US-Iran War: इराण आणि अमेरिका यांच्यात चर्चेच्या दुसऱ्या फेरीचे थेट संकेत नसले तरी, पडद्यामागील मार्गाने शांतता करार घडवून आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अमेरिका आणि इराण यांच्यातील सध्याच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, तेहरानने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा उघडण्यासाठी आणि युद्ध संपवण्यासाठी अमेरिकेला एक नवीन शांतता प्रस्ताव पाठवला आहे. ॲक्सिऑसने रविवारी एका अमेरिकी अधिकाऱ्याचा आणि या प्रकरणाशी परिचित असलेल्या दोन सूत्रांचा हवाला देत, इराणने पाकिस्तानी मध्यस्थांमार्फत अमेरिकेला होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा उघडण्यासाठी आणि युद्ध संपवण्यासाठी एक नवीन प्रस्ताव सादर केला आहे, तसेच अणुचर्चा नंतरच्या टप्प्यासाठी पुढे ढकलण्याचा प्रस्तावही दिला असल्याची माहिती समोर आली आहे. इराण होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्यास तयार US-Iran War: ॲक्सिऑसच्या अहवालानुसार, इराणने अमेरिकेला पाठवलेल्या नवीन शांतता प्रस्तावात प्रामुख्याने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा उघडणे, अणुचर्चेसाठी नवीन अटी आणि युद्धविरामासह नाकेबंदी उठवण्याचा समावेश आहे. अहवालानुसार, इराण होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा उघडण्यास तयार आहे. या प्रस्तावात युद्धविराम अधिक कालावधीसाठी वाढवण्याच्या किंवा युद्ध कायमचे संपवण्याच्या कराराचाही समावेश असू शकतो. US-Iran War: अणुचर्चांसाठी इराणची नवी अट इराणने सादर केलेल्या प्रस्तावात,अणुचर्चा सध्यापुरती स्थगित करून नंतरच्या टप्प्यात पुन्हा सुरू करावी.” अशी ,मागणी करण्यात आली आहे. तसेच इराणचा असा दावा आहे की, जलमार्ग खुला झाल्यावर आणि आर्थिक नाकेबंदी पूर्णपणे उठवल्यावरच अणुचर्चा पुन्हा सुरू होईल. दरम्यान, इराणचे परराष्ट्र मंत्री अराघची यांनी मध्यस्थांना स्पष्ट केले की, समृद्ध युरेनियमबाबत ट्रम्प यांच्या मागण्यांवर इराणी नेतृत्वात एकमत नाही. सूत्रांनुसार, व्हाईट हाऊसला हा प्रस्ताव मिळाला आहे. तथापि, अमेरिकन प्रशासन इराणच्या अटींचा विचार करण्यास तयार आहे की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. जर होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाली, तर जागतिक तेल पुरवठ्याला मोठा दिलासा मिळू शकतो. इराणवर ट्रम्प यांची बैठक US-Iran War: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची सोमवारी (२७ एप्रिल) ‘सिच्युएशन रूम’मध्ये त्यांच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्र धोरण टीमसोबत एक महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. ‘ॲक्सिऑस’च्या वृत्तानुसार, इराणसोबत सुरू असलेला तणाव आणि युद्धाच्या पुढील टप्प्यांसाठीचे पर्याय यावर चर्चा करणे हा या बैठकीचा मुख्य अजेंडा असेल.