भाजप विधानपरिषदेला कोणाला उमेदवारी देणार? Top 10 News : आगामी विधानपरिषद निवडणुकीच्यानिमित्ताने महाराष्ट्रातील राजकारणात रंगत निर्माण झाली आहे. विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी येत्या 12 मे रोजी निवडणूक होणार आहे. या नऊ जागांपैकी भाजपच्या वाट्याला पाच जागा येणार आहेत. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील भाजपच्या कोअर कमिटीने तब्बल 30 जणांच्या नावांची यादी दिल्लीतील पक्षश्रेष्ठींकडे पाठवली होती. मात्र, ही यादी पाहिल्यानंतर दिल्लीतील वरिष्ठांनी या यादीमधील अर्धी नावे काढून पुन्हा सुधारित यादी पाठवण्यास सांगितले होते. त्यानुसार आता महाराष्ट्र भाजपने विधानपरिषद निवडणुकीसाठी 14 जणांच्या नावांची सुधारित यादी पुन्हा दिल्लीला पाठवली आहे. त्यामुळे 30 जणांपैकी नक्की कोणाचा पत्ता कट झाला, याबद्दल आता उत्सुकता निर्माण झाली आहे. मराठी सक्तीच्या निर्णयाला तात्पुरती स्थगिती? मुंबईतील रिक्षा आणि टॅक्सी चालकाना मराठी सक्तीच्या निर्णयाला राज्य सरकारने तात्पुरती स्थगिती दिल्याचा दावा महाराष्ट्र ऑटो रिक्षा टॅक्सी युनियनचे अध्यक्ष शशांक राव यांनी केला. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत मराठी सक्तीच्या निर्णयाबाबत सकारात्मक तोडगा निघाल्याचा दावाही त्यानी केला. त्यानुसार ऑगस्टपर्यंत मराठी सक्तीचा निर्णय थांबवण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. मुंबईतील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी लिहिणे आणि वाचण्याच्या सक्तीचा निर्णय परिवहन खात्याने घेतला होता. त्यानुसार 1 मे पासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. परंतु, परिवहन मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत या निर्णयाला ऑगस्टपर्यंत स्थगिती दिली असल्याचा दावा शशांक राव यांनी केला. शिवसेनेच्या ऑफरवर बच्चू कडू काय निर्णय घेणार? प्रहार जनशक्ती पक्ष शिवसेनेत विलीन करावा या शिवसेनेच्या ऑफरवर बच्चू कडू यांची शिवसेनेतील नेत्यांसोबत चर्चा झाल्याची महत्वाची माहिती समोर आलीय.मात्र बच्चू कडू यांच्याकडून अद्याप कुठलाही निर्णय घेण्यात आला नसल्याचे म्हटल जातंय. विधान परिषदेच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटचे दोन दिवस राहिलेले असताना बच्चू कडू कडून शिवसेना नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या जाणार असल्याचं बोललं जातंय. विधान परिषदेसाठी शिवसेनेकडून बच्चू कडू यांचे नाव आघाडीवर मात्र घातलेल्या अटीवर नेमका काय निर्णय बच्चू कडू कडून घेतला जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय तर दुसरीकडे शिवसेनेतील काही नेत्यांकडून बच्चू कडू यांच्या विधानपरिषद उमेदवारीला विरोध असल्याची माहिती समोर आलीय त्यामुळे बच्चू कडू शिवसेनेच्या नेत्यांच्या भेटी घेऊन आपली भूमिका लवकरच स्पष्ट करणार असल्याच सांगण्यात येतंय. विधान परिषदेसाठी सोलापूरमध्ये रस्सीखेच विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात भाजपमध्ये उमेदवारीसाठी जोरदार हालचाली सुरू झाल्यात. जिल्ह्याला एक जागा मिळण्याचे निश्चित मानले जात असून पक्षाच्या नव्या धोरणामुळे अनेक नवे चेहरे चर्चेत आलेत. भाजपकडून यावेळी विधानसभा किंवा लोकसभा न लढवलेल्या उमेदवारांना संधी देण्याचा विचार सुरू आहे. यासोबतच महिलांना 33 टक्के प्रतिनिधित्व देण्याच्या भूमिकेमुळे महिला उमेदवारांचाही