Congress vs bjp : उत्तराखंडमध्ये आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून भाजपला मोठा धक्का बसला आहे. रुद्रपूर मतदारसंघाचे माजी आमदार राजकुमार ठुकराल यांच्यासह सहा नेत्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. या नेत्यांचे काँग्रेसमध्ये स्वागत पक्षाच्या प्रभारी कुमारी शैलजा यांनी केले. निवडणुकीपूर्वी झालेल्या या पक्षांतरामुळे राज्यातील राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. राजकुमार ठुकराल हे भाजपच्या तिकिटावर २०१२ आणि २०१७ मध्ये सलग दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. मात्र २०२२ मध्ये पक्षाने त्यांना उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. पक्षविरोधी भूमिका घेतल्यामुळे त्यांच्यावर कारवाईही करण्यात आली होती. रुद्रपूर मतदारसंघात त्यांचा मोठा प्रभाव मानला जातो. ठुकराल यांच्यासोबत रुर्कीचे माजी महापौर गौरव गोयल यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला. हरिद्वार जिल्ह्यात त्यांची मजबूत पकड असल्याने काँग्रेसला त्याचा फायदा होण्याची शक्यता आहे. याशिवाय बसपाचे माजी आमदार नारायण पाल आणि भाजपचे माजी आमदार भीमलाल आर्य यांनीही काँग्रेसचा हात धरला आहे. या सर्व नेत्यांच्या प्रवेशामुळे काँग्रेसची ताकद वाढल्याचे चित्र दिसत आहे. एकूणच, विधानसभा निवडणुकांपूर्वी होत असलेल्या या पक्षांतरांमुळे राज्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत असून पुढील काळात आणखी मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.