८ डिसेंबरपासून राज्याचे हिवाळी अधिवेशन महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. ८ डिसेंबर ते १४ डिसेंबर या कालावधीत नागपूरमध्ये हे अधिवशेन होणार आहे. महत्वाचे म्हणजे शनिवार आणि रविवार या शासकीय सुट्टीच्या दिवशी देखील दोन्ही सभागृहाचे कामकाज होणार आहे. हा निर्णय विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेतला. हिवाळी अधिवेशनासाठी नागपुरातील मुख्यमंत्री निवासस्थानापासून विधिमंडळ परिसर असलेल्या सिव्हिल लाईन्स भागात पोलिस छावणीचे स्वरूप आले आहे. यंदा अधिवेशनाचा कालावधी ८ दिवसांचा असेल. या अधिवेशनात ३३ मोर्चे विधानभवनावर धडकरणार असल्याचं सांगण्यात येतंय ======================== लवकरच पालिका निवडणुकीचे बिगुल वाजणार आगामी महानगर पालिकांच्या निवडणुकीसंदर्भात निवडणूक आयोगाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातल्या सगळ्या महानगर पालिकांमधील दुबार मतदानाच्या संदर्भात चर्चा करण्यात आली. दुबार मतदारांची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करा अशी सूचना निवडणूक आयोगाकडून सर्व महापालिका आयुक्तांना देण्यात आली आहे. आलेल्या हरकती आणि सूचनांवर लवकरात लवकर निरसन करा आणि कुठल्याही पद्धतीत मुदतवाढ दिली जाणार नाही. त्यामुळे निवडणुकांची तारीख लवकरच घोषित होण्याची शक्यता आहे. 15 डिसेंबरच्या जवळपास निवडणूक आयोग महापालिका निवडणुकीच्या घोषणा करण्याची शक्यता आहे. ==================== कर्जमाफीवर बोलू नका ; मुख्यमंत्र्यांचे आदेश शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर बोलायचं नाही असं मुख्यमंत्री सांगितल्याची कबुली राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिलीय. कराडमध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाण समाधीस्थळी अभिवादन केले. यावेळी बोलताना सहकार मंत्र्यांचे अज्ञान समोर आले. यावेळी ते माध्यमांपासून पळ काढतानाही दिसून आले. तसंच बँका बडवणार्यावर काय कारवाई होणार असा सवाल केला असता त्यांनी सिस्टीममुळे वेळ लागत असल्याचं म्हटलं. एवढंच नाही तर कर्ज बुडवणाऱ्या कारखान्यांची यादी देखील पाटील यांनी माध्यमांनाच द्यायला सांगितली. त्यानंतर शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांनी याविषयी बोलण्यास मनाई केल्याची कबुलीच देऊन टाकलीय. ================== अखेर ऊस दराची पहिली उचल ठरली परभणीच्या सोनपेठ तालुक्यातील सायखेडा येथील अमित देशमुख यांचा व्टेंन्टीवन शुगर या कारखान्यावर पहिल्या उचलीच्या मागणीसाठी चार दिवसांपासून ठिय्या आंदोलन सुरू होते. अखेर हे आंदोलन उपविभागीय अधिकारी संगिता चव्हाण यांच्या मध्यस्थीने मागे घेण्यात आले. 2725 रु पहिल्या उचलीवर आंदोलनकर्ते मान्य झाले असुन जिल्ह्यातील ऊसाच्या पहिल्या उचलीची कोंडी फुटलीय. बीड जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सुरु केलेल्या ऊसदाराचे आंदोलनाचे लोन परभणी जिल्ह्यात पसरुन सोनपेठ तालुक्यापर्यंत पोहचले होते. व्टेंन्टीवन शुगर यांचं कारखान्यावर 1 डिसेंबरपासून ठिय्या आंदोलन सुरु केले होते. युवा शेतकरी संघर्ष समिती, स्वाभिमानी शेतकरी संघटना, किसान सभा व ऊस उत्पादक शेतकरी यांचं मागील चार दिवसांपासून कारखाना परिसरात हे आंदोलन सुरू होतं. ============================= विवाह सोहळ्यातून सामाजिक बांधिलकीचे दर्शन साताऱ्यात मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या कन्येचा विवाह रविराज देशमुख यांच्याशी संपन्न झाला. या लग्नसोहळ्याला दिग्गजांची उपस्थिती होती. विवाह सोहळ्यात शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी एक अत्यंत अभिनंदनीय पाऊल उचलून सामाजिक बांधिलकीचे अनोखे दर्शन घडवले. मुलीच्या शुभविवाह प्रसंगी, त्यांनी लातूर जिल्ह्यातील ओल्या दुष्काळग्रस्तांसाठी १० लाख रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला. शिवेंद्रराजे भोसले हे लातूरचे पालकमंत्री आहेत. दरम्यान , या शाही लग्नसोहळ्याला फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अन्य मंत्री, आमदार आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. ================= सोन्याच्या दरात तब्बल 5000 रुपयांची वाढ गेल्या काही दिवसात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची मोठी घसरण होताना दिसत आहे. याचा परिणाम