पुणे-मुंबई आणि मुंबई-पुणे महामार्गावरची वाहतूक अखेर सुरळीत Top 10 news: पुणे-मुंबई आणि मुंबई-पुणे महामार्गावरची वाहतूक पुन्हा एकदा सुरळीत सुरु झाली आहे. तब्बल 32 तासांच्या प्रयत्नानंतर पडलेला गॅस टँकर अखेर हटवण्यात यश आलं आहे. मुंबई–पुणे मार्गावरील अपघातग्रस्त गॅस टँकर अखेर तब्बल 32 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर रस्त्यावरून हटवण्यात प्रशासनाला यश आले आहे. टँकर हटवण्याची प्रक्रिया अत्यंत सावधगिरीने पार पाडण्यात आलीय. टँकरमध्ये काही प्रमाणात गॅस शिल्लक असल्याची शक्यता असल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी फायर ब्रिगेडच्या गाड्यांकडून सतत पाण्याचा मारा करण्यात येत होता. संपूर्ण परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक ठेवण्यात आली होती. या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये पोलीस यंत्रणा, एनडीआरएफची टीम, फायर ब्रिगेडचे जवान, ओएनजीसीमधील तज्ज्ञ पथक, सीआयएसएफचे जवान तसेच स्थानिक स्वयंसेवक यांनी समन्वयाने काम केले. सर्व यंत्रणांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे संभाव्य मोठा धोका टळला. पुण्यातील जमीन व्यवहार प्रकरणी पार्थ पवारांना क्लीन चीट पुण्यातील बहुचर्चित मुंढवा येथील जमीन व्यवहार प्रकरणी एक मोठी बातमी समोर आली आहे. या प्रकरणी राज्य सरकारने नियुक्त केलेल्या विकास खारगे समीतीचा अहवाल समोर आलाय. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना क्लीन चीट दिली आहे. यामुळे या प्रकरणी पार्थ पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. विकास खारगे यांच्या चौकशी समीतीने अहवाल दिला असून, या अहवालात पार्थ पवार यांचा प्रत्यक्ष संबंध किंवा स्वाक्षरी आढळली नाही. ज्यामुळे त्यांना या प्रकरणातून मुक्त करण्यात आले आहे. तर दिग्विजय पाटील यांना दोषी धरण्यात आले आहे. कंपनीने चुकीच्या पद्धतीने सवलती उपभोगल्याबद्दल त्यांच्याकडून २१ कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क वसूल करण्याची शिफारस समितीने केली आहे. जमीन व्यवहार प्रकरणात अनेकांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये तत्कालीन तहसीलदार सूर्यकांत येवले आणि उपनिबंधक रवींद्र तारू यांना निलंबित करण्यात आले. मुख्य संशयित जमीन विक्रेता शीतल तेवजानी हिलाही अटक करण्यात आली. सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीवरून जयंत पाटलांचा भाजपवर हल्लाबोल अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी तातडीने उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यावरून शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. जे हिंदू हिंदू बोलून मतं मागतात त्यांना लाजलज्जा राहिलेली नाही अशी टीका जयंत पाटील यांनी केली. ते मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान पद नव्हते त्यामुळे 15 दिवसांनी शपथ घेतली असती तर काय बिघडलं असतं असा सवालही त्यांनी उपस्थित केला. यांच हिंदुत्व सोयीनुसार असतं असंही जयंत पाटील म्हणाले.