अजित पवारांचा अपघात नव्हे घातपातच असल्याचा संशय Top 10 news: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांचा अपघात नव्हे तर घातपातच असल्याचा संशय पवार कुटुंबाला वाटत असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. त्यामुळेच सुनेत्रा पवार, जय आणि पार्थ पवार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. विमान अपघाताप्रकरणी सखोल चौकशी केली जावी आणि व्हीएसआर कंपनीची सर्व विमानं जमिनीवर आणली जावी अशी कुटुंबाची इच्छा असल्याची माहिती आहे. अजित पवारांच्य विमान अपघात प्रकरणी सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार करणार असल्याची माहिती आहे. या आधी आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांच्या अपघातावर शंका उपस्थित केली होती. आता त्यांच्यानंतर दादांच्या कुटुंबीयांनाही या प्रकरणी घातपात झाल्याचा संशय असल्याची माहिती आहे. सध्या व्हीएसआर कंपनीच्या लेअरजेट विमानांवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र या कंपनीची इतर विमानं अद्याप सुरू आहेत. त्यामुळे या विमान कंपनीवर बंदी घालावी अशी मागणी पवार कुटुंबीय पंतप्रधानांकडे करणार असल्याची माहिती आहे. महाराष्ट्राला मिळाले नवे राज्यपाल तेलंगणाचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची आता महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर तेलंगणाच्या राज्यपालपदी हिमाचल प्रदेशची जबाबदारी असलेल्या शिव प्रताप शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी जिष्णू देव वर्मा यांच्या नावाची घोषणा केली. ईशान्य भारतातील अनुभवी राजकारणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिष्णू देव वर्मा यांनी त्रिपुरा राज्याच्या राजकारणात दीर्घकाळ महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्रिपुराच्या राजघराण्याशी संबंधित असलेले जिष्णू देव वर्मा हे भाजपचे ज्येष्ठ नेते मानले जातात. 2018 ते 2023 या कालावधीत त्यांनी त्रिपुराचे उपमुख्यमंत्री म्हणून काम करत राज्याच्या वित्त, ऊर्जा आणि ग्रामीण विकासासारख्या महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी सांभाळली होती. राजकारणातील दीर्घ अनुभव लक्षात घेऊन त्यांची राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली. आधी त्यांनी तेलंगणाचे राज्यपाल म्हणून काम पाहिले. त्यानंतर त्यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्रासारख्या मोठ्या आणि आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या राज्यात त्यांची नियुक्ती ही राजकीय दृष्ट्या महत्त्वाची मानली जाते. दादाविना अर्थ नसलेला अर्थसंकल्प महाराष्ट्र विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. आज राज्याचे मुख्यमंत्री व वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधानसभेत अर्थसंकल्प मांडणार आहेत. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्यामुळं अर्थमंत्रीपदाची जबाबदारी स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी भावना व्यक्त करताना, राज्याचा अर्थसंकल्प सादर होईल, पण यंदाचा अर्थसंकल्प महाराष्ट्रासाठी अजितदादा विना आहे. वर्षानुवर्षे ज्यांच्या अभ्यासू आणि ठाम नेतृत्वाखाली महाराष्ट्राचा अर्थसंकल्प मांडला जायचा, त्या अजितदादांची उणीव उद्या संपूर्ण राज्याला जाणवेल. कागदावर आकडे असतील, योजना असतील; पण दादांची दृष्टी, धडाडी आणि अनुभव यांची कमतरता मात्र उद्या दिसणार. दादाविना अर्थ नसलेला अर्थसंकल्प असे म्हणले. शिवज्योत घेऊन धावणाऱ्या शिवभक्तांना भरधाव कारने चिरडलं पुण्याच्या मावळमध्ये शिवजयंती दिनीचं दोन शिवभक्तांवर काळाने घाला घातलाय. शिवज्योत घेऊन शिंदेवाडीकडे निघालेल्या दोन शिवभक्तांचा अपघातात मृत्यू