विधानपरिषदेसाठी एकनाथ शिंदेंनी दोन नेते निवडले Top 10 News: येत्या काही दिवसांमध्ये राज्यातील विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी होऊ घातलेल्या निवडणुकीच्यानिमित्ताने महाराष्ट्रातील राजकारणात रंगत आलीय. या निवडणुकीच्यादृष्टीने एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत सध्या वेगवान हालचाली सुरु आहेत. या निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे यांनी उमेदवार म्हणून विधापरिषदेच्या माजी उपसभापती नीलम गोऱ्हे आणि बच्चू कडू यांची नावे अंतिम केल्याचे सांगितले जात होते. मात्र, आता या दोन्ही नावांना शिवसेनेच्या अंतर्गत वर्तुळातून प्रचंड विरोध असल्याची माहिती समोर आली आहे. विधानपरिषदेत निवडून येण्यासाठी एका उमेदवाराला 28 मतांचा कोटा आवश्यक असतो. शिवसेनेचे विधानसभेतील संख्याबळ हे 57 असून विधान परिषदेची दुसरी जागा निवडून येण्यास कोणतीही अडचण नाही. मात्र, या दोन जागांसाठी शिवसेनेतील अनेक नेते इच्छूक असून त्यामुळे आता नीलम गोऱ्हे आणि बच्चू कडू यांच्याच नावाला पक्षातून मोठ्याप्रमाणात विरोध सुरु झाल्याची माहिती आहे. अकोल्यात उन्हाचा पारा 46.9 अंशांवर विदर्भातील अकोला शहरात सध्या सूर्य अक्षरशः आग ओकत असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय. रविवारी अकोल्यात तापमानाचा पारा तब्बल 46.9 अंश सेल्सिअस वर पोहोचला असून, ही या मोसमातील आतापर्यंतची सर्वाधिक तापमानाची नोंद आहे. विशेष म्हणजे, अकोला सध्या जगातील सर्वाधिक उष्ण शहरांच्या यादीत वरच्या क्रमांकावर पोहोचलंय. अकोल्यात 29 एप्रिल 2019 रोजी 47.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. सध्याची परिस्थिती पाहता, पुढील दोन दिवसांत हा ऐतिहासिक विक्रम मोडला जाण्याची दाट शक्यता हवामान खात्याने वर्तवलीय. गेल्या सहा दिवसांपासून अकोल्याचा पारा सातत्याने 43 अंशांच्या पुढे सरकत आहे. वाढत्या उष्णतेमुळे अकोल्यातील रस्ते दुपारी 12 ते 4 या वेळेत अक्षरशः निर्मनुष्य पाहायला मिळतायत. उष्णतेच्या लाटेमुळे नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळले असून, अत्यावश्यक कामाशिवाय कोणीही बाहेर पडत नाहीये. वाढत्या उन्हाचा फटका पशू-पक्ष्यांनाही बसत दिसून येतोय. ‘लाडकी बहीण’योजनेच्या ई-केवायसीसाठी अखेरचे ४ दिवस Ladki Bahin Yojana राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’च्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. या योजनेच्या ई-केवायसीसाठी आता केवळ चार दिवस उरले असून, 30 एप्रिल ही शेवटची मुदत असणार आहे. महिला व बाल विकास विभागाने आतापर्यंत तीन वेळा मुदतवाढ देऊनही राज्यातील सुमारे 26 लाख 34 हजार महिलांनी अद्याप ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. त्यामुळे हे लाभार्थी अपात्र ठरण्याची दाट शक्यता निर्माण झालीय. राज्यात एकूण 2 कोटी 47 लाख लाभार्थी आहेत. मात्र, कागदपत्रांच्या कमतरतेमुळे 26 लाखांहून अधिक महिलांची ई-केवायसी रखडलीय. 30 एप्रिल रोजी बँक बंद होण्याच्या वेळेपर्यंत ही लिंक सुरू राहणार आहे. सध्याची उष्णतेची लाट आणि दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता सरकारने ही शेवटची संधी दिलीय. या चार दिवसांत प्रक्रिया पूर्ण न झाल्यास हे 26 लाख लाभार्थी योजनेतून कायमचे बाद होण्याची शक्यता वर्तवण्यात येतीय. लातूर जिल्ह्यात उष्माघाताचा तिसरा बळी लातूर जिल्ह्यात उष्माघाताच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून आणखी एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. औसा तालुक्यातील एरंडी गावात तीव्र उन्हामुळे 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. महेश लिंबाजी इंगोले असं या तरुणाचं नाव आहे. यामुळं परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे मृत तरुणाचे नाव महेश लिंबाजी इंगोले असे