विचार पुढे येतोय. जातीय समतोल साधण्याचाही प्रयत्न पक्षाकडून केला जात आहे. सध्या सोलापूर जिल्ह्यातून चार प्रमुख नावांची चर्चा रंगली आहे. यामध्ये राजश्रीताई नागणे पाटील, प्रशांत परिचारक, राजन पाटील आणि प्राध्यापक शिवाजी सावंत यांचा समावेश आहे. या चार नावांपैकी एकाला उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील राजकीय समीकरणे आणि शिवसेनेच्या हालचाली लक्षात घेता भाजप त्यांचा वापर रणनीती म्हणून करू शकते. त्यामुळे अंतिम उमेदवारी कोणाला मिळणार याकडे सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. राज्यात तापमानाचा भडका उडाला Top 10 News : राज्यात तापमानाचा चांगलाच भडका उडालाय. विदर्भासह महाराष्ट्रात सूर्य अक्षरक्ष:आग ओकतोय. कमाल तापमानाचा पारा नवे उच्चांक प्रस्थापित करत आहे. अमरावती, यवतमाळसह विदर्भात उष्णतेची लाट उसळल्याचे दिसून येतीय. दरम्यान नागपूर शहरात गेल्या १० दिवसांत शहरात तब्बल १३ अनोळखी व्यक्तींचे मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. या सर्वांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय.या वाढत्या तापमानाने पश्चिम विदर्भातील अकोला, अमरावती आणि यवतमाळ येथे उच्चांक गाठला. अशातच उष्माघाताचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळू लागलेय. दरम्यान , ठाणे, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती याठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा देंण्यात आलाय. तर नागपूर, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात येतीय. १ मे पासून एलपीजी बुकिंगचे नियम बदलणार अमेरिका-इस्रायल आणि इराणमधील युद्धाचा संपूर्ण जगावर मोठा परिणाम झाला. जगााला ऊर्जा संकटाचा सामना करावा लागलाय. भारताही इंधन पुरवठ्यावरही परिणाम झाला होता. या इंधन टंचाईपासून बचाव करण्यासाठी भारत सरकार काही नियम आणि निर्बंध आणली होती. तेल विपणन कंपन्या १ मे २०२६ पासून काही महत्त्वाचे नियम लागू करणार आहे.एलपीजी सिलिंडर बुकिंगच्या नियमांमध्येही मोठ्या बदलांची चर्चा सुरू आहे. पुरवठा सुरळीत आणि सुनिश्चित करण्यासाठी सरकार आणि तेल कंपन्या बुकिंग आणि वितरण प्रणालीमध्ये सातत्याने बदल केले जात आहेत.गेल्या काही दिवसांत एलपीजी सिलिंडर महाग झालेत. १४.२ किलोच्या घरगुती सिलिंडरच्या दरात ६० रुपयांनी वाढ झालीय. १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या दरात एका महिन्यात तीनवेळा वाढ झाली आहे. १ मेपासून किमती पुन्हा बदलू शकतात. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम यांसारख्या कंपन्या या संदर्भात नवीन नियम लागू करण्याबाबत विचार करत असल्याचं सांगण्यात येतंय. राघव चड्ढानंतर बड्या नेत्याचा आपला रामराम खासदार राघव चढ्ढा यांच्यासह सात खासदारांनी आम आदमी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्यानं अरविंद केजरीवाल यांचा पक्ष राजकीय संकटात सापडलाय. त्यात आता आणखी एका बड्या नेत्याने पक्ष सोडण्याची घोषणा केलीय. गुजरातमधील आम आदमी पक्षाचे उपाध्यक्ष आणि शेतकरी नेते सागर रबारी यांनी पक्ष सोडत असल्याचे जाहीर केले आहे. हा केजरीवाल यांना मोठा झटका मानला जातोय.सागर रबारी यांनी पक्ष सोडत असल्याचे सोशल मीडियावरील पोस्टमध्ये जाहीर केले आहे.त्यात त्यांनी आज मी आम आदमी पक्षासोबतचा प्रवास थांबवत आहे. पक्षाचे सदस्यत्व, पद आणि जबाबदाऱ्यांपासून स्वतःला मुक्त करत आहे.