Congress: मध्य-पूर्व आशियात (Middle East) सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षामध्ये मतमतांतरे पाहायला मिळत आहेत. एकीकडे राहुल गांधी या मुद्द्यावरून केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट हल्ला चढवत असताना, दुसरीकडे पक्षाचे चार दिग्गज नेते मात्र सरकारच्या परराष्ट्र धोरणाचे समर्थन करताना दिसत आहेत. कमलनाथ, आनंद शर्मा, शशी थरूर आणि मनीष तिवारी यांनी या संवेदनशील विषयावर राहुल गांधींपेक्षा वेगळी आणि सकारात्मक भूमिका मांडली आहे. ज्येष्ठ नेत्यांकडून सरकारच्या मुत्सद्देगिरीचे कौतुक – काँग्रेसच्या या वरिष्ठ नेत्यांनी भारताच्या सध्याच्या परराष्ट्र धोरणाला ‘परिपक्व’ म्हटले आहे. माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा यांनी सोशल मीडिया (X) वर पोस्ट करत सरकारच्या राजनैतिक पद्धतीची प्रशंसा केली. ते म्हणाले की, “अनपेक्षित आणि अस्थिर परिस्थितीत सरकारने घेतलेले निर्णय समजूतदारपणाचे होते, ज्यामुळे संभाव्य धोके टळले आहेत. अशा वेळी राष्ट्रीय हित लक्षात घेऊन सर्वांनी एकत्र येणे ही काळाची गरज आहे.” काँग्रेस खासदार मनीष तिवारी यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, पश्चिम आशियातील युद्धाच्या संदर्भात सरकार कदाचित योग्य पावले उचलत आहे. खासदार शशी थरूर यांनी एका लेखात नमूद केले की, या युद्धप्रसंगी भारताने बाळगलेला संयम म्हणजे ‘सामरिक शहाणपण’ आहे. शांत राहणे हा भित्रेपणा नसून राष्ट्रीय हित जपण्याचा तो एक मार्ग आहे. हेही वाचा – Baramati By-Election: उद्धव ठाकरेंचा सुनेत्रा पवार यांना पाठिंबा ? LPG टंचाईवर कमलनाथ यांचे मोठे विधान – देशात इंधन आणि एलपीजीच्या तुटवड्याची चर्चा सुरू असताना, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी धक्कादायक विधान केले आहे. ते म्हणाले, “देशात गॅसची कोणतीही कमतरता नाही. तुटवडा असल्याचे केवळ एक वातावरण तयार केले जात आहे.” राजकीय फायद्यासाठी काही लोक विनाकारण भीती पसरवत असल्याचा आरोपही त्यांनी केला. या विधानानंतर केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काँग्रेसवर निशाणा साधला असून, काँग्रेस नेत्यांनीच आता सत्य मान्य केल्याचे त्यांनी म्हटले आहे. राहुल गांधी यांचा सरकारवर घणाघात – एकीकडे ज्येष्ठ नेते सरकारची पाठराखण करत असताना, राहुल गांधी यांनी मात्र येणाऱ्या संकटाचा इशारा दिला आहे. परराष्ट्र धोरणावर टीका करताना राहुल गांधी म्हणाले की, सरकारच्या चुकीच्या परराष्ट्र धोरणामुळे भारताची ऊर्जा सुरक्षा धोक्यात आली आहे. आगामी काळात इंधन ही मोठी समस्या बनणार असून कोट्यवधी लोकांना याचा फटका बसेल. पंतप्रधान या गंभीर विषयावर काम करण्यास असमर्थ ठरत आहेत. रुपयाची घसरण आणि औद्योगिक इंधनाच्या वाढत्या किमती हे भीषण महागाई येण्याचे संकेत आहेत, असा इशारा राहुल गांधींनी दिला आहे. दरम्यान, परराष्ट्र धोरण आणि ऊर्जा सुरक्षेच्या मुद्द्यावर काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद असल्याचे या विधानांवरून स्पष्ट होत आहे. जिथे राहुल गांधी सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत, तिथेच अनुभवी नेते सरकारच्या पाठीशी उभे राहिलेले दिसत आहेत.