मुंबईत भाजपला जोरदार धक्का Top 10 News: उत्तर मुंबईतील राजकारणात मोठी घडामोड घडली असून मनसे आणि भाजपला धक्का बसला आहे. विविध पक्षांतील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना आमदार प्रकाशदादा सुर्वे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी आमदार सुर्वे यांनी सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत करत पक्षसंघटना अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला.यावेळी कस्तुरी रोहेकर यांनी मनसेवर गंभीर आरोप केले. निवडणुकीत उमेदवारीच्या काळात पक्षातून दबाव टाकण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. पक्षात काम करूनही सन्मान मिळाला नाही, त्यामुळे काम करण्याची इच्छाच उरली नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मनसेमध्ये जातीभेद होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. “मी मेहनत घेतली, मात्र वरचे नेते आरामात बसले. स्थानिक पातळीवर कामे होत नाहीत, फक्त सूचना दिल्या जातात. इतर पक्षांचे लोक सहकार्य करतात, मात्र मनसेमध्ये वरच्या नेत्यांकडून सहकार्य मिळाले नाही,” असे रोहेकर यांनी म्हटले. राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेवर कुणाला मिळणार संधी? राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाची पहिली मोठी कसोटी आता विधानपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने लागणार आहे. येत्या 12 मे रोजी होणाऱ्या या निवडणुकीत उमेदवारांची निवड करताना पक्षांतर्गत समीकरणं आणि निष्ठा हा महत्त्वाचा मुद्दा ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पक्षात अलीकडील राजकीय घडामोडींनंतर अनेक नेत्यांनी वेगवेगळ्या बाजूंनी भूमिका घेतल्या आहेत. अशा परिस्थितीत अजित पवार यांच्या गटाशी निष्ठा ठेवणाऱ्या नेत्यांना संधी दिली जाऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी कोणाला मिळणार, याकडे पक्षातील इच्छुकांसह संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. अमोल मिटकरी यांचा धक्कादायक दावा महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 28 जानेवारी 2026 रोजी बारामती येथे विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला.त्यानंतर त्यांच्या विमान अपघातावरून अनेक तर्क – वितर्क आणि आरोप-प्रत्यारोप झाल्याचे पाहायला मिळालं. आता या प्रकरणाशी ‘काळी जादू’ आणि ‘अघोरी पूजा’ यांचा संबंध असल्याचा खळबळजनक आरोपही वारंवार करण्यात येत आहे. याचदरम्यान आता अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी एक्सवर पोस्ट करत धक्कादायक माहिती दिलीय. काल रात्री अजितदादांच्या प्रतिमेला काही लोक दिवा बत्ती करण्यासाठी गेले असता, त्यांना गोजुबावी या ठिकाणी पूजेच्या ताटात 2 लिंब टाचण्या टोचून ठेवलेल्या स्थितीत आढळल्या, हे कुणी जाणीवपूर्वक करतेय की अघोरी पुजा प्रकार?, असा सवाल अमोल मिटकरी यांनी उपस्थित केला आहे. राज्यावर अवकाळीचे संकट कायम मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात उष्णतेचा कडाका वाढत असून तापमानाने ४० अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. उन्हाच्या तीव्रतेमुळे दैनंदिन जीवनावर परिणाम होत असून दुपारच्या वेळी रस्ते ओस पडलेले दिसत आहेत. दुसरीकडे, राज्यातील काही भागांमध्ये मात्र विजांच्या कडकडाटासह वादळी वारे, पाऊस आणि गारपीट होत असल्याचे चित्र आहे. या बदलत्या हवामानामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी ४० ते ५० किमी वेगाने वाहणारे सोसाट्याचे वारे यांचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ओतूर जुन्नर मार्गावर अपघात ओतूर-जुन्नर मार्गावर डंपर आणि होंडा सिटी कार यांच्यात समोरासमोर भीषण अपघात झाला असून, या अपघातात जुन्नरचे निवडणूक नायब तहसीलदार अनंता बनाजी गवारी यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. जुन्नरकडून ओतूरच्या दिशेने जाणारा हायवा डंपर आणि ओतूरकडून जुन्नरच्या दिशेने येणारी होंडा सिटी कार यांची वळणावर जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की कारच्या पुढील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला. या अपघातात अनंता गवारी गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यासह विजय खारतोडे यांनाही गंभीर दुखापत झाली, तर तुषार भीमराव कोरडे किरकोळ जखमी झालेत. स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू करत जखमींना बाहेर काढून ओतूर येथील निरामय हॉस्पिटलमध्ये दाखल केले. प्रकृती चिंताजनक असल्याने अनंता गवारी आणि विजय खारतोडे यांना पुण्याकडे हलवण्यात आले. मात्र, उपचारासाठी नेत असताना वाटेतच अनंता गवारी यांची प्राणज्योत मालवली. टॅक्सी- रिक्षा चालकांसोबत संवाद कार्यक्रमात गोंधळ Top 10 News: शिवसेना शिंदे गटाचे आमदार आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी 1 मे पासून रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी सक्ती केली आहे. तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी खासदार संजय निरुपम यांनी या सक्तीला आपला विरोध केलाय. त्याच पार्श्वभूमीवर संजय निरुपम हे दहिसरमधील रिक्षा चालकांसोबत संवाद साधण्यासाठी आले होते. त्याचवेळी, मनसैनिकांनी दहीसरमध्ये धाव घेत संजय निरुपम यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. विशेष म्हणजे, मनसेच्या कार्यकर्त्यांनी मराठीची घोषणा देत संजय निरुपम यांच्या कारची हवा सोडली, त्यांच्या गाडीवर बाटली फेकून मारल्याने चांगलाच गोंधळ उडाल्याचं दिसून आलं. या प्रकरणी मनसेच्या 11 कार्यकर्त्यांना अटक करण्यात आले असून या 11 हि कार्यकर्त्यांना बोरिवली न्यायालयाने जामीन मंजूर केला.तर दुसरीकडे, याच प्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे दहिसर विधानसभा विभाग प्रमुख राम यादव यांच्या विरोधात एम. एच.बी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. तेलंगणाच्या राजकारणात नव्या पक्षाची एन्ट्री तेलंगणाच्या माजी खासदार के. कविता यांनी नव्या राजकीय पक्षाची घोषणा केली आहे. कविता यांनी ‘तेलंगणा राष्ट्र समिती’ असं पक्षाचं नाव ठेवलंय. त्यांच्या वडिलांनी देखील या नावाने आंदोलनाना सुरुवात केली होती.काही महिन्यांपूर्वी के. कविता यांना कारवाईचा सामना करावा लागला. त्यांच्या वडिलांनी त्यांची ‘भारत राष्ट्र समिती’ पक्षातून हकालपट्टी केली होती. पक्षविरोधी भूमिका आणि कारवाया केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर के कविता यांनी पत्रकार परिषद घेऊन नवीन पक्ष स्थापन करणार असल्याची घोषणा केली होती. के कविता यांनी याविषयी बोलताना, ‘तेलंगणा राज्याला स्थापन होऊन १२ हून अधिक वर्ष झाले आहेत. परंतु लोकांच्या अपेक्षा पूर्ण झालेल्या नाहीत. १२ वर्षांनंतरही लोकांच्या पाणी, पैसे आणि रोजगाराच्या समस्या कायम आहेत’. मागील सरकारने शेतकरी, तरुण, उद्योजक, मागासवर्गीयांच्या अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत. आता