आहे. तो शेतातील काम आटोपून घरी परतल्यानंतर अचानक त्याला चक्कर आली आणि तो खाली कोसळला. कुटुंबीयांनी तातडीने त्याला सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र उष्माघातामुळे त्याचा जागीच मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. यापूर्वीही जिल्ह्यात उष्माघाताच्या दोन घटना समोर आल्या होत्या. औसा तालुक्यातील गोंद्री गावात नऊ महिन्यांच्या बाळाचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. तसेच औराद शहाजनी येथे 60 वर्षीय शेतकऱ्याचाही प्रखर उन्हामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या तीन घटनांमुळे जिल्ह्यातील मृतांचा आकडा तीन वर पोहोचला आहे. राज्यातील कृषी सेवा केंद्र आजपासून बेमुदत संपावर Top 10 News: राज्यभरातील 85 हजार कृषी सेवा केंद्र आजपासून बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय खते आणि बियाणे विक्रेत्यांनी घेतला आहे. केंद्र आणि राज्यसरकारच्या जाचक धोरणाच्या विरोधासह विविध मागण्यासाठी कृषी केंद्र चालकांच्या माफदा संघटनेतर्फे हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान या निर्णयाला देशभरातील अनेक राज्यातील कृषी केंद्र चालकांनी पाठिंबा दिला आहे. कृषी केंद्र चालकांच्या मागण्या मान्य न झाल्यास पॉसमशीन शासनाकडे जमा करण्याचा इशाराही संघटनेकडून देण्यात आला आहे. माफदा संघटनेचे राज्य अध्यक्ष विनोद तराळ यांनी हि माहिती दिलीय. केंद्र तसेच राज्य सरकारकडून घेण्यात आलेले निर्णय हा कृषी केंद्र चालकांच्या विरोधात आहेत, त्या निर्णयात बदल करण्यात यावा, यासह विविध मागण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याच त्यांनी म्हटलंय. भावना दुखावल्या असतील तर माफी मागतो छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या एका वक्तव्यावरून वादात सापडलेल्या बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांनी माफी मागितीली आहे. आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला. आपल्या वक्तव्यामुळे जर कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्याबद्दल मनापासून माफी मागतो, असं धीरेंद्र शास्त्री म्हणालेत. ज्यांच्या स्वराज्यापासून प्रेरणा घेऊन आम्ही हिंदू राष्ट्राचा संकल्प केला, त्यांची अवमानना तर दूरच पण स्वप्नातही कुणी निंदा केली तर ती सहन करणार नाही, असं धीरेंद्र शास्त्री म्हणाले आहेत.नागपूरमधील एका कार्यक्रमात धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदासांसंबंधी एक वक्तव्य केलं होतं. त्यानंतर राज्यभरातून त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. यानंतर धीरेंद्र शास्त्री यांनी आता त्यांच्या वक्तव्यावरुन स्पष्टीकरण देत माफीनामा सादर केला आहे. काही लोकांनी माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावलाय असं त्यांनी म्हटलंय. इराणचे सर्वोच्च नेते मोजताबा खोमेनींचा मृत्यू ? आखाती युद्ध अद्याप पेटलेलं असताना इराणमधून आलेल्या एका बातमीनं जगाचं लक्ष वेधून घेतलंय…इराणची सर्वात शक्तिशाली लष्करी संघटना ‘इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स’नं शहीद झालेल्या इराणी अधिकाऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी एक व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओत इराणचे सर्वोच्च नेते मोजताबा खोमेनी यांचाही फोटो शहीद म्हणून झळकल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे मोजताबा खोमेनींचा मृत्यू झालाय का? असा सवाल उपस्थित केला जातोय. शत्रूराष्ट्रांच्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खोमेनींचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांचे पुत्र मोजताबा खोमेनींकडे इराणची सुत्र आली. मात्र तेही हल्ल्य़ात गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. कारण त्यांनी एकदाही अमेरीका, इस्त्राईलच्या हल्ल्यासंदर्भात ठोस भूमिका मांडली नाही.