जुन्या नगरसेवकांच्या संपत्तीत मोठी वाढ; उमेदवारांच्या संपत्तीचा मुद्दा चांगलाच गाजतोय आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत उमेदवारांच्या संपत्तीचा मुद्दा चांगलाच गाजतोय. निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रांनुसार, अनेक माजी नगरसेवक आणि महापौरांच्या संपत्तीत गेल्या काही वर्षांत पाच पटीने वाढ झाली असून, लखपती असलेले नेते आता करोडपतींच्या यादीत आलेत. २२७ प्रभागांतील १७०० उमेदवारांपैकी जुन्या नगरसेवकांच्या मालमत्तेत मोठी वाढ दिसून आलीय. माजी महापौर श्रद्धा जाधव यांची 2024 ला 44 कोटी असलेली संपत्ती ४६ कोटींवर, तर समाधान सरवणकर यांची 2017 मध्ये 9 कोटी 43 लाख रुपये असलेली संपत्ती ४६ कोटी ५९ लाखांवर पोहोचलीय. किशोरी पेडनेकर यांची 2017 मध्ये 1 कोटी 61 लाख रुपये असलेली मालमत्ता ५ कोटी २६ लाख झालीय. यासह अनेकांच्या संपत्तीत वाढ झाली. व्यवसाय, शेती आणि गुंतवणुकीतून हे उत्पन्न मिळाल्याचे उमेदवारांचे म्हणणे असले, तरी या ‘धनवृद्धी’मुळे मतदारांच्या भुवया उंचावल्यात. काँग्रेसच्या 12 नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश; अंबरनाथमध्ये भाजपचे ‘ऑपरेशन लोटस’ यशस्वी अंबरनाथ नगरपरिषदेत रंगलेल्या राजकीय नाट्याचा अखेर भाजपच्या ‘ऑपरेशन लोटस’ने समारोप झाला. भाजप-काँग्रेसच्या कथित ‘अभद्र’ युतीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिल्यानंतर ही युती तुटली, मात्र काँग्रेसच्या १२ नगरसेवकांनी थेट भाजपमध्ये प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि गणेश नाईक यांच्या उपस्थितीत प्रदीप नाना पाटील यांच्यासह १२ नगरसेवकांनी कमळ हाती घेतले. या पक्षप्रवेशामुळे अंबरनाथमध्ये काँग्रेसला मोठे खिंडार पडले असून पालिकेवर भाजपचे वर्चस्व निर्माण झाले आहे. दरम्यान, सत्तेसाठी विचारधारेशी तडजोड केल्याची टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली, तर काँग्रेसने भाजपच्या नीतिमत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेय. ‘लाडकी बहीण’ योजनेत फसवणूक भोवली; बुलढाण्यात ६ महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या ६ महिला कर्मचाऱ्यांवर प्रशासनाने कठोर कारवाई केलीय. शासकीय सेवेत असूनही उत्पन्नाची चुकीची माहिती देऊन या कर्मचाऱ्यांनी लाभ लाटला होता. तपासणीअंती या ६ महिलांकडून आतापर्यंत मिळालेली प्रत्येकी १६,५०० रुपये याप्रमाणे एकूण ९९,००० रुपयांची रक्कम वसूल करण्यात आली आहे. उर्वरित १९० अर्धवेळ कर्मचाऱ्यांचे उत्पन्न मर्यादेत असल्याने त्यांना पात्र ठरवण्यात आले. मात्र, शासनाची दिशाभूल केल्याप्रकरणी या सहा कर्मचाऱ्यांवर निलंबनासह कायदेशीर कारवाईचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठवण्यात आलाय. या कारवाईमुळे सधन असूनही योजनेचा लाभ घेणाऱ्यांचे धाबे दणाणलेत. निसर्गपुत्र डॉ. माधव गाडगीळ यांचे निधन; पर्यावरण चळवळीची मोठी हानी भारताचे ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ आणि ‘पश्चिम घाट