Kyc करूनही ‘लाडकी बहीण’चा हप्ता का रखडला? उत्पन्नाचा निकष ठरले मुख्य कारण ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता अनेक महिलांच्या खात्यात अद्याप जमा झालेला नाही. विशेष म्हणजे, ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करूनही पैसे न मिळाल्याने लाभार्थी महिलांमध्ये गोंधळ आहे. प्रशासकीय सूत्रांनुसार, केवळ ई-केवायसी पुरेशी नसून कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास अशा महिलांना अपात्र ठरवण्यात आलेय. ३१ डिसेंबरपर्यंत केवायसी करणे अनिवार्य होते. या प्रक्रियेत उत्पन्नाचे निकष न पाळणाऱ्या महिलांची नावे लाभार्थी यादीतून वगळण्यात आलीत. ज्या महिला निकषांत बसतात, त्यांना मकरसंक्रांतीला हप्ता मिळालाय. मात्र, अपात्र ठरलेल्यांचे पैसे कायमचे रोखले जाण्याची शक्यता आहे. आता पात्र महिलांचे लक्ष आगामी जानेवारी महिन्याच्या हप्त्याकडे लागलेय. महापौर पदाचे आरक्षण ठरवण्यासाठी गुरुवारी सोडत; नगरविकास विभागाची उच्चस्तरीय बैठक राज्यातील 29 महानगरपालिकांमधील महापौर पदाच्या आरक्षणासंदर्भात महत्त्वाची हालचाल सुरू झालीय, या विषयावर तोडगा काढण्यासाठी आणि आरक्षण ठरवण्यासाठी नगरविकास विभागाकडून उच्चस्तरीय बैठक बोलावण्यात आली होती. महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने याबाबत अधिकृत पत्रक जारी केले असून, ही बैठक 22 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता मंत्रालयात होणार आहे. या बैठकीचे अध्यक्षस्थान राज्याचे नगरविकास मंत्री भूषवतील. शासनाच्या या पत्रानुसार, राज्यातील 29 महानगरपालिकांमध्ये महापौर पदासाठी आरक्षण निश्चित करण्याबाबत सध्या निर्माण झालेल्या पेचावर चर्चा करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आलीय. मंत्रालयातील परिषद सभागृहात, सहाव्या मजल्यावर ही बैठक पार पडेल, त्यामध्ये संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती असेल. महापौर पदाचे आरक्षण हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सत्तास्थापनेसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे या बैठकीत आरक्षण सोडत काय निघते, याकडे राज्याचे लक्ष लागलेय. मुंबईत महायुतीचाच महापौर होणार; देवेंद्र फडणवीस – एकनाथ शिंदेंत फोनवरून चर्चा मुंबई महापालिका निवडणुकीत सत्ताधारी भाजप व शिंदे गटाला स्पष्ट बहुमत मिळालेय. पण महापौर कोणत्या पक्षाचा होणार? या मुद्यावरून दोन्ही पक्षांत जोरदार रस्सीखेच सुरू झालीय. त्यातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरून संवाद साधल्याची माहिती समोर आलीय. त्यामुळे फडणवीस दावोस दौऱ्यावरून परतल्यानंतर मुंबईच्या महापौरपदाचा तिढा सुटणार असल्याचे स्पष्ट झालेय. मुंबई महापालिकेत भाजपला सर्वाधिक 89 जागा मिळाल्या. तर शिंदे गटाला 29, ठाकरे गटाला 65, तर काँग्रेस व मनसेला अनुक्रमे 24 व 6 जागांवर समाधान मानावे लागले. भाजपला आपल्या मदतीशिवाय महापौर बनवणे अशक्य असल्याचे लक्षात येताच शिंदेंनी आपल्या नगरसेवकांना मुंबईतील पंचतारांकित हॉटेलात हलवलेय. त्यानंतर त्यांनी भाजपपुढे अडीच वर्षांच्या महापौरपदाचा प्रस्ताव ठेवून दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू केलाय. शिंदेंच्या या डावपेचामुळे मुंबीचा महापौर कोण होणार? हा प्रश्न कळीचा बनलाय. या पार्श्वभूमीवर सूत्रांनी देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेंशी फोनवरून संवाद साधल्याचा दावा केलाय. दोन्ही राष्ट्रवादींच्या युतीत ‘सत्ते’ची अट; उत्तम जानकरांच्या विधानाने युतीत मिठाचा खडा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादीची युती होण्याची शक्यता असताना शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांनी युतीसाठी अजित पवारांपुढे सत्तेतून बाहेर पडण्याची अट ठेवलीय. यामुळे दोन्ही पक्षांच्या संभाव्य युतीत मिठाचा खडा पडल्याची चर्चा सुरू झालीय. पुणे महापालिकेच्या निवडणुकीत शरद पवार व अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसची युती झाली होती. पण त्यानंतरही त्यांचा दारूण पराभव झाला होता. आता पवार कुटुंब जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीतही एकत्र येण्याची शक्यता आहे. त्यासंबंधीची बोलणी त्यांच्या नेतृत्वांत सुरू झालीय. पण शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांनी अजित पवारांपुढे युतीसाठी महायुती सरकारमधून बाहेर पडण्याची अट ठेवल्यामुळे दोन्ही पक्षांची अडचण झालीय. उत्तम जानकर म्हणाले, महापालिका निवडणुकीनंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा आहे. पण मला याची कोणतीही कल्पना नाही. शिवसेना आणि धनुष्यबाण कुणाचा? सर्वोच्च न्यायालयात बुधवारी अंतिम सुनावणी महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा आणि दोन महत्त्वाच्या प्रादेशिक पक्षांच्या भवितव्याचा पेच आता सर्वोच्च न्यायालयात सुटण्याच्या मार्गावर आहे. शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हाबाबत येत्या बुधवारी २१ जानेवारीपासून अंतिम सुनावणीला सुरुवात होतेय. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठ सलग दोन दिवस या प्रकरणाचा युक्तिवाद ऐकून घेणार असून, राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारा निकाल लवकरच जाहीर होण्याची चिन्हे आहेत. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्हावर देखील सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 2022 मध्ये तत्कालीन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधात उघड बंड केले आणि आपल्या समर्थक आमदार व खासदारांच्या संख्याबळाच्या आधारावर शिवसेना पक्ष व चिन्हावर दावा सांगितला होता. त्यासंबंधीचा कायदेशीर लढा केंद्रीय निवडणूक आयोगापुढे झाला. त्यात आयोगाने संख्याबळाच्या आधारावर शिवसेना पक्ष व चिन्ह हे उद्धव ठाकरे यांच्याकडून काढून शिंदे यांच्या गटाला दिले होते. नितीन नवीन यांचा भाजप अध्यक्षपदासाठी अर्ज; उद्या होणार अधिकृत घोषणा भारतीय जनता पार्टीला सहा वर्षांनंतर नवा राष्ट्रीय अध्यक्ष मिळण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचलीय. पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नितीन नवीन यांनी सोमवारी दिल्लीतील भाजप मुख्यालयात अध्यक्षपदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी केंद्रीय मंत्री अमित शाह, राजनाथ सिंह, जे.पी. नड्डा, नितीन गडकरी आणि अनेक राज्यांचे मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष उपस्थित होते. नितीन नवीन हे या पदासाठी एकमेव उमेदवार असल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित मानली जातेय. बिहारमधून पाचवेळा आमदार राहिलेले नवीन आता जे.पी. नड्डा यांची जागा घेतील. उद्या, २० जानेवारी रोजी भाजपच्या १२ व्या राष्ट्रीय अध्यक्षांची अधिकृत घोषणा केली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि वरिष्ठ नेतृत्वाने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचे समजते. चांदीने पार केला 3 लाखांचा टप्पा; गुंतवणूकदारांनी खरेदी करावे की विकावे ? जागतिक बाजारपेठेतील तणाव आणि वाढत्या औद्योगिक मागणीमुळे चांदीने आज भारतीय वायदे बाजारात इतिहास रचलाय. चांदीच्या किमतीने प्रथमच 3 लाख रुपये प्रति किलोचा ऐतिहासिक टप्पा ओलांडला असून, एकाच दिवसात तब्बल 16,400 रुपयांची वाढ नोंदवण्यात