दरम्यान , त्यांच्या टीकेवर आता भाजप नेमकी काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं गरजेचं आहे. राष्ट्रवादीचे विलिनीकारणावर शिंदेसेनेत दोन सूर अजित पवारांच्या अपघाती निधनाच्या दुसऱ्या दिवसापासून महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वाधिक चर्चा रंगलीय ती दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाची. अजितदादांसोबत विलिनीकरणाची चर्चा झाली होती आणि त्यासाठी 12 फेब्रुवारी ही तारीख ठरली होती, असं खुद्द शरद पवार आणि त्यांचे नेते सांगत आहेत. तर असा काही निर्णय भाजपला विश्वासात घेतल्याशिवाय अजितदादांनी घेतलाच नसता, असं म्हणत थेट मुख्यमंत्र्यांनीच शरद पवारांच्या दाव्यावर शंका उपस्थित केली. तर जे चर्चेत नव्हते, त्यांना विलिनीकरणाचं कसं माहीत असेल? त्यांना भाष्य करण्याचा अधिकार काय आहे? असा प्रतिसवाल करत शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर दिलं. मात्र आता या सर्वात शिंदेसेनेच्या नेत्यांनी देखील उडी घेत या प्रकरणावर शिंदेंच्या नेत्यांमध्ये दोन गट पडल्याचे दिसत आहेत. काही नेते विलीनीकरणाच्या बाजूने आहेत तर काही असं काही घडलं नसल्याचं मानत आहेत. त्यामुळं आता भविष्यात राज्यात कोणती मोठी घडामोड घडणार का हे पाहणं गरजेचं आहे. कुंभमेळ्यात श्रमदान करणाऱ्या विद्यार्थ्यांना गुणदान Top 10 news: नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्यात वेगवेगळ्या कामांमध्ये योगदान देऊन प्रशासनाला मदत करणाऱ्या विद्यार्थ्यांना दोन श्रेयांक देण्यात येणार आहेत. प्रामुख्याने नाशिक जिल्ह्यातील महाविद्यालयांसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने हा निर्णय घेतला असून, येत्या काही दिवसांत या निर्णयाला अंतिम रूप देण्यात येणार आहे.विद्यार्थ्यांना ‘ओपन इलेक्टिव्ह क्रेडिट’अंतर्गत दोन श्रेयांक देण्याची तरतूद आहे. दोन श्रेयांकांसाठी ६० तास काम करणे आवश्यक आहे. त्यामुळे श्रेयांक मिळण्याचे निकष पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना श्रेयांक दिले जातील.मात्र या निर्णयाला विद्यार्थी संघटनांकडून आक्षेप घेतला जाणार आहे. २० लाख लाडक्या बहिणींचे ₹१५०० कायमचे बंद मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाखो महिलांचा लाभ थांबवला आहे. या योजनेच्या तब्बल २० लाख महिलांचे ई केवायसीतील चुकांमुळे लाभ बंद झाला आहे. या महिलांची आता ई केवायसी पुन्हा सुरु झाली आहे. यामध्ये राज्यातील विविध जिल्ह्यातील महिलांचा समावेश आहे.लाडकी बहीण योजनेत एकूण २० लाख महिलांचा केवायसी न केल्याने लाभ बंद झाला आहे. या महिलांची पडताळणी करण्याची जबाबदारी अंगणवाडी सेविकांवर आहे. मात्र, ही पडताळणी फक्त नावालाच सुरु असल्याचे सांगितले जात आहे. ई केवायसी पडताळणीची प्रोसेस जर झाली तर महिलांना पैसे मिळणार आहे. नोव्हेंबरपासूनच काही महिलांचा लाभ बंद झाला आहे. जर ही पडताळणीची प्रक्रिया बंद राहिली तर पैसे येण्यास अजून उशीर होऊ शकतो. युपीएससीकडून नागरी सेवा परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध केंद्रीय लोकसेवा आयोगानं नागरी सेवा परीक्षा 2026 चं नोटिफिकेशन जारी केलं आहे. देशभरातून या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची अपडेट आहे. देशातील लाखो तरुण आणि तरुणी आयएएस, आयपीएस आणि आयएफएस सेवेत नोकरीची संधी मिळावी यासाठी प्रयत्न करत असतात. या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा एक संधी उपलब्ध झाली आहे. यूपीएससीकडून जाहीर करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार 933 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. यूपीएससीकडून नागरी सेवा पूर्व परीक्षेसाठी अर्ज दाखल करुन घेण्यास सुरुवात झाली आहे. अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया 4 फेब्रुवारी पासून सुरु झाली आहे. अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस 24 फेब्रुवारी 2026 आहे. 