डॉ. बाबा आढाव यांचे वयाच्या ९६व्या वर्षी निधन महाराष्ट्राच्या समाजसेवा आणि श्रमिक चळवळींचे प्रणेते असलेले ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांचे वयाच्या ९६व्या वर्षी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती गंभीर असल्याने आयसीयूत दाखल होते. त्यांच्या निधनाने सर्वसामान्यांचा, विशेषतः कष्टकरी आणि हक्कांसाठी लढणाऱ्यांचा एक मोठा आवाज हरपलाय. अखेर पर्यंत कार्यरत परिवर्तनाच्या चळवळीतील या समर्पित जीवनदानी नेत्याची समाज बदलासाठी केलेल्या दीर्घ संघर्षानंतर काल प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर आज सायंकाळी 5.30वा. वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणारेत. त्याआधी गुलटेकडी मार्केट यार्ड येथील हमाल भवन येथे सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी शिलाताई, मुले असीम व अंबर, सुना नातवंडे असा परिवार आहे. ============================ फडणवीस-शिंदे यांची महत्त्वाची बैठक, एकत्र लढवण्यावर शिक्कामोर्तब गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये सुरू असलेली धुसफूस, कुरघोडी अन् नेत्यांची पळवापळवी अखेर थांबणार आहे. राज्यात होणाऱ्या महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका महायुती एकत्र लढवण्यावर जवळपास शिक्कामोर्तब झालंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये सोमवारी उशीरा दीड तास बंद दाराआड बैठक झाली. या बैठकीमध्ये महायुती एकत्र लढण्यावर एकमत झाल्याचं समजतंय. सत्ताधारी महायुती मुंबई आणि ठाण्यासह राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुका एकत्रितपणे लढण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर येतीय. ================= अंबादास दानवेंनी टाकला ‘कॅश बॉम्ब’ राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत खळबळ उडवून दिलीय. अंबादास दानवेंनी पैशांच्या बंडलचे काही व्हिडीओ पोस्ट केले आहेत. हे व्हिडीओ पोस्ट करत त्यांनी ‘सरकारकडे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पैसे नाहीत’, असे म्हणत सरकारला धारेवर धरले आहे. तसंच व्हिडीओत दिसणारे आमदार कोण आहेत? असा सवाल त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना केलाय. सोशल मीडियावर ३ व्हिडिओ पोस्ट करत त्यांनी या सरकारकडे फक्त शेतकरी कर्जमाफीला पैसा नाही. बाकी सगळं ओक्के आहे! जनतेला जरा सांगा मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदेजी, हे आमदार कोण आहेत आणि पैशांच्या गड्ड्यांसह काय करत आहेत?’ अंबादास दानवे यांनी हे व्हिडीओ पोस्ट करत सरकारलाच अनेक सवाल केले आहेत. ====================== सायनमधील भूभाग भाडेपट्ट्यावर विश्व हिंदू परिषदेला देण्यास मंजुरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास विभागाने सायनमधील सुमारे दोन एकर मोकळा बीएमसीचा भूखंड 30 वर्षांच्या भाडेपट्ट्यावर विश्व हिंदू परिषदेला देण्यास मंजुरी दिली आहे. या संदर्भातला शासन आदेश 4 डिसेंबर रोजी जारी करण्यात आला आहे.या भूखंडासाठी बीएमसीकडून (BMC) एकरकमी 9.7 कोटी रुपयांचा प्रीमियम आणि दरवर्षी 10,186 रुपयांचे सवलतीच्या दराने भाडे आकारले जाईल. या भूखंडाचा वापर वैद्यकीय आणि शैक्षणिक कामांसाठी करण्यात येणार आहे, असे शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आला आहे. या जमिनीची बाजारभावानुसार सध्याची किंमत तब्बल 247 कोटी रुपयांच्या घरात आहे. मात्र, हा भूखंड विहिंपला वर्षाला फक्त 10 हजार रुपये इतके नाममात्र भाडे घेऊन देण्यात आल्याने वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे. =============== राज्यातील किमान तापमानात घट कायम मागील काही दिवसांपासून राज्यात गारठा कायम आहे. किमान तापमानात घट असल्याने गारठ्याचे प्रमाण अधिक आहे. दरम्यान, पुढील काही दिवस राज्यात गारठा कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलीय. याचबरोबर पुढील दोन – तीन दिवस मध्य महाराष्ट्र, खानदेश आणि विदर्भात थंडीच्या लाटेचा इशाराही देण्यात आलाय. उत्तर भारतातून थंड हवेचे प्रवाह वाढल्याने राज्यात थंडीचं प्रमाण वाढलय. पुढील दोन – तीन दिवस किमान तापमानात घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. यादरम्यान किमान