रुपाली चाकणकर फरार…रुपाली पाटील-ठोंबरेंच्या पोस्टने खळबळ Top 10 News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली चाकणकर यांनी अशोक खरातच्या पाद्यपूजेचा व्हिडीओ समोर आला. तसेच अशोक खरात आणि रुपाली चाकणकर यांचे विविध कार्यक्रमातील फोटोही समोर आल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. याचदरम्यान, रुपाली चाकणकरांच्याच पक्षातील नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टची चर्चा रंगली आहे. राज्य महिला आयोगाच्या रुपाली चाकणकर फरार…बजाव ताली…अशी पोस्ट रुपाली पाटील यांनी केली आहे. रुपाली पाटलांच्या या पोस्टमुळे एकच खळबळ उडाली आहे. Top 10 News दरम्यान, अशोक खरात प्रकरणी काल रुपाली पाटील-ठोंबरे यांनी पत्रकार परिषद घेत रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी देखील केली होती. नाशिकमधील विषय कोणत्या पक्षाचा, जातीचा नाही हा महिलांचा आहे. खरंच ट्रस्टवर राज्य महिला आयोग अध्यक्ष रूपाली चाकणकर आहेत. त्यामुळे पोलीस कारवाई करत नव्हते का? 58 व्हिडीओ आहेत म्हणजे 58 महिलांवर अत्याचार झाला आहे का? रुपाली चाकणकर राज्य महिला आयोग अध्यक्षपदावरुन पायउतार झाल्या पाहिजे. त्याशिवाय तपास पूर्ण होणार नाही.” असं म्हटलंय. 1 एप्रिलपासून फास्टॅग टोल पास महागणार Top 10 News राष्ट्रीय महामार्गांवर प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. FASTag Annual Pass आता महाग होणार असून 1 एप्रिल 2026 पासून नव्या दरांची अंमलबजावणी होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडून वार्षिक पासच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने फास्टॅगच्या किमतीत 75 रुपयांनी वाढ केली आहे. आधी हा पास 3000 रुपयांना मिळायचा. 1 एप्रिल पासून हा पास 3,075 रुपयांना मिळणार आहे. या निर्णयामुळे FASTag Annual Pass ने महाग झाला आहे. नवीन दर 1 एप्रिल 2026 पासून लागू होणार असून लाखो वाहनचालकांवर याचा थेट परिणाम होणार आहे. FASTag Annual Pass हा प्रामुख्यानं खाजगी वाहनांसाठी लागू आहे. या पासमध्ये 1 वर्षाची वैधता किंवा 200 टोल प्रवास (जे आधी पूर्ण होईल) अशी सुविधा मिळते. यामुळे वारंवार टोल भरण्याची गरज कमी होते आणि प्रवास अधिक सोपा आणि जलद होतो. हा पास ऑनलाइन सहज उपलब्ध आहे.‘Rajmarg Yatra’ (राजमार्ग यात्रा) अॅप किंवा अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करता येतो. आज महाराष्ट्रावर 11 लाख कोटींचे कर्ज Top 10 News Raj thackeray गुढीपाडव्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी विविध विषयांवर भाष्य केले. शेतकरी आत्महत्येच्या मुद्यांवर देखील राज ठाकरे यांनी भाष्य केलं. तसेच राज्यावर असणाऱ्या कर्जाच्या संदर्भात बोलताना राज ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्रफडणवीस यांना टोला लगावला. पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना राज्यावर 2 लाख कोटींचं कर्ज होतं. आज ते कर्ज 11 लाख कोटींवर गेलं असल्याचे राज ठाकरे म्हणाले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळातील महाराष्ट्राची तुलना राज ठाकरे यांनी केली. राज्यावर कर्ज किती आणि याआधी किती होतं? याची मांडणी करताना आजी माजी मुख्यमंत्र्यांची राज ठाकरेंनी तुलना केली. संदर्भ देताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. मुख्यमंत्री बोलत आहेत, विकास करत आहोत, विकास करत आहोत, महाराष्ट्राला तीन ट्रिलियनची इकॉनमी बनवायचे आहे असे बोलत आहेत. पण महाराष्ट्रावर 11 लाख कोटींचे कर्ज असल्याचे राज ठाकरे म्हणाले. पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात फक्त 2 लाख कोटींचे कर्ज महाराष्ट्रावर होते असे राज ठाकरे म्हणाले. अवकाळी पावसाने राज्याला झोडपलं Top 10 News : राज्यात उन्हाचा कडाका कमी होऊन पावसाला पोषक वातावरण निर्माण झालं आहे. गेले काही दिवस मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. काल जालना, वाशीम, नाशिक, पुणे येथे वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. तसेच बहुतांश भागात गारपीट झाली. आज मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता असल्याने येलो अलर्ट देण्यात आला. उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या पावसाची शक्यता आहे.