12 झेडपी, 125 पंचायत समित्यांचा निवडणूका जाहीर; 5 फेब्रुवारीला मतदान, निकाल 7 फेब्रुवारीला राज्य निवडणूक आयोगाने १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांची घोषणा केलीय. यात कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव व लातूर या 12 जिल्हा परिषदांचा समावेश आहे. या निवडणुकांसाठी ५ फेब्रुवारी रोजी मतदान होईल, तर ७ फेब्रुवारी रोजी निकाल जाहीर होतील. १६ जानेवारीपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार असून २१ जानेवारी ही अर्ज भरण्याची अंतिम मुदत असेल. २७ जानेवारीला दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येतील. या निवडणुकीत प्रत्येक मतदाराला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी अशी दोन मते द्यावी लागणार आहेत. मतदानासाठी ईव्हीएमचा वापर होणार असून महिलांसाठी विशेष ‘पिंक’ मतदान केंद्रे उभारली जाणार आहेत. विशेष म्हणजे, जात वैधता प्रमाणपत्र नसलेल्या उमेदवारांना अर्जाची सत्यप्रत जोडून निवडणूक लढवता येईल, मात्र निवडून आल्यावर ६ महिन्यांत प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य असेल. ‘आता चुकाल, तर मुंबईला मुकाल’; उद्धव ठाकरेंचे मतदारांना भावनिक आवाहन “मुंबई आपली आहे, ती मराठी माणसाच्याच ताब्यात ठेवण्यासाठी ही निवडणूक निर्णायक आहे. आता जर चुकलात, तर मुंबईला कायमचे मुकाल,” अशा शब्दांत शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईकरांना साद घातली. विमानतळ परिसरातील शाखांना भेटी देताना त्यांनी महायुतीवर जोरदार टीका केली. सत्ताधारी पक्षाकडून पैशांचा वारेमाप वापर सुरू असल्याचा आरोप करत ठाकरे म्हणाले की, गद्दार वृत्तीचा पराभव करण्यासाठी आपला विजय आवश्यक आहे. मतदारांनी हजार-दोन हजार रुपयांसाठी आपले आयुष्य विकू नये. “ज्यांना आम्ही निवडून दिले ते गद्दार होऊ शकतात, पण मतदार कधीच गद्दार नसतात,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, पैसे वाटणाऱ्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्याचे आदेश त्यांनी शिवसैनिकांना दिले. लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये जमा; संक्रांतीपूर्वी हप्ता मिळाल्याने महिलांमध्ये समाधान राज्यातील ‘लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. २९ महानगरपालिका निवडणुकांच्या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर, निवडणूक आयोगाने या योजनेचा नियमित हप्ता वितरीत करण्यास हिरवा कंदील दाखवलाय. त्यामुळे संक्रांतीपूर्वीच महिलांच्या खात्यात १५०० रुपये जमा होण्यास सुरुवात झालीय. आचारसंहितेमुळे ‘अग्रिम’ लाभ देण्यास किंवा ३००० रुपये एकरकमी देण्यास आयोगाने स्पष्ट मज्जाव केला होता. मात्र, मुख्य सचिवांच्या अहवालानंतर सुरू असलेल्या योजनांना परवानगी मिळाली. डिसेंबर महिन्याचा हप्ता देण्यात आलाय. १५ जानेवारीला होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर या निर्णयाला महत्त्व प्राप्त झाले असून, नवीन लाभार्थी निवडण्यावर मात्र बंदी कायम आहे. नियमित निधी मिळाल्याने महिलावर्गात समाधानाचे वातावरण आहे. आई-वडिलांचा सांभाळ न केल्यास पगारातून 10% कपात; तेलंगणा सरकारचा मोठा निर्णय वृद्ध माता-पित्यांची हेळसांड करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना तेलंगणा सरकारने