तापमान १६ ते १५ अंश सेल्सिअसदरम्यान राहील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय. =============================== आईच्या जातीवरून मुलीला मिळणार SC प्रमाणपत्र आता बातमी जात प्रमाणपत्राबाबत सुप्रीम कोर्टानं दिलेल्या मोठ्या निर्णयाची. आईच्या जातीच्या आधारावर मुलीला अनुसूचित जातीचं (SC) प्रमाणपत्र देण्यास सुप्रीम कोर्टानं मंजुरी दिली आहे. वडील अनुसुचित जातीचे नसतानाही केवळ आईच्या जातीच्या आधारावर हे प्रमाणपत्र देण्यास कोर्टानं मंजुरी दिलीय. एका अल्पवयीन मुलीच्या शिक्षणास मदत करण्याच्या उद्देशानं कोर्टानं हा दुर्मिळ निर्णय दिलाय. विशेष म्हणजे मुलाला वडिलांची जात वारसा हक्काने मिळते या नियमाला आव्हान देणाऱ्या अनेक याचिकांवर अद्याप निर्णय बाकी असताना, कोर्टानं हा निर्णय दिलाय. या प्रकरणाची सध्या देशात जोरदार चर्चा सुरू आहे. ======================== गोव्यातील अग्निकांडनंतर दोन्ही मालक परदेशात फरार गोव्यातील नाईट क्लबमधील अग्निकांड प्रकरणाबाबत मोठी माहिती समोर आली आहे. क्लबचे दोन्ही मालक देशसोडून पसार झाले आहे. नाइट क्लबच्या आगीत 25 नागरिकांच्या मृत्यूनंतर मालक रात्रीतून देश सोडून फरार झाल्याची माहिती आहे. रोमियो लेन क्लब अग्निकांड प्रकरणातील मुख्य आरोपी सौरभ आणि गौरव लुथरा हे देश सोडून पळालेत. अग्निकांडाची घटना घडल्यानंतर काही तासांनी सौरभ आणि गौरव यांनी मुंबईहून इंडिगोच्या विमानानं थायलंड मधील फुकेत गाठलं असल्याची माहिती गोवा पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी एफआयआर दाखल होताच पोलिसांनी आरोपी गौरव लुथरा आणि सौरभ लुथरा यांच्याशी संबंधित ठिकाणांवर धाडी घालण्यात आल्या. पण दोघेही सापडले नाहीत. ==================== डोनाल्ड ट्रम्प हे पुन्हा एकदा नवा निर्णय घेण्याच्या तयारीत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे पुन्हा एकदा नवा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. त्यांच्या या निर्णयाचा भारताला मोठा फटका बसणार असल्याचे बोलले जात आहे. ट्रम्प यांनी त्यांचे प्रशासन भारतीय तांदूळ आणि कॅनेडियन खतांसह परदेशी कृषी उत्पादनांवर नवीन शुल्क लादण्याचा विचार करू शकते., असे संकेत दिलेत. व्हाईट हाऊस येथे झालेल्या बैठकीत ट्रम्प यांनी हे विधान केले .यावेळी शेतकऱ्यांनी स्वस्त परदेशी उत्पादनांचा अमेरिकन बाजारपेठेवर होणाऱ्या परिणामाबद्दल तक्रार केली होती त्यावरच बोलता ट्रम्प यांनी हे विधान केलं. अमेरिकन शेतकऱ्यांसाठी १२ अब्ज डॉलर्सच्या मदत पॅकेजच्या घोषणेदरम्यान ही बैठक झाली. =============== जेमिमा रॉड्रिग्सची क्रिप्टिक पोस्ट व्हायरल क्रिकेटर स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचे अखेर लग्न मोडले आहे. स्मृतीने स्वतः याविषयी पोस्ट करून माहिती दिली . त्यानंतर स्मृतीची जिवलग मैत्रीण आणि टीम इंडियाची स्टार खेळाडू जेमिमा रॉड्रिग्स पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलीय. कारण, स्मृतीच्या नात्यातील निर्णयासोबतच जेमिमाने केलेली एक क्रिप्टिक पोस्ट सध्या व्हायरल होतेय. जेमिमाने इंस्टाग्रामवर एका बँडचं गाणं गातानाचा व्हिडिओ शेअर केलाय. त्या गाण्यातील बोल चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. “Man I Nee” हे गाणं हा बँड गातोय. या गाण्यातील बोल स्मृतीच्या परिस्थितीशी जुळत असल्याचं चाहत्यांचं मत आहे. काहींनी तर या गाण्याला थेट स्मृती आणि पलाशच्या नात्याशी जोडलंय. ================== कनिका कपूरच्या लाईव्ह कॉन्सर्टचा व्हिडीओ व्हायरल बॉलिवूडची सुप्रसिद्ध गायिका कनिका कपूर हिच्या लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय. व्हायरल व्हिडीओमध्ये गायिका कनिका कपूर परफॉर्म करत असतं अचानक प्रेक्षकांमधील एका चाहत्यानं स्टेजवर उडी मारली आणि तिला आक्षेपार्ह्यपणे मिठी मारण्याचा प्रयत्न केला. कनिकानं लगेच त्या चाहत्याला दूर ढकलून दिलं. या सगळ्यात कनिकानं परफॉर्म करणं अजिबात थांबवलं नाही आणि गाणं सुरूच ठेवलं. त्यानंतर कनिकाच्या सह-कलाकारांनी आणि बाउन्सर्सनी चाहत्याला स्टेजवरून बाहेर काढलं. कनिका कपूरवरील या लज्जास्पद कृत्यावर नेटिझन्स प्रतिक्रिया देतायत. काहीजण महिलांच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित करत आहेत.