सुनेत्रा पवारांच्या राज्यसभेच्या जागेवर कोणाला संधी मिळणार ? Top 10 News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी नुकताच राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला. त्यांनतर या जागेवर दुसरा कोणता नेता जाणार याविषयी राष्ट्रवादीच्या गोटात चर्चा सुरू झाली आहे. सध्या या जागेवर जाण्यासाठी इच्छुकांची भाऊगर्दी पाहिला मिळत आहे. या जागेसाठी आनंद परांजपे, भुजबळ कुटुंबीय, मलिक कुटुंबीय, अविनाश आदिक, विक्रम काकडे अशी प्रमुख नावे इच्छूक आहेत. सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीच्या खासदारांची राज्यसभेतील संख्या 3 इतकी राहिली आहे. राज्यसभेत राष्ट्रवादीचे तीन खासदार आहेत त्यामध्ये प्रफुल पटेल, पार्थ पवार आणि नितीन काका पाटील यांचा समावेश आहे. मात्र, आता सुनेत्रा पवार यांच्या जागी कोणत्या नेत्याला संधी दिली जाणार, हे पाहणे उत्सुकतेचं ठरणार आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यात ‘या’ दिवशी ₹३००० जमा होणार राज्यातील लाडक्या महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यात एकाचवेळी ३ हजार रूपयांचा लाभ जमा होऊ शकतो. लाडकी बहीण योजनेचे मार्च आणि एप्रिल महिन्याचे हप्ते अद्यापही लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झालेले नाहीत. आर्थिक वर्ष अखेर आणि ई-केवायसी प्रक्रियेतील तांत्रिक गुंतागुंतीमुळे हा विलंब झाल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलंय. मार्च आणि एप्रिल या महिन्याचे दोन हप्ते एकत्र कधी जमा होणार? याबाबत महत्त्वाची माहिती मिळाली आहे. मे महिन्याच्या १५ तारखेपर्यंत लाडकीच्या खात्यात २ महिन्याचा लाभ एकत्र जमा होईल, असे सांगण्यात येत आहे. याबाबत सरकारकडून पावले उचलण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! पेन्शनचा प्रश्न अखेर सुटला गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेला पेन्शनचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. राज्य सरकारने सुधारित निवृत्ती वेतन योजनेची (NPS) अंमलबजावणी जाहीर केली आहे. जुनी पेन्शन की नवीन पेन्शन या वादात अडकलेल्या कर्मचाऱ्यांचा संभ्रम आता दूर झाला आहे. वित्त विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय (GR) निर्गमित केल्यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. २०१४ पासून पेन्शनसाठी आंदोलन करणाऱ्या आणि गेली दोन वर्षे या निर्णयाच्या प्रतीक्षेत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी हा मोठा विजय मानला जात आहे. या नवीन निर्णयामुळे राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली (NPS) लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना आता सुधारित योजनेचा लाभ घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे हजारो सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीनंतरच्या आर्थिक सुरक्षेचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. शिक्षकांसाठी वार्षिक ५० तास प्रशिक्षण सक्तीचे राज्यातील सर्व शिक्षक, मुख्याध्यापक आणि पर्यवेक्षकांना आता दरवर्षी ५० तासांचे सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास प्रशिक्षण पूर्ण करणे अनिवार्य केले आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार अध्यापन कौशल्ये अद्ययावत करण्यासाठी शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे. शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल यांनी यासंदर्भातील अध्यादेश प्रसिद्ध केला आहे. हे प्रशिक्षण सर्व माध्यमांच्या शासकीय आणि खासगी अनुदानित शाळांमधील पहिली ते बारावीच्या शिक्षकांना लागू असेल. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी) ही प्रशिक्षणाची शिखर संस्था आहे. या संस्थेच्या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही संस्थांकडून स्वतंत्रपणे किंवा समांतर प्रशिक्षण आयोजित करण्यात येऊ नये. ‘एससीईआरटी’मार्फत तांत्रिक पडताळणीनंतर आवश्यकतेनुसार प्रशिक्षण मुख्य आराखड्यात समाविष्ट करावे, असा आदेश शालेय शिक्षण विभागाने अध्यादेशाद्वारे दिला आहे. सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची गोळ्या झाडून हत्या Top 10 News : पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने ऐतिहासिक कामगिरी करत विजय संपादन केल्यानंतर आता राज्यात रक्तरंजित संघर्षाला सुरुवात झाली आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष सुरु झाला आहे. Suvendu Adhikari PA Shot Dead: भाजपचे पश्चिम बंगालमधील मुख्यमंत्रिपदाचे संभाव्य उमेदवार शुभेंदू अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक चंद्रनाथ रथ यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आलीय . चंद्रनाथ रथ हे आपल्या गाडीतून घरी जात होते. त्यावेळी काही अज्ञात लोकांनी त्यांच्यावर तीन गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. यापैकी दोन गोळ्या त्यांच्या छातीत शिरल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. चंद्रनाथ रथ हे शुभेंदू अधिकारी यांच्या अत्यंत जवळची व्यक्ती म्हणून ओळखले जात होते. गेल्या पाच वर्षांपासून रथ हे शुभेंदू अधिकारी यांचे पीए म्हणून कार्यरत होते. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीतही चंद्रनाथ रथ यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. त्यामुळे चंद्रनाथ रथ यांच्या हत्येने पश्चिम बंगालमध्ये खूप मोठी खळबळ उडाली आहे. एलपीजी सिलिंडरच्या नवीन दरसूची जाहीर देशभरात एलपीजी सिलिंडरच्या विविध प्रकारांसाठी नवीन किंमती जाहीर करण्यात आल्यात. या दरसूचीमध्ये घरगुती वापरापासून ते हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, दुकाने आणि मोठ्या उद्योगांसाठी लागणाऱ्या मोठ्या क्षमतेच्या सिलिंडरचा समावेश आहे. घरगुती ग्राहकांना काही प्रमाणात स्वस्त दर मिळत असले तरी व्यावसायिक क्षेत्रासाठी खर्च वाढला आहे. सर्वाधिक वापरला जाणारा घरगुती १४.२ किलोचा सिलिंडरचे दर दिल्लीत ९१३ रू. एवढा झालाय. लहान कुटुंब किंवा काही काळासाठी गरज भासणाऱ्या ग्राहकांसाठी ५ किलोचा सिलिंडर ३३९ मध्ये मिळत आहे. हॉटेल्स, ढाबे आणि रेस्टॉरंट्ससाठी वापरल्या जाणाऱ्या १९ किलो क्षमतेच्या व्यावसायिक सिलिंडरची किंमत ३०७१.५ पर्यंत पोहोचली आहे. त्यामुळं आता हॉटेलच्या जेवणाचे दर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येतीय. शपथविधीपूर्वीच थलापती विजय अडचणीत तमिळनाडूमध्ये सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू असतानाच TVK प्रमुख थलापती विजय यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यांच्या विरोधात कथित आयकर अनियमिततेप्रकरणी FIR दाखल करण्याची मागणी करणारी याचिका मद्रास हायकोर्टात दाखल करण्यात आलीय. त्यामुळे शपथविधीपूर्वीच विजय यांच्या राजकीय वाटचालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. या याचिकेला हायकोर्टाच्या रजिस्ट्रारकडून क्रमांक देण्यात आला असून लवकरच या प्रकरणावर सुनावणी होण्याची शक्यता आहे. ही याचिका 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या Puli या चित्रपटाशी संबंधित आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर आयकर विभागाने विजय यांच्याशी संबंधित ठिकाणी छापे टाकले होते. या कारवाईदरम्यान काही आर्थिक अनियमिततेचे संकेत मिळाल्याचा दावाही याचिकेत करण्यात आलाय. एपस्टीनने मृत्यूआधी लिहिलेलं पत्र आलं समोर जगभरात चर्चेत राहिलेल्या जेफरी एपस्टीन प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. न्यू यॉर्कच्या तुरुंगात झालेल्या एपस्टीनच्या रहस्यमयी मृत्यूनंतर अनेक वर्षांनी, त्याने लिहिलेली एक चिठ्ठी अमेरिकेच्या न्यायालयाने सार्वजनिक केली आहे. या पत्रामुळे एपस्टीनच्या आत्महत्येच्या थिअरीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.हे पत्र एपस्टीनच्या मृत्यूच्या काही आठवड्यांपूर्वीचे असल्याचे सांगितले जात आहे. जुलै2019 मध्ये जेव्हा त्याने पहिल्यांदा आत्महत्येचा प्रयत्न केला होता, तेव्हा त्याच्या सेलमध्ये असलेल्या एका सहकैद्याला हे पत्र एका ‘ग्राफिक नोव्हेल’च्या पानांमध्ये दबलेले आढळले होते. आता हे पत्र समोर आल्यानंतर, त्याने हे दबावाखाली लिहिले होते की तो खरोखरच यंत्रणांना आव्हान देत होता, याचा तपास पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. पंजाब किंग्जचा सलग तिसरा पराभव आयपीएलच्या 19 व्या हंगामात गेल्या महिन्याभरापासून गुणतालिकेत पहिल्या स्थानावर असणाऱ्या पंजाब किंग्जला मोठा धक्का बसला आहे. श्रेयस अय्यरच्या पंजाब किंग्जचा सलग तिसरा पराभव झाल्यानं ते दुसऱ्या स्थानी घसरले आहेत. सनरायजर्स हैदराबादनं पंजाब किंग्जला पराभूत करत गुणतालिकेत पहिल्या स्थानावर झेप घेतली. सनरायजर्स हैदराबादनं प्रथम फलंदाजी करताना 20 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून 235 धावा केल्या होत्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना पंजाबचे फलंदाज टिकाव धरू शकले नाहीत. एकट्या कूपर कॉनोलीनं पंजाबकडून प्रतिकार केला, मात्र त्याची कामगिरी संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही. पंजाबचा संघ 20 ओव्हरमध्ये 7 बाद 202 धावाच करू शकला.यामुळं त्यांचा 33 धावांनी पराभव झाला. या पराभवानं त्यांची गुणतालिकेत पहिल्या स्थानावरुन दुसऱ्या स्थानी घसरण झालीय. नॅशनल क्रश गिरिजा ओकने लूक बदलला Top 10 News : आपल्या सहज सुंदर अभिनयाने लाखो प्रेक्षकांची मनं जिंकून घेणारी प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री म्हणून गिरिजा ओकला ओळखलं जातं. गेल्या काही महिन्यांपासून गिरिजा ‘नॅशनल क्रश’ म्हणून नावारुपाला आली आहे. सोशल मीडियावर सुद्धा ती नेहमीच सक्रिय असते…. गिरिजाने नुकत्याच शेअर केलेल्या एका व्हिडीओने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. गिरिजाचा बदललेला आणि नवीन लूक या व्हिडीओमध्ये पाहायला मिळतोय. आता अभिनेत्रीने तिच्या हेअरस्टाइलमध्ये बदल केला आहे. Curtain bangs हेअरकटमध्ये गिरिजा खूपच गोड दिसतेय. गिरिजाचा हा हटके लूक पाहून चाहत्यांनी व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. दरम्यान, गिरीजाचे निळ्या साडीतले फोटो सर्वत्र तुफान व्हायरल झाले होते; यानंतर तिला ‘न्यू नॅशनल क्रश’ म्हणू ओळख मिळाली होती.