झालाय. ओंकार दत्ता आरडे आणि दर्शन बाळू शिंदे या शिवभक्तांची नावं होती. विसापूर किल्ल्यावरुन शिवज्योत घेऊन हे शिवभक्त स्वतःच्या गावी म्हणजे शिंदेवाडीला मोठ्या उत्साहात परतत होते. जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील नायगाव जवळ शिवज्योत घेऊन हे शिवभक्त पोहचले. तेव्हा मध्यरात्रीचे दीड वाजले होते. त्याचवेळी विरुद्ध दिशेने एक कार बेदरकारपणे आली त्या कारने दुभाजक भेदत या शिवभक्तांना ही चिरडले. शिवज्योत घेऊन धावत असलेल्या ओंकार आणि दर्शनचा या दुर्घटनेत मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने आंदर मावळात शिवजयंतीच्या दिवशी शोककळा पसरलीय. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळणार ६ हजार रुपये Top 10 news: देशभरातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर येत आहे. आता पीएम किसान योजनेचा हप्ता कधी मिळणार याबाबत महत्त्वाची अपडेट समोर आलीय. याचसोबत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आणखी एक गुडन्यूज मिळणार आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ६००० रुपये मिळणार आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या योजनेतून शेतकऱ्यांच्या खात्यात एकाच वेळी ६००० रुपये जमा होऊ शकतात.पीएम किसान योजनेच्या धर्तीवरच राज्य सरकारने नमो शेतकरी योजना राबवली आहे. नमो शेतकरी योजनेतदेखील शेतकऱ्यांना ६००० रुपये दिले जातात. या योजनेचे दोन हप्ते एकत्र येणार आहेत.नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता अजूनही दिलेला नाही. त्यामुळे यावेळी आठवा आणि नववा हप्ता एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे हे दोन हप्ते मिळून ४००० रुपये मिळतील. त्यात पीएम किसानचा २००० रुपयांचा हप्ता मिळणार आहे. शेतकऱ्यांना एकूण ६००० रुपयांचा हप्ता मिळण्याची शक्यता वर्तवली जातीय.राज्यातील १४ लाख शेतकरी या दोन्ही योजनेचा लाभ घेत आहेत. एप्रिल महिन्यात या शेतकऱ्यांना प्रत्येकी ६००० रुपये मिळू शकतात, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. मार्चमध्येच तापमान चाळीशी पार महाराष्ट्रात मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात सूर्य आग ओकत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. काही भागात उष्णतेचा पारा चाळीशी पार गेला असून उत्तर कोकणात उष्ण आणि दमट हवामानामुळे यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान , आज राज्यात कुठेही पावसाची शक्यता नाही. सरासरीपेक्षा 2-4 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान जास्त राहण्याची शक्यता आहे. उत्तर कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात तापमानाची तीव्रता जास्त राहणार आहे. या भागात कमाल तापमान 37-40 अंशांपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. कोकणात 6 आणि 7 मार्च रोजी उष्ण आणि दमट स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. मुंबईसह ठाणे, रायगड आणि पालघर या जिल्ह्यांना आज पुन्हा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. ५ मार्चला काही ठिकाणी हीटवेव्हसारखी स्थिती होती, पण 6 मार्चला मुख्यतः उष्ण-दमट हवामान राहील. दरम्यान, मार्चच्या पहिल्याच आठवड्यात ‘हिट वेव्ह’ सदृश्य स्थिती काही भागांत झाली आहे. या उष्णतेच्या लाटांपासून सावध राहावे लागेल. भरपूर पाणी प्या, दुपारी बाहेर पडणे टाळा असा सल्ला देखील देण्यात आलाय. भारताचे सुखोई विमान क्रॅश भारतीय वायुसेनेचं सुखोई Su-30MKI हे लढाऊ विमान कोसळल्यामुळे मोठा अपघात झाला आहे. आसाममधील कार्बी आंगलोंग जिल्ह्यात हवाई दलाचे सुखोई विमान काल रात्री रडारवरून अचाक गायब झाले होते. चोखीहोलानंतर विमान बेपत्ता झाल्याचे समोर आले होते. पण ताज्या