आज मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे, मेघगर्जना, विजांसह वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज असल्याने येलो अलर्ट देण्यात आला आहे. रम्यान काल झालेल्या पावसाने राज्याला चांगलेच झोडपले. याचा फटका हंगामी फळांना आणि भाज्यांना बसला आहे. हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसामुळे वाया गेल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. भारत आता रशियाकडून LPG खरेदी करणार आखाती देशांत युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली असल्याचा फटका भारताला बसत आहे. भारतात गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याचा दावा विरोधक करत आहेत. मात्र, नागरिकांनी या अफवांना बळी पडू नये, गॅसचा साठा पुरेसा उपलब्ध असल्याचा दावा केंद्र सरकारकडून केला जात आहे. मात्र, असं असलं तरी LPG गॅस सिलिंडरसाठी अनेक शहरांत नागरिकांच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळत आहे. देशात एलपीजी गॅसची टंचाई निर्माण होऊ नये म्हणून आता भारत सरकार मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. भारत आता रशियाकडून एलपीजी खरेदी करण्याची शक्यता आहे. याबाबतचे संकेत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी दिले आहेत. रणधीर जयस्वाल यांनी,’मध्य पूर्वेतील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ऊर्जा पुरवठ्यासाठी आपले पर्याय वाढवण्यासाठी केंद्र सरकार सर्व ठिकाणांहून एलपीजी खरेदी करण्याचा प्रयत्न करत आहे. लोकांच्या इंधनाच्या गरजा पूर्ण होतील याची खात्री सरकार करत आहे” असे म्हटले. युद्धाने अमेरिकेवरील कर्जाचा बोजा वाढला इराण युद्ध सुरू होऊन जेमतेम तीन आठवडेही होत नाहीत तोवरच अमेरिकेवरील आर्थिक दबाव वाढत चालल्याचं दिसून येतंय. जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिकेचं कर्ज झपाट्याने वाढतंय. अमेरिकेवरचं एकूण कर्ज 39 ट्रिलियनडॉलर्सपेत्रा जास्त असल्याची माहिती आहे. फक्त दोन महिन्यांपूर्वी हे कर्ज सुमारे 37 ट्रिलियन डॉलर्सच्या आसपास होतं. आता युद्ध सुरू झाल्यानंतर त्यामध्ये मोठी भर पडल्याचं दिसतंय. काही तज्ञांच्या मते, अमेरिकेवरील कर्जाचा हा आकडा लवकरच 40 ट्रिलियन डॉलर्सच्या दिशेने जाऊ शकतो. मात्र या कर्जसंकटात अमेरिकेचा संरक्षण विभाग पेटांगनकडून एक मोठी मागणी समोर आली आहे. पेंटागनने अमेरिकन संसदेपुढे युद्धसज्जता आणि शस्त्रनिर्मितीसाठी सुमारे 200 अब्ज डॉलर्सची मागणी केली आहे. त्यामुळे आता अमेरिकेची संसद नेमकी काय निर्णय घेते हे पाहावं लागेल. इराणच्या हल्ल्यात आखाती देश हादरले इस्त्रायलने गॅसफिल्डवर हल्ला केल्यानंतर इराणने प्रतिहल्ला करत सौदी अरेबिया, कुवेत, कतार आणि यूएईमध्ये गॅस सुविधा आणि ऑईल रिफानयरींवर मिसाईली तसेच ड्रोनचा मारा केला आहे. सौदी अरेबियातील यान्बू बंदरात असलेल्या समरेफ तेल शुद्धीकरण प्रकल्पावर हवाई हल्ला झाला. होर्मुझची सामुद्रधुनी बंद असल्यामुळे, बहुतेक तेल आता यान्बू बंदरातून पाठवले जात आहे. याशिवाय, संयुक्त अरब अमिराती (UAE) आणि कतारमधील तेल आणि वायू प्रकल्पांवर ड्रोन हल्ले झाले. इराणने सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती आणि कतारमधील तेल प्रकल्पांची राख करण्याचा इशारा दिला आहे. इराणच्या आक्रमक पावित्र्यानंतर सौदीने आज इराणला कडक इशारा दिला आहे. सौदीचे परराष्ट्र मंत्री फैसल बिन फरहान अल सौद म्हणाले की, इराणला प्रत्युत्तर देण्याची आमच्या देशात पूर्ण ताकद आहे. इराणचे हल्ले पूर्वनियोजित असल्याचे दिसते आणि त्यांनी आमच्या संयमाची परीक्षा घेऊ नये.