दरम्यान IRGCनं जारी केलेल्या शहीदांच्या पोस्टरमध्ये मोजताबा खोमेनींचा फोटो असल्याचं हा तांत्रिक घोळ आहे की त्यांचा खरोखरचं मृत्यू झालाय? इराणनं आपली पकड घट्ट ठेवण्यासाठी मोजताबांच्या मृत्यूची बातमी दाबून ठेवली का? असे अनेक प्रश्न उपस्थित होतायत…मात्र मोजताबा खोमेनींचा मृत्यू झालाय हे सत्य असेल तर इराणी सत्तेसाठी हा मोठा धक्का माँनाला जातोय. मालीत एकाच वेळी अनेक शहरांमध्ये बॉम्बस्फोट मालीचे संरक्षण मंत्री सादियो कामारा यांच्या निवासस्थानी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ते आणि त्यांचे कुटुंब ठार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. या हल्ल्यात कामारा, त्यांची पत्नी आणि त्यांची दोन नातवंडे ठार झालीत. राजधानी बामाकोच्या बाहेरील लष्करी राजवटीचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या किटा याठिकाणी कामारा यांच्या निवासस्थानी कार बॉम्बने हा हल्ला झाला. कामारा यांचे कुटुंब आणि एका अधिकाऱ्याने रविवारी या हल्ल्याची माहिती दिलीय. माली देश एका दशकाहून अधिक काळापासून हिंसाचाराशी झुंज देत आहे. गेल्या दोन दिवसांत विशेषतः शनिवारी या हिंसाचारात मोठी वाढ झाल्याची पाहायला मिळाली. २०२० मध्ये देशात लष्कराने सत्ता काबीज केल्यापासून शनिवारचे हल्ले हे सर्वात प्राणघातक मानले जातायेत. यंदाच्या हंगामातील पहिला सुपर ओव्हर सामना आयपीएल 2026 च्या हंगामात काल कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना खेळवण्यात आला. लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार ऋषभ पंतने नाणेफेक जिंकून कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार अजिंक्य रहाणेला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. रिंकू सिंगच्या धमाकेदार अर्धशतकाच्या जोरावर केकेआरने 20 षटकांत 7 गडी गमावून 155 धावा केल्या. एलएसकेनेही 20 षटकांत 8 गडी गमावून 155 धावा केल्या. डावाच्या शेवटच्या चेंडूवर शमीने कार्तिक त्यागीच्या गोलंदाजीवर षटकार मारून सामना सुपर ओव्हरमध्ये नेला. यामुळे हा आयपीएल 2026 मधील पहिला सुपर ओव्हर सामना ठरला. सुपर ओव्हरमध्ये गेलेल्या या सामन्यात कोलकाताने बाजी मारली. सुपर ओव्हरमध्ये कोलकाताच्या सुनील नारायणने लखनौचे दोन्ही फलंदाज केवळ एका धावेत बाद केल्यानंतर रिंकू सिंहने पहिल्याच चेंडूवर चौकार मारत कोलकाताला विजयी केले. यासह कोलकाताने तळाचे स्थान सोडताना आठव्या स्थानी झेप घेतली. ‘त्या’ मराठी माणसाला तुम्ही पहिली सक्ती करा Top 10 News: रिक्षा आणि टॅक्सी चालकांना आता मराठी भाषेच्या सक्तीच्या इशाऱ्याने राज्यातील वातावरण चांगलंच तापलंय. यावर सर्व स्तरातून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. त्यातच कमळी फेम अभिनेत्री सुषमा जयवंत हिने यावर आपले परखड मत मांडलंय. सोशल मीडियावर एक पोस्ट करत तिने तुम्ही यूपीवाल्यांना जर मराठी येत नसेल, तर गाडी चालवून देणार नाही. मान्य आहे… खूप छान, पण जेव्हा ते परवाना घ्यायला येतात, तेव्हा सरकारकडून किंवा त्यांना जो परवाना मिळतो, तो दिलाच का जातो? तेव्हा का कुणी सक्ती करत नाही? दुसरा प्रश्न, भैय्या जेव्हा भाजी विकत असतो तेंव्हा ये भाजी कितने मे दी?’ हे बोलणारा मराठी माणूस आहे ना! त्याला तुम्ही पहिली सक्ती करा…” “तुम्ही स्वत: पहिल्यांदा मराठीत बोला… आपण मराठी बोलायची लाज बाळगतो आणि आपण इतरांना सांगतो की मराठी बोला… काय लॉजिक आहे? तुम्ही आपल्या मुलांना किती मराठी माध्यमात शिकायला पाठवत आहात? भाषेचं बंधन असणं, नसणं मला कळत नाही… पण हे जे काही ‘तू गलत है, तू गलत है’ चाललंय… त्यात तू पण चुकीचाच आहेस. याच्याबद्दल विचार करा आणि याच्याबद्दल नक्की मत मांडा… मला नक्कीच चर्चा करायला आवडेल…”, असं अभिनेत्री सुषमा जयवंत हिनं शेवटी म्हटलं आहे.