आली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युरोपीय देशांवर अतिरिक्त टॅरिफ लावण्याची दिलेली धमकी आणि ग्रीनलैंड वादावरून वाढलेल्या भू-राजकीय तणावामुळे गुंतवणूकदारांनी चांदीला पसंती दिलीय. तसेच सोलर एनर्जी आणि इलेक्ट्रिक वाहनांमधील वाढत्या वापरामुळे औद्योगिक मागणीही तेजीत असल्याने ही वाढ होत असल्याचे सांगितले जातेय. तज्ज्ञांच्या मते, चांदीमध्ये सध्या ‘स्ट्रक्चरल अपट्रेंड’ आहे. मात्र, किंमत विक्रमी स्तरावर असल्याने शॉर्ट टर्म ट्रेडर्सनी नफा वसुली करावी, तर दीर्घकालीन गुंतवणूकदारांनी प्रत्येक घसरणीवर खरेदीचे धोरण ठेवावे. भविष्यातही बाजारपेठेत चढ-उतार कायम राहण्याची शक्यता आहे. शेअर बाजार सेन्सेक्स 324 अंकांनी कोसळला; गुंतवणूकदारांचे 2.5 लाख कोटींचे नुकसान भारतीय शेअर बाजारात आज सोमवारी १९ जानेवारी रोजी मोठी घसरण पाहायला मिळाली. कमकुवत जागतिक संकेत आणि कंपन्यांच्या निराशाजनक तिमाही निकालांमुळे गुंतवणूकदारांनी विक्रीचा सपाटा लावला. दिवसअखेर सेंसेक्स ३२४ अंकांनी घसरून ८३,२४६ वर, तर निफ्टी १०९ अंकांनी घसरून २५,५८६ च्या पातळीवर बंद झाला. या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे सुमारे २.५२ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफविषयक विधानामुळे जागतिक बाजार अस्थिर झालाय. परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांकडून सातत्याने होणारी मोठी विक्री होतेय. विप्रो आणि आयसीआयसीआय बँकेच्या कमकुवत तिमाही निकालांमुळे आयटी आणि बँकिंग क्षेत्रावर दबाव वाढला, अशी या घसरणीमागे कारणे सांगितली जात आहेत. आज मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकातही मोठी पडझड झाली असून, रिलायन्स आणि विप्रोचे शेअर्स सर्वाधिक घसरले. नेहा कक्करची ‘ब्रेक’ची घोषणा अन् पोस्ट डिलीट; पब्लिसिटी स्टंटच्या चर्चेला उधाण बॉलिवूडची लोकप्रिय गायिका नेहा कक्कर सध्या तिच्या एका रहस्यमय सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आलीय. नेहाने नुकतीच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत काम, जबाबदाऱ्या आणि नात्यांमधून ब्रेक घेण्याची घोषणा केली. “मी परत येईन की नाही, हे मला माहित नाही,” असे लिहीत तिने चाहत्यांचे आभार मानले होते. सोबतच, तिने मीडिया आणि पापाराझींना आपल्या खासगी आयुष्याचा सन्मान करण्याची विनंतीही केली. मात्र, ही पोस्ट काही मिनिटांतच व्हायरल झाल्यानंतर नेहाने ती तातडीने डिलीट केली. नेहाच्या या कृतीमुळे सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. अनेक नेटकऱ्यांनी याला ‘पब्लिसिटी स्टंट’ किंवा आगामी गाण्याचे प्रमोशन असल्याचे म्हटले, तर काहींनी तिच्या मानसिक आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली. या गोंधळामुळे नेहा नक्की कोणत्या तणावाखाली आहे की हे केवळ लक्ष वेधण्याचे साधन आहे, असा प्रश्न चाहत्यांना पडलाय. न्यूझीलंड मालिकेपूर्वी रिंकू सिंग अडचणीत; पोलीस ठाण्यात तक्रार दाखला भारतीय क्रिकेटपटू रिंकू सिंग २१ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेपूर्वी मोठ्या कायदेशीर अडचणीत सापडलाय. रिंकूने अलीकडेच सोशल मीडियावर एक ‘AI’ द्वारे तयार केलेले रील शेअर केले होते, ज्यामध्ये भगवान हनुमान, शिव, विष्णू आणि गणेश यांना कारमध्ये बसलेले आणि चष्मा घातलेले, अशा आधुनिक अवतारात दाखवण्यात आले होते. या चित्रिकरणामुळे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत करणी सेनेने अलिगडमध्ये रिंकू विरोधात लेखी तक्रार दाखल केलीय. देवांचा अशा प्रकारे वापर करणे अपमानजनक असल्याचे सांगत त्यांनी माफीची मागणी केली. दरम्यान, मैदानावर पुनरागमन करण्यापूर्वीच रिंकूवर अडचणीत सापडलाय.