Vidhan Parishad Election : राज्यातील विधानपरिषेद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवार निवडीच्या हालचालींना वेग आला असून भाजपकडून विवेक कोल्हे यांचे नाव जवळपास निश्चित झाल्याची चर्चा रंगली आहे. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्यामुळे या चर्चांना अधिक बळ मिळाले आहे. (Vidhan Parishad Election) शिर्डी दौऱ्यावर असताना बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना सूचक संकेत दिले. “विधानसभा निवडणुकीच्या वेळी आम्ही विवेक कोल्हे यांना विधान परिषद देण्याचे आश्वासन दिले होते. तो शब्द पक्षाने मागे घेतलेला नाही,” असे ते म्हणाले. या विधानामुळे कोल्हे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्याचे मानले जात आहे. दरम्यान, भाजपची उमेदवार यादी दिल्ली-मुंबईदरम्यान अंतिम टप्प्यात असून, लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातून भाजपचा पाचवा आमदार म्हणून विवेक कोल्हे यांची निवड होणार असल्याची चर्चा आहे. (Vidhan Parishad Election) विधानसभा निवडणुकीदरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तक्षेपानंतर विवेक कोल्हे यांनी माघार घेतली होती. त्या वेळी फडणवीस यांनी त्यांच्या निर्णयाचे कौतुक केले होते. त्यानंतर कोल्हे यांनी संयम राखत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सक्रिय भूमिका बजावली. (Vidhan Parishad Election) अहिल्यानगरमध्ये महायुतीतील अंतर्गत राजकारणही रंगलेले असून, विशेषतः अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटाशी स्थानिक पातळीवर संघर्ष सुरू असल्याचे दिसते. अशा परिस्थितीत विधान परिषदेत संधी मिळाल्यास कोल्हे यांच्या राजकीय बळात वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, आगामी जिल्हा बँक, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोल्हे सक्रिय तयारी करत आहेत. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. (Vidhan Parishad Election)