असे म्हणत इराणला इशारा दिला. किम जोंग उन यांचा ९९.९३% मतांनी विजय Top 10 News : उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांनी देशात नुकत्याच झालेल्या संसदीय निवडणुकीत पुन्हा एकदा दणदणीत विजय मिळवला आहे. त्यांच्या ‘वर्कर्स पार्टी ऑफ कोरिया’ आणि मित्रपक्षांना ९९.९३ टक्के मते मिळाली आहेत. १५ मार्च रोजी १५ व्या ‘सुप्रीम पीपल्स असेंब्ली’च्या सदस्यांची निवड करण्यासाठी ही निवडणूक पार पडली. उत्तर कोरियाच्या सरकारी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, सत्ताधारी गटाने पाठिंबा दिलेले सर्व उमेदवार या निवडणुकीत विजयी झाले आहेत. अधिकृत आकडेवारीनुसार, ९९.९३ टक्के लोकांनी किम यांच्या पक्षाच्या बाजूने मतदान केले. मात्र, सरकारी प्रसारमाध्यमांनी हे प्रमाण ९९.९७ टक्के असल्याचे सांगितले असून मतदानाची टक्केवारी आश्चर्यकारक ९९.९९ टक्के इतकी नोंदवण्यात आली आहे. परदेशात किंवा समुद्रात कामावर असल्यामुळे केवळ ०.००३७ टक्के नोंदणीकृत मतदार मतदान करू शकले नाहीत, तर ०.००००३ टक्क्यांहून कमी मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवली, असा दावा करण्यात आलाय. चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का आयपीएलचा 19 वा हंगाम सुरु होण्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज नॅथन एलिस दुखापतीमुळं स्पर्धेबाहेर गेला आहे. चेन्नई सुपर किंग्जकडून आता नॅथन एलिसच्या जागी बदली खेळाडूचा शोध घेतला जात आहे. स्पोर्टस्टारच्या रिपोर्टनुसार नॅथन एलिस हॅम स्ट्रिंगच्या दुखापतीमुळं स्पर्धेबाहेर गेला आहे. नॅथन एलिस आयपीएलबाहेर गेल्यानं चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का बसला आहे. चेन्नई सुपर किंग्जच्या टीमसाठी डेथ ओव्हर स्पेशालिस्ट म्हणून नॅथन एलिस महत्त्वाची कामगिरी करु शकला असता. स्पोर्ट स्टार नुसार चेन्नई सुपर किंग्ज नव्या खेळाडूच्या शोधात आहे. चेन्नई सुपर किंग्जचे सीईओ के.एस. विश्वनाथन यांनी नॅथन एलिस महत्त्वाचा वेगवान गोलंदाज होता,तो डेथ ओव्हरमध्ये महत्त्वाची कामगिरी करु शकला असता. आमच्यासाठी हा मोठा धक्का असल्याचं म्हटलं. सीएसकेचा यापूर्वीचा वेगवान गोलंदाज मथीशा पथिराना या हंगामात केकेआरकडून खेळणार आहे. केकेआरनं पथिरानासाठी 18 कोटी रुपये मोजले आहेत. फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांना मातृशोक मनोरंजन विश्वातून दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध फॅशन डिझायनरच्या आईचे निधन झाले. बॉलिवूडचा प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राची आई म्हणजे गरिमा मल्होत्रा यांनी वयाच्या 94 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. मनीष मल्होत्राच्या आईच्या निधनाची बातमी समजताच अवघे बॉलिवूड मनीष मल्होत्राच्या निवासस्थानी पोहचले. मनीष मल्होत्रा यांच्या आईचे निधन गुरुवारी संध्याकाळी झाले. सणासुदीलाच मनीष मल्होत्राच्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळला. मनीष मल्होत्राचे आपल्या आईसोबत खूप खास नाते होते. तो कायम सोशल मीडियावर आपल्या आईसोबतचे फोटो शेअर करून प्रेम व्यक्त करायचा. आईच्या अशा अचानक जाण्याने मल्होत्रा कुटुंबावर शोककळा पसरलीय. मनीष मल्होत्रा हे भारतातील एक प्रसिद्ध फॅशन डिझायनर आहेत. बॉलिवूडच्या कलाकारांचे कपडे ते कायम डिझाइन करताना दिसतात. त्यांनी अनेक हिट चित्रपटांसाठी कपडे डिझायन केले आहे. कलाकार आपल्या महत्त्वाचे समारंभांसाठी मनीष मल्होत्रा यांच्याकडून कपडे डिझाइन करून घेतात. त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले आहेत.