आधी काम करा मग पदाची अपेक्षा ठेवा Top 10 News: एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरु आहे. मात्र आता त्यांच्या या दौऱ्यात आणखी एका गोष्टीची जोरदार चर्चा सुरु झालीय. एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत झालेल्या बैठकीत पक्षाच्या काही खासदारांच्या कामगिरीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. येत्या काही दिवसांमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल होणार आहे. या फेरबदलात आपल्याला मंत्रिमंडळात स्थान मिळावे, यासाठी शिवसेनेच्या काही खासदारांची धडपड सुरु आहे. या खासदारांची एकनाथ शिंदे यांनी खरडपट्टी काढल्याचे समजते. Top 10 News: आधी काम करा, मग पदाची अपेक्षा ठेवा, असे शिंदेंनी या खासदारांना सुनावले. तुम्ही दिल्लीत असलात तरी माझं तुमच्या कामावर लक्ष आहे. तुमच्या सगळ्यांच्या कामाच विश्लेषण होत आहे. आधी काम करा, मग पदाची अपेक्षा ठेवा. पक्षाची आणि सरकारची बाजू सभागृहात जोरदारपणे मांडा. पक्षाचं प्रतिनिधित्व सभागृहात दिसण्यासाठी पूर्णवेळ सभागृहात उपस्थित राहून मुद्दे मांडा. काम करणाऱ्यांचा पक्षाकडून योग्य सन्मान केला जातो, तेच सर्वांना लागू होणार, असे एकनाथ शिंदे यांनी खासदारांना सुनावलं. बारामती पोटनिवडणूक लढवून जिंकून दाखवतो बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. .बारामती मतदारसंघात ओबीसी नेते लक्ष्मण हाकेयांनी थेट पवार कुटुंबीयांवर टीका करत येथील निवडणूक बिनविरोध करण्यास विरोध दर्शवला आहे. सुनेत्रा पवार यांना विधान परिषदेवर घ्यावं असं वक्तव्य लक्ष्मण हाके यांनी केलं आहे. आम्ही ही निवडणूक लढवतो आणि जिंकून दाखवतो असे हाके यानी म्हटलं आहे. सुनेत्रा पवार यांना विधान परिषदेवर घ्यावं, इथं पवार सोडून विधानसभाला उमेदवार द्यावा असे मत लक्ष्मण हाके यांनी व्यक्त केले आहे. आम्ही निवडणूक लढवतो पण काही जणांच्या पोटात दुखते. सुनेत्रा पवारांना विधान परिषदेवर पाठवा, आम्ही ही निवडणूक लढवतो आणि जिंकून दाखवतो असे हाके यांनी म्हटलं आहे. सुनेत्रा पवार यांना बिनविरोध विधानपरिषदेवर पाठवा. इथं अजित पवार यांच्या घरातील सोडून दुसरा उमेदवार उभा करा असेही हाके म्हणाले. राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता Top 10 News: राज्यात पावसाला पोषक हवामान तयार झाले आहे. त्यामुळे राज्यातील उष्णतेची लाट काहीशी ओसरली आहे. उकाडा तापदायक ठरत आहे. अनेक शहरांमध्ये कमाल तापमान ३५ ते ४० अंश सेल्सिअसच्या दरम्यान नोंदवले गेले आहे. काल विदर्भ आणि मराठवाडा भागात उष्णतेचा प्रभाव अधिक दिसून आला आहे. तर संध्याकाळी राज्यातील काही भागात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. सांगली शहरासह मिरज तालुक्यात गारपीट झाली सांगली जिल्ह्यात दोन दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. बुधवारी राज्यात जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केलाय. उर्वरित राज्यात विजांसह पावसाची शक्यता आहे. ऐन उन्हाळ्यात अचानक आलेल्या या पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान केले. काढणीसाठी तयार असलेले कांदा,ज्वारी आणि गव्हाच्या पीकाचे मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. अवकाळी पाऊस शिक्षकांची नाही यंदा उन्हाळ्याची सुट्टी! राज्यातील शाळांना दरवर्षीप्रमाणे यंदाही २ मेपासून १४ जूनपर्यंत उन्हाळा सुट्ट्या असणार आहेत. परंतु, यावर्षी जनगणनेच्या कामकाजाला सुरवात होणार असल्याने शिक्षकांना यंदा उन्हाळा सुट्ट्या मिळणार नाहीत. अंतिम सत्राच्या परीक्षा संपताच शिक्षकांचे प्रशिक्षण होऊन १६ मेपासून त्यांना गावागावातील घरांची गणना करुन त्याच्या याद्या तयार कराव्या लागणार आहेत. त्यामुळे उन्हाळा सुट्टी लागली तरीदेखील शिक्षकांनी मुख्यालय सोडू नये, असे आदेश देण्यात