोष देशमुख यांची मागच्या वर्षी आरोपींकडून (Walmik Karad) निर्घृणपणे हत्या करण्यात आली होतो. या हत्येने संपूर्ण देशात आणि राज्यात खळबळ उडाली होती. या हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार म्हणून वाल्मिक कराडचे नाव समोर आले आहे. गेल्या काही दिवसापासून वाल्मिक कराड निवडणुकांअगोदर बाहेर येणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र आता मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने कराडला मोठा दणका देत त्याचा जामीन अर्ज फेटाळला आहे. सलग दोन दिवस या प्रकरणी कोर्टात सुनावणी सुरू होती. न्या. एस. एम. घोडेस्वार यांच्या खंडपीठासमोर हि सुनावणी पार पडली. कराडच्या वकिलांनी काय केला युक्तिवाद? या प्रकरणातील आरोपी कोठडीत असून, मुख्य आरोपी मानल्या गेलेल्या वाल्मिक कराडच्या वतीने जामीन अर्ज दाखल करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाच्या मिहीर शहा निवाड्यानुसार आरोपीला अटकेची लिखित कारणे देणे बंधनकारक असताना ती न दिल्याचा मुद्दा बचाव पक्षाने उपस्थित केला. तसेच मोक्का कायदा चुकीचा लागू करण्यात आला असून कराड घटनेच्या दिवशी घटनास्थळापासून शेकडो किलोमीटर दूर होता, असा युक्तिवाद कराडच्या वकिलांकडून करण्यात आला होता. सरकारी वकिलांनी काय केला युक्तिवाद? कराडच्या वकिलांना प्रतिवाद करताना सरकारी वकील गिरासे यांनी घटनेची प्रत्येक तारखेनुसार मांडणी करून न्यायालयासमोर पुरावे सादर केले. सीडीआर, सीसीटीव्ही फुटेज, ऑडिओ रेकॉर्डींग, न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा अहवाल तसेच साक्षीदारांची साक्ष यावरून कराडच संपूर्ण कटाचा प्रमुख सूत्रधार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कराडने अवादा कंपनीकडून दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचे, नकार मिळाल्यावर सुदर्शन घुलेला कंपनीवर दबाव आणण्यासाठी पाठवले होते, हेदेखील न्यायालयात निदर्शनास आणून दिले. सुदर्शन घुले व त्याच्या सहकाऱ्यांनी उमरी टोलनाक्यावरून देशमुख यांचे अपहरण करून निर्जन ठिकाणी मारहाण केली. मारहाणीदरम्यान कराड, घुले आणि विष्णू चाटे यांचे फोनवर सतत संपर्क सुरू होते याचा पुरावादेखील कोर्टात मांडण्यात आला. अत्याचारांचे तब्बल 23 व्हिडिओ न्यायालयासमोर या सुनावणीदरम्यान देशमुख यांच्यावर झालेल्या अत्याचारांचे तब्बल 23 व्हिडिओ न्यायालयासमोर दाखवण्यात आले. ही दृश्ये पाहताच उपस्थित नागरिक, वकील आणि देशमुख यांचे कुटुंबीय भावूक झाले होते. मृत संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख आणि भाऊ धनंजय यांना आपले अश्रू अनावर झाले होते.