मोठा दणका दिलाय. मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी घोषणा केली की, जे कर्मचारी आपल्या आई-वडिलांचा सांभाळ करणार नाहीत, त्यांच्या वेतनातून १० टक्के कपात केली जाईल. ही कापलेली रक्कम थेट पीडित पालकांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. या योजनेसाठी सरकारने ५० कोटींची तरतूद केली असून, ज्येष्ठांसाठी ‘प्रणाम’ नावाचे डे-केअर सेंटरही उभारले जाणार आहे. याशिवाय, आगामी महापालिका निवडणुकांमध्ये ट्रान्सजेंडर व्यक्तींना सह-सदस्य म्हणून नामनिर्देशित करण्याचा ऐतिहासिक निर्णयही त्यांनी घेतलाय. तसेच दिव्यांगांना मोफत उपकरणे आणि नवविवाहित दिव्यांग जोडप्यांना २ लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा करत, २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात नवीन आरोग्य धोरण आणण्याचे संकेतही मुख्यमंत्र्यांनी दिलेत. ट्रम्प यांच्या धमकीने शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स 250 अंकांच्या घसरणीसह 83,627 वर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणशी व्यापार करणाऱ्या देशांवर २५% टॅरिफ लावण्याची घोषणा करताच भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली. सुरुवातीच्या तेजीनंतर सेन्सेक्स ९९५ अंकांनी कोसळला, तर निफ्टीने २५,६०० ची पातळी गाठली. दिवसअखेर सेन्सेक्स २५० अंकांच्या घसरणीसह ८३,६२७ वर बंद झाला. या पडझडीमुळे गुंतवणूकदारांची एकाच दिवसात सुमारे ९३,४६७ कोटी रुपयांची संपत्ती घटली. या घसरणीला ट्रम्प यांची धमकी, आयटी कंपन्यांचे सुस्त निकाल, परकीय गुंतवणूकदारांची सततची विक्री आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती कारणीभूत ठरल्या. मकर संक्रांतीच्या सुटीमुळे एक्स्पायरीच्या दिवसांत झालेला बदल आणि रुपयाची ऐतिहासिक घसरण यामुळे बाजारात प्रचंड अस्थिरता राहिली. रात्रीचा प्रवास सुरक्षित करण्यासाठी पाळा 5 नियम; अपघाताचा धोका होईल कमी रात्रीच्या वेळी हायवेवर ड्रायव्हिंग करणे आव्हानात्मक असते, कारण कमी प्रकाश आणि थकवा यामुळे अपघाताची शक्यता वाढते. रस्ते सुरक्षा तज्ज्ञांच्या मते, रात्रीचा प्रवास सुरक्षित करण्यासाठी काही खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे. सर्वप्रथम, आपली हेडलाईट आणि विंडस्क्रीन नेहमी स्वच्छ ठेवावी, जेणेकरून समोरचे अडथळे स्पष्ट दिसतील. समोरून वाहन येत असताना हाय-बीमचा वापर टाळून लो-बीमचा वापर करावा, ज्यामुळे समोरच्या चालकाचे डोळे दिपणार नाहीत. रात्रीच्या वेळी वेग मर्यादेत ठेवून पुढील वाहनापासून सुरक्षित अंतर राखणे हिताचे ठरते. डोळ्यांवर ताण किंवा थकवा जाणवल्यास दर दोन तासांनी थोडा ब्रेक घ्यावा. तसेच, वळणांवर हॉर्नचा वापर आणि गुगल मॅप्सची मदत घेतल्यास संभाव्य धोके टाळून सुरक्षित प्रवास करता येतो. 10 मिनिटांतील डिलिव्हरी बंद; डिलिव्हरी बॉयच्या सुरक्षेसाठी सरकारचा निर्णय क्विक कॉमर्स कंपन्यांच्या १० मिनिटांत डिलिव्हरी करण्याच्या अवास्तव अटीमुळे डिलिव्हरी बॉयवर येणारा जीवघेणा ताण लक्षात घेता, केंद्र सरकारने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतलाय. केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मंडाविया यांनी झोमॅटो, स्विगी आणि ब्लिंकिट यांसारख्या मोठ्या कंपन्यांसोबत चर्चा करून ही ‘१० मिनिटांची डेडलाइन’ हटवण्याचे निर्देश दिलेत. या निर्णयाची अंमलबजावणी करत ब्लिंकिटने आपल्या ब्रँडिंगमधून ‘१० मिनिटे’ हा शब्द हटवलाय. संसदेतही आपचे खासदार राघव चड्ढा यांनी या सुविधेच्या मानवी किमतीवर प्रश्न उपस्थित केले होते. डिलिव्हरी एजंटना रस्ते अपघातापासून वाचवणे आणि त्यांच्या कामाची स्थिती सुधारणे हा या निर्णयाचा मुख्य उद्देश आहे. लवकरच इतर सर्व कंपन्यांनाही ही अट शिथिल करावी लागणार आहे. टाटा पंचचे ‘फेसलिफ्ट’ व्हर्जन लाँच; सुरुवातीची किंमत 5.59 लाख रुपये टाटा मोटर्सने भारतीय बाजारपेठेत बहुप्रतीक्षित ‘टाटा पंच फेसलिफ्ट २०२६’ अधिकृतपणे लाँच केलीय. आकर्षक लूक आणि प्रगत वैशिष्ट्यांसह या कारची सुरुवातीची किंमत ५.५९ लाख रुपये एक्स-शोरूम ठेवण्यात आलीय. नवीन पंचमध्ये आता अधिक पॉवरफुल १.२ लीटर iTurbo इंजिनचा पर्याय देण्यात आलाय. डिझाइनमध्ये बदल करताना यात नवीन LED हेडलाइट्स, ३६०-डिग्री कॅमेरा, २६.०३ सेमीची मोठी टचस्क्रीन आणि ६ एअरबॅग्स यांसारखे प्रीमियम फीचर्स जोडलेत. सुरक्षेच्या बाबतीत या कारने आपले ५-स्टार रेटिंग कायम राखलेय. ही कार पेट्रोल, AMT आणि CNG अशा विविध पर्यायांमध्ये उपलब्ध असून तिची थेट स्पर्धा ह्युंदाई एक्सटर आणि निसान मॅग्नाइटशी असेल. दिशा पाटनीच्या आयुष्यात नवा जोडीदार? पंजाबी गायकासोबतच्या व्हिडिओमुळे चर्चा बॉलीवूड अभिनेत्री दिशा पाटनी तिच्या व्यावसायिक यशापेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आलीय. अभिनेता टायगर श्रॉफसोबतच्या ब्रेकअपनंतर दिशा आता एका पंजाबी गायकाला डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलेय. नुकतीच दिशा, क्रिती सेननची बहीण नुपूर सेननच्या विवाह सोहळ्यासाठी उदयपूरला गेली होती. यावेळी प्रसिद्ध पंजाबी गायक तलविंदर आणि दिशा एकमेकांचा हात धरून फिरताना दिसले. या दोघांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, लग्नानंतर विमानतळावरही हे दोघे एकत्र स्पॉट झाले. काही दिवसांपूर्वी गोव्यात दिसलेला ‘मिस्ट्री मॅन’ हा तलविंदरच असावा, असा कयास चाहत्यांनी लावलाय. अद्याप दोघांनीही या नात्यावर अधिकृत भाष्य केलेले नाही, तरीही सोशल मीडियावर या नवीन जोडीची जोरदार चर्चा सुरूय. ‘ओय बघ, माझा डुप्लिकेट बसलाय’; विराट आपल्या ‘छोट्या चीकू’ला भेटला भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या सामन्यापूर्वी क्रिकेटचा किंग विराट कोहली एका विशेष कारणामुळे चर्चेत आलाय. मैदानावर सराव सुरू असताना विराटने त्याच्यासारख्याच दिसणाऱ्या एका चिमुरड्या चाहत्याची भेट घेतली. या भेटीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. विराटने या मुलाला पाहताच रोहित शर्माला बोलावून गमतीत म्हटले, “ओय तिकडे बघ, माझा डुप्लिकेट बसलाय!” विराटने या चिमुरड्याला ‘छोटा चीकू’ अशी हाक मारली. या मुलाने सांगितले की, त्याला विराटची स्टाईल प्रचंड आवडते. केवळ भेटीगाठीतच नव्हे, तर मैदानावरही विराटने आपली छाप पाडली. पहिल्या सामन्यात ९३ धावांची खेळी करत त्याने कुमार संगकाराचा विक्रम मोडीत काढला आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत सचिन तेंडुलकरनंतर दुसरे स्थान पटकावले. तसेच सर्वात वेगवान २८,००० धावांचा टप्पाही त्याने ओलांडला. भारताने हा सामना ४ गडी राखून जिंकला असून आता दुसरा सामना १४ जानेवारीला खेळवला जाणार आहे.