24 फेब्रुवारीला सायंकळी 6 वाजेपर्यंत अर्ज दाखल करता येऊ शकतात. ज्या विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी अर्ज करायचा आहे. ते upsc.gov.in या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज सादर करु शकतात. आयोगाच्या सूचनेनुसार विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल करण्यापूर्वी अटी, अर्ज, वयोमर्यादा आणि इतर गोष्टींसंदर्भातील नियम जाणून घेणं आवश्यक आहे. पाकिस्तान भारताविरूद्धच्या टी-२० सामने खेळणार नाही टी२० विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार नसल्याचे आता जवळपास निश्चित झालेय. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी बुधवारी भारताविरूद्धच्या टी-२० विश्वचषक सामन्यावर बहिष्कार टाकण्याच्या निर्णयाचा पुनरुच्चार केला. ते म्हणाले की, १५ फेब्रुवारी रोजी श्रीलंकेत होणार्या सामन्याबाबत पाकिस्तानने स्पष्ट भूमिका घेतली आहे. दरम्यान, पाकिस्तानच्या या निर्णायानंतर आता आयसीसीकडून काय निर्णय जारी करणार, याकडे क्रिकेट चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत. दरम्यान, याआधीच बांगलादेशने टी२० विश्वचषकातून माघार घेतली होती. आता पाकिस्तानने भारताविरोधात खेळण्यास नकार दिलाय. दरम्यान, आयसीसीकडून पाकिस्तानला भारातविरोधातील सामन्यात न खेळल्यास मोठा फटका बसण्याचे गणित सांगितले होते. आम्ही ट्रम्प जाण्याची वाट पाहू Top 10 news: भारत आणि अमेरिका यांच्यात एक व्यापार करार झाला आहे, जो राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे सहयोगी देश अमेरिकन जनतेसाठी एक मोठा विजय म्हणून सांगत आहेत. मात्र , एका अहवालात या दाव्यांना विरोध केल्याचं सांगितल आहे. अहवालात असा दावा करण्यात आला आहे की भारताने ट्रम्पच्या हट्टीपणाला तीव्र विरोध केला आहे आणि जर व्यापार करार झाला नाही तर ट्रम्पचा कार्यकाळ संपेपर्यंत भारताकडून वाट पाहिली जाईल. अहवालात असे म्हटले आहे की सप्टेंबर २०२५ च्या सुरुवातीला भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांच्यात झालेल्या खाजगी बैठकीत भारताने कडक भूमिका घेतली. डोभाल यांनी रुबियो यांना स्पष्टपणे सांगितले की डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या सहयोगी देशांच्या धमक्यांना भारत घाबरणार नाही आणि जर तणाव कमी झाला नाही तर ते व्यापार करारासाठी २०२९ पर्यंत वाट पाहू शकतात, असे म्हटले आहे. “अजितदादा महाराष्ट्राचे लाडके नेते होते आणि राहतील अजित पवारांच्या अपघाती निधनाने राज्यासह अख्खा देश हळहळला,त्यातच आता कलाकार गौतमी पाटीलने देखील अजित पवारांच्या निधनावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. दादा महाराष्ट्राचे लाडके नेते होते. जे घडलं ते खूप वाईट झालं. दादांचा कलाकारांना पाठिंबा कायम असायचा. अजितदादांकडे कुठलंही काम घेऊन गेलं तर ते होणारच याची खात्री असायची, आम्ही भेटलो नाही. पण माझ्याबाबतीत दोन शब्द जरी बोलले असतील तेच माझ्यासाठी खूप आहे. महाराष्ट्र दादांना कधीही विसरणार नाही. ते महाराष्ट्राचे लाडके नेते होते आणि कायम लाडके नेतेच राहतील.असं तिनं म्हटलंय.