नव्या पक्षाचा उद्देश सर्वांचा विकास आणि आत्मनिर्भर करण्याचा आहे’. असं म्हटलंय. डोनाल्ड ट्रम्प थांबलेल्या हॉटेलमध्ये गोळीबार अमेरिकेच्या वॉशिंग्टनमधील हिल्टन हॉटेलमध्ये गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान, या ठिकाणी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे याठिकाणी उपस्थित असताना ही घटना घडलीय. शनिवारी रात्री मोठ्या स्फोटांचे आवाज ऐकू आल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि मेलानिया ट्रम्प यांना व्हाईट हाऊस कॉरस्पॉन्डंट्स डिनरमधून सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले. तर यावेळी संशयित हल्लेखोराला गोळ्या घालून ठार करण्यात आल्याचीही माहिती आहे. तर यावेळी संशयित संशयित हल्लेखोराला अटक करण्यात आलीय. तसेच अधिक तपास केला जात आहे. मात्र या घटनेने मोठी खळबळ उडाली असून राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेबद्दल प्रश्न निर्माण झाले आहेत. लुंगी एनगिडीच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडी याच्या दुखापतीबाबत मोठी अपडेट समोर आलीय. पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात कॅच पकडताना डोक्यावर जोरात जमिनीवर आपटला. त्यानंतर त्याला तातडीनं ॲम्ब्युलन्समधून रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पंजाब किंग्सचा फलंदाज प्रियांश आर्याने मारलेल्या उंच फटक्यावर एनगिडी कॅच घेण्यासाठी धावत गेला होता. पण संतुलन बिघडल्याने तो मागे पडला आणि त्याचं डोकं जमिनीवर जोरात आदळलं. कॅचही सुटला आणि एनगिडी बराच वेळ मैदानावरच निश्चल पडून होता. त्यावेळी फिजिओ आणि मेडिकल टीम तात्काळ धावून आली. या गंभीर प्रसंगामुळे सामना सुमारे 15 मिनिटं थांबवावा लागला. नंतर एनगिडीला स्ट्रेचरवरून बाहेर नेण्यात आलं परिस्थितीच गांभीर्य पाहता संपूर्ण स्टेडियममध्ये काही काळ शांतता पसरली होती. डोके आणि मान दुखत असल्याची तक्रार केल्यानंतर त्याला बीएलके-मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र दिलासादायक बाब म्हणजे एनगिडीची प्रकृती आता स्थिर असून लवकरच त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे. इथं राहायचं असेल तर मराठी यायलाच पाहिजे Top 10 News: बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वात टॉप 5 स्पर्धकांमध्ये गेलेला अभिनेता विशाल कोटीयन याला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं. बिग बॉस मराठी संपल्यानंता तो अनेक ठिकाणी मुलाखती देताना दिसतोय. एका मुलाखतीत सध्याच्या रिक्षा चालकांवरील मराठी भाषा सक्तीवर तो बोललाय. ‘ माझा जन्म महाराष्ट्रात झालाय. मी जन्माने कर्माने आणि मनानेही मराठी आहे. या आधी मी काही मराठी नाटकांमध्ये काम केलंय. मध्ये कुठेतरी हिंदीत काम करत असताना मराठी बोलायची सवय सुटली होती. पण आता बिग बॉसमुळे मला स्पष्ट मराठी बोलता येतंय. मराठी एक चांगली भाषा आहे. मला मराठी आणि महाराष्ट्राबद्दल खूप आदर आहे. तुम्हाला जर महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी यायलाच पाहिजे याच मताचा मी आहे. बाहेरच्या राज्यांमध्ये ही असंच आहे. महाराष्ट्रात राहूनही तुम्हाला मराठी येत नसेल तर शिका. इथे राहायचं असेल तर मराठी बोलावं लागेल. मी आत्ता बिग बॉस मधून बाहेर आलोय त्यामुळे मला याबद्दल फारशी माहिती नाही. पण, हा निर्णय योग्य आहे . मराठी यायलाच पाहिजे. मराठी बोला कारण हा महाराष्ट्र आहे. ” असं विशाल म्हणाला.