अपडेटनुसार हे विमान कोसळले. सुखोई विमानाचा पायलट देखील बेपत्ता असल्याचं समोर आले आहे. त्याचा शोध घेतला जात आहे. स्थानिक अधिकाऱ्याने दिलेल्या माहतीनुसार, गुरूवारी सायंकाळी सुखोई Su-30MKI या विमानाने उड्डाण घेतले, त्यानंतर काही मिनिटातच रडारावरून गायब झाले. त्याचा जमिनीवरील नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला. विमानाशी शेवटचा संपर्क संध्याकाळी ७:४२ वाजता नोंदवण्यात आला होता, त्यानंतर तो रडारवरून गायब झाले. आता हे विमान कोसळल्याची माहिती समोर आली आहे. विमानातील बेपत्ता पायलटचा घेण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर केला जात आहे. आसाममध्ये मोठ्या प्रमाणात शोध आणि बचाव कार्य सुरू आहे. रशियाकडून भारताला मोठी मदत मध्यपूर्वेत इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या भीषण युद्धामुळे संपूर्ण जगात पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा भडका उडण्याची भीती व्यक्त केली जात होती. मात्र, भारतासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. या युद्धामुळे अमेरिकेला नरमाईची भूमिका घ्यावी लागली आणि नाइलाजानं का होईना पण भारताला रशियाकडून क्रूड ऑइल खरेदी करण्याची परवानगी द्यावी लागली. अमेरिकेने रशियाकडून तेल खरेदी करण्यासाठी भारताला ३० दिवसांची विशेष सवलत जाहीर केली आहे. या निर्णयामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून समुद्रात रखडलेली रशियाची अवाढव्य तेल जहाजे आता भारताच्या दिशेने रवाना झाली आहेत. मध्यपूर्वेतील युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमती भडकण्याची भीती असतानाच, अमेरिकेने भारताला मोठा दिलासा दिला. भारत चौथ्यांदा T20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत Top 10 news: मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आज भारत आणि इंग्लड यांच्यात उपांत्य फेरीच्या सामन्याचा थरार रंगला. यामध्ये भारताने इंग्लंडचा 7 धावांनी पराभव केला आहे. यासह, टीम इंडियाने अंतिम फेरीत स्थान निश्चित केले. आता 8 मार्च रोजी होणाऱ्या भारताचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. या सामन्यात इंग्लडचा युवा खेळाडू जेकब बेथेलने ऐतिहासिक शतक झळकावले. परंतु इंग्लंडला विजय मिळवता आला नाही. दरम्यान, टी20 विश्वचषकाच्या इतिहासात भारत चौथ्यांदा अंतिम फेरीत पोहोचला आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत 253 ५३ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल इंग्लंडने कडवी झुंज देत 246 धावा केल्या. हा सामना फक्त 7 धावांनी गमावला. संपूर्ण सामन्यात एकूण 499 धावा झाल्या. दुबईत अडकलेल्यांसाठी पुन्हा सोनू सूद पुढे आला अमेरिका- इस्रायल आणि इराणच्या युद्धामुळे जगात वेठीस धरलंय. इस्रायल आणि अमेरिकेने आतापर्यंत 5 हजाराहून अधिक बॉम्ब इराणवर टाकलेत. इरणने प्रत्युत्तर म्हणून इतर देशांमध्ये असलेल्या अमेरिकेच्या तळांवर हल्ले केलेत. दुबईतील काही ठिकाणीही हल्ले करण्यात आले आहेत.त्यात दुबईत अडकलेल्या नागरिकांसाठी आता बॉलीवूड कलाकार मदतीसाठी पुन्हा धावून आला आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत त्याने मदती बद्दल माहिती दिली. युद्धामुळे दुबईमध्ये अनेक प्रवासी अडकले आहेत. जर तुमच्याकडे किंवा तुमच्या ओळखीच्या कोणाकडे राहण्यासाठी जागा नसेल तर आम्ही सुरक्षित राहण्यासाठी जागा मोफत उपलब्ध करून देत आहोत. यासाठी कोणतेही राष्ट्रीयत्व असण्याची गरज नाही. कोणत्याही अटी नाहीत. ही फक्त माणुसकी आहे. मदत हवी असल्यास आम्हाला इंस्टाग्रामवर डीएम करा. ही पोस्ट शक्य तेवढी शेअर करा जेणेकरून हे गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचेल, असं आवाहनही सोनू सूदनं केलंय .