सोन्याच्या किंमती वाढण्यात झाला आहे. परिणामी एकाच आठवड्यात सोन्याच्या किंमतीत थोडी थोडकी नव्हे तर तब्बल 5000 रुपयांची वाढ होऊन एक तोळे सोन्याचा दर जीएसटीसह 1 लाख 31 हजारांवर जाऊन पोहोचला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे गेल्या काही दिवसांमध्ये डॉलरच्या तुलनेत रुपयाची मोठी घसरण सुरु आहे. एकाच आठवड्यात सोन्याचे दर हे जीएसटीसह 126000 हजारावरु 131000 वर जाऊन पोहोचले आहेत. पुढील काळातही अजूनही सोन्याचे दर वाढू शकतात, असा सुवर्ण व्यावसायिकांचा अंदाज आहे. ऐन लग्नसराईच्या तोंडावर ही दरवाढ झाल्याने ग्राहकांचे बजेट मात्र बिघडणार आहे. ======================== व्लादिमिर पुतिन यांचा भारतातील दुसरा दिवस रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचे गुरुवारी सायंकाळी नवी दिल्ली येथे आगमन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पालम विमानतळावर त्यांचे स्वागत केले. युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतरचा त्यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. दरम्यान, काल रात्री देशात आलेल्या पुतिन यांच्यासाठी खास मेजवानीचे आयोजन केले होते. दरम्यान, त्यांचा हा दौरा दोन्ही देशांसाठी महत्वाचा ठरणार असून दोन्ही देशात अनेक महत्वाचे करार होणार आहेत. त्यांच्या आजच्या दुसऱ्या दिवशीच्या दौऱ्यात ते राजघाटावर जाऊन महात्मा गांधी यांना श्राद्धांजली अर्पण करतील. त्यानंतर राष्ट्रपती भवनमध्ये त्यांचं स्वागत करण्यात येईल. याठिकाणी ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची पुतिन भेट घेतील. हैदराबाद हाऊसमध्ये भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेतही ते सहभागी होणार आहेत. त्यानंतर संयुक्त निवेदन जारी केले जाईल. रशियाची सरकारी वाहिनी ‘आरटी’च्या भारतातील वाहिनीचे पुतिन अनावरण करतील. त्यानंतर ते रशियाला रात्री रवाना होणारेत. ===================== …तोपर्यंत बांगलादेशात शांतता नसेल पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांचीच भाषा आता बांगलादेशातले लोक बोलू लागले आहेत. देशाचे निवृत्त ब्रिगेडियर जनरल अब्दुल्लाहिल अमान आझमी यांनी भारताविरोधात गरळ ओकली आहे. जोपर्यंत भारताचे तुकडे-तुकडे होत नाहीत, तोपर्यंत बांगलादेशात शांतता निर्माण होऊ शकत नाही, असं ते म्हणाले. अब्दुल्लाहिल अमान आझमी यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून मनातला द्वेष व्यक्त केला आहे. ते म्हणतात, जोपर्यंत भारत देशाचे तुकडे-तुकडे होणार नाहीत, तोपर्यंत ते बांगलादेशला शांततेत जगू देणार नाहीत. देशातील प्रसारमाध्यमे, देशाची संस्कृती आणि बुद्धिजीवींच्या जगात भारत सर्वत्र हस्तक्षेप करत आहे. ========================= स्मृती-पलाशच्या लग्नाबाबत पलककडून माहिती टीम इंडियाची स्टार क्रिकेटर स्मृती मानधना आणि म्युझिक कंपोझर पलाश मुच्छल यांचं लग्न अचानक पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.सुरुवातील स्मृतीच्या वडिलांच्या तब्बेतीचं कारण देण्यात आलं मात्र त्यानंतर पलाशचे फ्लर्टी चॅट व्हायरल झाल्यानं पलाशने स्मृतीला फसवल्याच्या चर्चा समोर आल्या. मात्र यावर दोन्ही कुटुंबाकडून ठोस प्रतिक्रिया देण्यात आली नाही. त्यात आता पलाशची बहीण गायिका पलक मुच्छलने या लग्नासंबंधी दोन शब्दात माहिती दिलीय. तिनं दोन्ही कुटुंब कठीण काळातून जात आहेत. त्यामुळं आपण शक्य तितकी पॉझिटिव्हिटी पसरवू या असं म्हटलंय. त्यामुळं आता हे लग्न कधी होणार हे सांगता येणार नसल्याचं स्पष्ट दिसतंय. ========================= अमृता खानविलकरचं लवकरच रंगभूमीवर पदार्पण अभिनेत्री अमृता खानविलकरनं आजवर प्रत्येक माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं पण वर्ष संपताना अमृता प्रेक्षकांना एक खास सर्प्राइज़ देणार आहे. ते म्हणजे अमृता लवकरच एका नव्या कोऱ्या नाटकातून रंगभूमीवर काम करताना दिसणार आहे. ‘लग्न पंचमी’ या नाटकातून अमृता रंगभूमीवर पदार्पण करणार असून लवकरच हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी अमृताने तिच्या वाढदिसानिमित्त सोशल मीडिया वर एक पोस्ट लिहून येणाऱ्या वर्षात काहीतरी मनाच्या अगदी जवळ असलेला प्रोजेक्ट घेऊन येणार असल्याची माहिती दिली होती. त्यानुसारच आता ती या नव्या नाटकातून रंगभूमीवर काम करताना दिसणार आहे.