Mallikarjun Kharge: पंतप्रधान मोदींना वापरला ‘हा’ शब्द; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना निवडणूक आयोगाची नोटीस
Mallikarjun Kharge:

Mallikarjun Kharge: निवडणूक प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगाने काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. चेन्नई येथील एका सभेत भाषण करताना खरगे यांनी पंतप्रधानांचा उल्लेख ‘दहशतवादी’ असा केला होता, ज्याची आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. या नोटिशीला २४ तासांच्या आत उत्तर देण्याचे निर्देश खरगे यांना देण्यात आले असून, भाजपने याप्रकरणी कडक कारवाईची मागणी केली आहे.
नेमकं प्रकरण काय?
तामिळनाडू निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी एका जाहीर सभेत बोलताना मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजप आणि एआयएडीएमके (AIADMK) यांच्या युतीवर टीका केली होती. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींना उद्देशून वादग्रस्त विधान केले. भाजपने या विधानाचा तीव्र निषेध करत निवडणूक आयोगाकडे धाव घेतली. केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन आणि किरण रिजिजू यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाने निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेऊन ही आचारसंहितेचे उल्लंघन असल्याचे म्हटले. तामिळनाडूमध्ये २३ एप्रिल २०२६ रोजी मतदान होत आहे, त्यापूर्वीच्या ‘सायलेन्स पिरियड’मध्ये हा वाद निर्माण झाल्याने राजकीय वातावरण तापले आहे.
Election Commission of India takes note of Congress National President Mallikarjun Kharge calling PM Narendra Modi a “Terrorist” and issues a notice to Kharge to explain his stand within 24 Hrs pic.twitter.com/5xGoympL9o
— ANI (@ANI) April 22, 2026
खरगे यांचे स्पष्टीकरण –
वादाचे स्वरूप वाढल्यानंतर मल्लिकार्जुन खरगे यांनी आपल्या विधानावर स्पष्टीकरण दिले आहे. आपला उद्देश पंतप्रधानांना वैयक्तिकरित्या दहशतवादी म्हणण्याचा नव्हता, तर ते आपल्या राजकीय विरोधकांना ‘धमकावत’ असल्याचे आपल्याला सुचवायचे होते, असे त्यांनी म्हटले. “पंतप्रधान मोदी ईडी, आयकर विभाग आणि सीबीआय सारख्या संस्थांचा वापर करून विरोधकांना घाबरवत आहेत, या अर्थाने मी ते विधान केले होते,” असा बचाव त्यांनी केला आहे. मात्र, भाजपने त्यांचे हे स्पष्टीकरण फेटाळून लावत माफीची मागणी केली आहे.
अमित शहा यांचा घणाघात –
दुसरीकडे, पश्चिम बंगालमधील एका रॅलीत बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या प्रकरणावरून काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. “ज्यांनी देशाला दहशतवादातून मुक्त केले, अशा नरेंद्र मोदींना खरगे दहशतवादी म्हणत आहेत. राहुल गांधींच्या सहवासामुळे खरगे यांची भाषा बिघडली आहे,” अशी बोचरी टीका शहा यांनी केली. मोदींना जेवढ्या शिव्या ल्यादि जातील, तेवढ्याच जोमाने कमळ फुलेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. आता निवडणूक आयोग या प्रकरणावर काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