असं म्हटलंय. दरम्यान पुढच्या वर्षी गुजरातमध्ये निवडणूक आहे अशा वेळी रबारी यांनी पक्ष सोडणे हा केजरीवालांच्या पक्षविस्ताराच्या धोरणाला मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे इराणने रशियाकडे दिली मध्यस्थीची सूत्रे? अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणने आपल्या कूटनीतीत मोठा बदल करण्याचे संकेत दिले आहेत. इस्लामाबादमधील चर्चेचे प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर इराण आता पाकिस्तानवर अवलंबून न राहता रशियासह इतर देशांशी संपर्क वाढवत आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री सैय्यद अब्बास अराघची यांनी ओमान आणि रशियाच्या दौऱ्यांमधून हे स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यामुळे आगामी काळात मध्यस्थीच्या प्रक्रियेत पाकिस्तानची भूमिका कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.पाकिस्तानची भूमिका कमी होत असताना इराण आता रशियाकडे एक महत्त्वाचा भागीदार म्हणून पाहत आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत इराणचे उच्चस्तरीय संवाद होण्याची शक्यता आहे. अणु कार्यक्रम, युरेनियम साठा आणि प्रादेशिक सुरक्षेच्या मुद्द्यांवर या चर्चेत भर दिला जाऊ शकतो. दिल्लीचा बालेकिल्ल्यात लाजिरवाणा पराभव आयपीएल 2026 च्या 39 व्या सामन्यात सोमवारी क्रिकेट चाहत्यांना एक थरारक आणि ऐतिहासिक सामना पाहायला मिळाला. दिल्लीच्या घरच्या मैदानावर, म्हणजेच अरुण जेटली स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या गोलंदाजांनी दिल्ली कॅपिटल्सच्या फलंदाजीचे अक्षरशः कंबरडे मोडले. आरसीबीने दिल्लीला अवघ्या 75 धावांत रोखून या हंगामातील सर्वात कमी धावसंख्येची नोंद केली. अनुभवी विराट कोहली आणि युवा फलंदाज देवदत्त पडिक्कल यांनी कोणतीही घाई न करता संयमी फलंदाजी केली. दिल्लीच्या गोलंदाजांना एकही संधी न देता या जोडीने आरसीबीला 9 विकेट्स राखून एकतर्फी विजय मिळवून दिला. तर दुसरीकडे विराट कोहलीने या सामन्यात इतिहास रचला. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 11 धावा करून किंग कोहलीने आयपीएलमध्ये 9000 धावा पूर्ण केल्या. तो आयपीएलमध्ये 9000 धावा करणारा पहिला फलंदाज ठरला. प्रेक्षकांनी विराट कोहलीच्या या ऐतिहासिक कामगिरीचे टाळ्या वाजवून स्वागत केले. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आधीच कोहलीच्या नावावर आहे. दिग्गज अभिनेते भरत कपूर काळाच्या पडद्याआड सिनेसृष्टीवर शोककळा पसरली असून दिग्गज अभिनेते भरत कपूर यांचं निधन झालं आहे. वयाच्या 80 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील सायन रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्याच दिवशी संध्याकाळी साडेसहा वाजता कुटुंबीय आणि जवळच्या मित्रमंडळींच्या उपस्थितीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाची माहिती अभिनेते अवतार गिलयांनी माध्यमांना दिली. 1970 ते 90 च्या दशकात भरत कपूर यांनी हिंदी सिनेसृष्टीत महत्त्वाची भूमिका बजावली. चार दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक संस्मरणीय भूमिका साकारल्या. सहाय्यक भूमिका असो किंवा खलनायकाची, प्रत्येक पात्र त्यांनी आपल्या अभिनयानं उठावदार केलं. दिग्गज अभिनेत्याच्या निधनाची बातमी समोर येताच सिनेविश्वावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तसेच, चाहत्यांकडूनही हळहळ व्यक्त केली जातीय.