आल्या आहेत. परभणीचे जिल्हाधिकारी संजयसिंंह चव्हाण, पुण्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी जनगणना काळात शिक्षकांनी मुख्यालय सोडू नये, असे आदेश काढले आहेत. सर्व अनुदानित, विनाअनुदानित प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा व महाविद्यालयातील शिक्षकांसाठी हे आदेश लागू असणार आहेत. १६ मे ते १४ जूनपर्यंत जनगणनेअंतर्गत घरयादी व घरांची गणना करायची आहे. २०२७ वर्षातील जनगणनेचा पहिला टप्पा २७ एप्रिलपासून सुरु होत आहे. दरम्यान, शाळा सुरु झाल्यानंतर जुलै महिन्यात ‘टीईटी’ होणार आहे. त्यामुळे शिक्षकांना जनगणनेच्या कामासोबतच ‘टीईटी’चा देखील अभ्यास करावा लागणार आहे. नमो शेतकरी महासन्मान निधीचा ८ वा हप्ता राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला असून, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा ८ वा हप्ता पुढील आठवड्यात थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. यासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित झाला असून, या हप्त्यासाठी रु. १,७७४ कोटी निधी वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे. राज्यातील सुमारे ९० लाख ३४ हजार पात्र शेतकऱ्यांना या निर्णयाचा लाभ होणार असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या नमो शेतकरी महासन्मान निधीच्या ८ व्या हप्त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद विशेष लक्ष घालून उपलब्ध करून दिली असल्याची माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. काँग्रेस खासदाचा राजीनामा, पक्षाला मोठा धक्का आसाम विधानसभा निवडणुका तोंडावर असताना काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. लोकसभा खासदार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रद्युत बोरदोलोई यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. दीड वर्षांपूर्वी भाजपचे अनेक आमदार काँग्रेसमध्ये सामील होणार असल्याचा दावा करणारे खासदारानेच पक्षाला रामराम केला आहे. ऐन निवडणुकांच्या तोंडावर राजीनामा दिल्याने त्यांनी पक्षाला अडचणीत आणले आहे. आपल्या राजीनामा पत्रात बोरदोलोई यांनी आपला राजीनामा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पाठवला. आपल्या राजीनामा पत्रात लिहिले आहे की, ते पक्षातील सर्व पदांचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा देत आहेत. यापूर्वी आसाम काँग्रेसचे माजी अध्यक्ष भूपेन बोरा यांनी आत्मसन्मानाचे कारण देत पक्ष सोडला होता. इंडक्शन, इलेक्ट्रिक शेगड्या वापरा भारतातील ‘एलपीजी’ सिलिंडर उपलब्धतेची स्थिती चिंताजनक असून, सर्वसामान्य ग्राहकांनी ‘एलपीजी’ सिलिंडरचा जपून वापर करावा, पर्यायी इंधन म्हणून पीएनजी जोडणी, इंडक्शन आणि इलेक्ट्रिक शेगड्यांचा विचार करावा, असे आवाहन केंद्र सरकारच्या वतीने करण्यात आलंय. इंधन स्त्रोतांचे वैविधीकरण तसेच ‘एलपीजी’ला पर्याय ठरू शकणाऱ्या इंधनांच्या माध्यमातून सिलिंडरच्या मागणी आणि पुरवठ्यात समन्वय साधण्याचा केंद्र सरकार प्रयत्न करतंय असं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं म्हटलंय. पश्चिम आशियातील युद्धामुळे भारताची तेलवाहू जहाजे अडकून पडल्याने पुरवठा विस्कळित झाला आहे. व्यावसायिक ग्राहकांसाठी ‘एलपीजी’च्या पुरवठ्यात कपात करून सर्वसामान्य ग्राहकांना पुरवठा करण्यावर केंद्र सरकारने भर दिला आहे. भारताला ७० टक्के कच्चे तेल विविध स्त्रोतांकडून प्राप्त होत असल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या आघाडीवर समाधानकारक स्थिती आहे. बड्या लष्करी अधिकाऱ्याचा राजीनामा अमेरिका-इस्रायल-इराणविरोधात सुरु असलेल्या युद्धात आता अमेरिकन सैन्यातच बंडाळी माजल्याची माहिती समोर आलीय. अमेरिकेच्या राष्ट्रीय दहशतवादविरोधी केंद्राचे प्रमुख जोसेफ केंट यांनी राजीनामा दिल्याची माहिती समोर आलीय. जोसेफ केंट यांनी युद्धाच्या निषेधार्थ राजीनामा दिल्याच सांगितलं जातय. इराणकडून अमेरिकेला धोका नव्हता. तसेच युद्ध सुरू होण्यामागे इस्रायलचा दबाव कारणीभूत असल्याचा आरोप जो केंट यांनी केला. जो केंट यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र लिहून युद्धाबाबत नाराजी व्यक्त केल्याची माहिती अमेरिकेच्या संरक्षण विभागानं दिली. पेंटागॉनकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनानुसार, इराणविरुद्धच्या यु्द्धात संघर्षात आतापर्यंत अमेरिकेचे सुमारे 200 सैनिक जखमी झाले आहेत. जो केंट यांचा राजीनामा डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का मानला जात आहे. जो केंट यांनी राजीनामा देताना लिहलेल्या पत्रात म्हटले आहे की, इराणचा आपल्या देशाला कोणताही धोका नाही. इस्रायलचा अमेरिकेत असणारा प्रभावी दबावगट यांच्यामुळे हे युद्ध सुरु झाले. त्यामुळेच माझी विवेकबुद्धी या युद्धाबाबत ट्रम्प प्रशासनाला पाठिंबा देऊ शकत नाही, हे त्यांनी राजीनाम्याच्या कारणात स्पष्ट केले. इराणचा सर्वात शक्तिशाली नेता इस्रायली हल्ल्यात ठार Top 10 News: आखाती देशातील युद्ध आता एका अतिशय भयंकर वळणावर पोहोचले आहे. इराणचे सर्वात शक्तिशाली आणि अनुभवी नेते अली लारीजानी यांचा इस्रायली हवाई हल्ल्यात मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. या भीषण हल्ल्यात लारीजानी यांच्यासोबत त्यांच्या मुलाचाही मृत्यू झाला असून, इराण सरकारने अधिकृतपणे या वृत्ताला दुजोरा दिला आहे. गेल्या अनेक दशकांपासून इराणच्या राजकारणात आणि धोरणांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे लारीजानी हे इस्रायलच्या रडारवर होते. लारीजानी हे इरणच्या सुरक्षा परिषदेचे सचिव होते. माजी सर्वोच्च नेते अली खामेनी यांच्या हत्येनंतर ते पडद्याआडून इराणचा कारभार चालवत होते असे म्हटले जात होते. एएफपीनं वृत्तानुसार, इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने लारीजानी यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. लारीजानी यांच्यासोबत त्यांचा मुलगा आणि बॉडीगार्डही ठार झाले. या हल्ल्यानंतर आता इराण आणि इस्रायलमधील संघर्ष टोकाला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. संपूर्ण जगाचे लक्ष आता इराण काय पाऊल उचलणार याकडे लागले आहे. सारा अली खानला केदारनाथ मंदिरात ‘नो एन्ट्री’ सारा अली खानसाठी, दरवर्षी ज्या सहजतेनं आणि उत्स्फूर्तपणे ती केदारनाथ धामला भेट द्यायची, तसं करणं आता तिच्यासाठी वाटतं तेवढं सोपं राहिलेलं नाही. त्यातूनही जर साराला केदारनाथ धामचं दर्शन घ्यायचं असेलच, तर आता तिला एका अटीची पूर्तता करावी लागणार आहे. साराला आता ती ‘सनातनी’ असल्याचे पुरावे सादर करावे लागणार आहेत. बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीनं अलिकडेच या संदर्भात एक आदेश जारी केला आहे. ‘चार धाम यात्रे’च्या संदर्भात आयोजित करण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत, मंदिरामध्ये सनातनधर्मीय नसलेल्या व्यक्तींच्या प्रवेशास मनाई करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे. बीकेटीसीचे अध्यक्ष हेमंत द्विवेदी यांनी, गैर-हिंदूंना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. जो कोणी सनातन धर्मावर विश्वास ठेवतो, तो सनातनी आहे. त्यांनी पुढे बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानचा उल्लेख केला आणि सांगितलं की, तिला प्रवेश मिळण्यापूर्वी मंदिरात तिच्या सनातनी श्रद्धेबद्दल तिला एक प्रतिज्ञापत्र सादर करावं लागेल तसंच “जर सारा अली खाननंही सनातन धर्मावर श्रद्धा आणि भक्ती असल्याचं जाहीर केलं आणि आम्हाला प्रतिज्ञापत्र दिलं, तर आम्ही तिला भेट देण्याची परवानगी देऊ…”असं त्यांनी म्हटलंय.