बचाव’ मोहिमेचे प्रणेते डॉ. माधव गाडगीळ यांचे वयाच्या ८३ व्या वर्षी पुण्यात निधन झाले. पश्चिम घाट संवर्धन समितीच्या ऐतिहासिक अहवालाद्वारे त्यांनी विकास आणि पर्यावरण यांच्यातील संघर्षावर शास्त्रीय भाष्य केले होते. पद्मश्री, पद्मभूषण, शांती स्वरूप भटनागर, संयुक्त राष्ट्रांच्या ‘चॅम्पियन्स ऑफ द अर्थ’ यांसह अनेक पुरस्काराने सन्मानित डॉ. गाडगीळ यांनी लोकसहभागातून निसर्ग संवर्धनाचा विचार आयुष्यभर रुजवला. IISc मधील त्यांचे संशोधन आणि पंतप्रधानांचे सल्लागार समीतीचे सदस्य म्हणून त्यांचे कार्य मैलाचा दगड ठरले. त्यांच्या निधनाने वैज्ञानिक दृष्टिकोन आणि सामाजिक भान जपणारा एक प्रखर प्रहरी हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. शेअर बाजार घसरणीची 5 प्रमुख कारणे; 4 दिवसांत गुंतवणूकदारांचे 10 लाख कोटी बुडाले भारतीय शेअर बाजारात गुरुवारी सलग चौथ्या दिवशी मोठी घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्स ७८० अंकांनी कोसळून ८४,१८० वर, तर निफ्टी २५,८७६ वर बंद झाला. या पडझडीमुळे गेल्या चार दिवसांत गुंतवणूकदारांचे तब्बल १० लाख कोटी रुपये मातीमोल झाले. घसरणीची ५ प्रमुख कारणे सांगितली जात आहेत. त्यामध्ये रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर दबाव वाढवण्यासाठी अमेरिकेने प्रस्तावित केलेल्या ५००% शुल्कामुळे भीतीचे वातावरण आहे. रिलायन्स, एलटी, टाटा स्टील, ट्रेन्ट, एनटीपीसी, टीसीएस यांसारख्या मोठ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी विक्री झाली. वेनेझुएला येथील राजकीय अस्थिरतेचा परिणाम जागतिक तेल बाजारावर होण्याची शक्यता आहे. आशियाई आणि अमेरिकन बाजारातील सुस्तीचा फटका बसला असून जागतिक मंदीचे संकेत मिळताहेत. तसेच आगामी सहामाहीत भारताचा जीडीपी दर कमी राहण्याच्या अंदाजामुळे गुंतवणूकदार सावध झालेत. SBI ग्राहकांनो सावधान, बँकेचा इशारा; ‘योनो’ ॲप ब्लॉक होण्याच्या मेसेजला बळी पडू नका भारतीय स्टेट बैंकेच्या कोट्यवधी ग्राहकांना सध्या व्हॉट्सॲपवर एक बनावट मेसेज पाठवून लक्ष्य केले जातेय. “आधार अपडेट न केल्यास तुमचे योनो (YONO) ॲप ब्लॉक होईल,” असा दावा या मेसेजमध्ये करण्यात आला असून सोबत एक संशयास्पद APK फाईल पाठवली जातेय. स्टेट बँकेने यावर स्पष्टीकरण दिले असून हा मेसेज पूर्णपणे फेक (बनावट) असल्याचे सांगितलेय. अशा कोणत्याही फाईलवर क्लिक केल्यास तुमच्या खात्यातील रक्कम चोरीला जाऊ शकते. बँकेने आवाहन केले आहे की, अशा मेसेजला रिपोर्ट करा आणि कोणतेही अपडेट केवळ अधिकृत गुगल प्ले स्टोअर किंवा ॲपल स्टोअरवरूनच करा. पीआयबी फॅक्ट चेकनेही या फसवणुकीपासून सावध राहण्याचा इशारा दिलाय. अनिल अग्रवाल यांच्यावर दुखाचा डोंगर; 75% संपत्ती दान करण्याची घोषणा वेदांता समूहाचे संस्थापक अनिल अग्रवाल यांचे सुपुत्र अग्निवेश अग्रवाल यांचे अमेरिकेत 49व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. काही दिवसांपूर्वी स्कीईंग करताना झालेल्या अपघातामुळे त्यांच्यावर न्यूयॉर्कमध्ये उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. मुलाच्या अकाली निधनाने अग्रवाल कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळलाय. बिहारच्या पाटण्यातून स्क्रॅप व्यवसायापासून सुरुवात करणाऱ्या अनिल अग्रवाल यांनी जिद्दीच्या जोरावर वेदांताला जागतिक स्तरावर नेले. त्यांना ‘मेटल किंग’ म्हणून ओळखले जाते. या दुःखद प्रसंगी, सामाजिक बांधिलकी जपत अग्रवाल यांनी आपल्या एकूण संपत्तीचा ७५% हिस्सा दान करण्याचा निर्णय घेतलाय. रिपोर्ट्सनुसार त्यांची संपत्ती अंदाजे 3.66 लाख कोटी रुपये आहे. EPFO किमान पेन्शन 5 पट वाढवण्याच्या विचारात; निवृत्तांना मोठा आर्थिक आधार मिळणार खासगी क्षेत्रातील लाखो कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून ईपीएफओ किमान मासिक पेन्शन १,००० रुपयांवरून थेट ५,००० रुपये करण्याच्या तयारीत आहे. वाढती महागाई आणि सेवानिवृत्तांची आर्थिक ओढाताण लक्षात घेऊन हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. सध्या ईपीएफओच्या कर्मचारी पेन्शन योजना १९९५ अंतर्गत पात्र निवृत्त व्यक्तींना दरमहा किमान १,००० रुपये पेन्शन मिळते, जी गेल्या अनेक वर्षांपासून स्थिर आहे. मात्र, ही अत्यल्प रक्कम दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेशी नसल्याचा सूर कामगार वर्गातून उमटतोय. या पार्श्वभूमीवर सरकार किमान पेन्शनमध्ये थेट पाच पट वाढ करण्याच्या तयारीत आहे. कामगार संघटनांनी या निर्णयाचे स्वागत केले असून, यामुळे निवृत्तांना मोठा आर्थिक आधार मिळणार आहे. सध्या हा प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन असून, आगामी अर्थसंकल्पात यावर अधिकृत शिक्कामोर्तब होऊ शकते. या ऐतिहासिक निर्णयामुळे खासगी क्षेत्रातील निवृत्तांच्या पेन्शनमध्ये तब्बल पाच पट वाढ होऊन त्यांना सन्मानाने जगता येईल. श्रद्धा कपूरच्या लग्नाच्या कमेंटमुळे चर्चांना उधाण; लेखक राहुल मोदींशी जोडले जातेय नाव बॉलीवूडची लोकप्रिय अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या तिच्या लग्नाच्या एका कमेंटमुळे चर्चेत आलीय. सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या श्रद्धाने एका ज्वेलरी ब्रँडच्या प्रमोशनदरम्यान चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी एका चाहत्याने तिला “लग्न कधी करणार?” असा थेट प्रश्न विचारला. त्यावर श्रद्धाने मजेशीर अंदाजात “मी करेन, विवाह करेन,” असे उत्तर दिले, ज्यामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचलीय. गेल्या काही काळापासून श्रद्धाचे नाव लेखक राहुल मोदी यांच्याशी जोडले जातेय. राहुल यांनी ‘प्यार का पंचनामा २’ आणि ‘सोनू के टीटू की स्वीटी’ सारख्या चित्रपटांचे लेखन केले असून, अनेकदा या दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आलेय. दोघांनीही अद्याप नात्याची अधिकृत कबुली दिली नसली, तरी श्रद्धाच्या या ताज्या कमेंटमुळे ती लवकरच विवाहबंधनात अडकणार का? अशा चर्चांना वेग आलाय. ॲशेसमध्ये ऑस्ट्रेलियाचा ऐतिहासिक विजय; कसोटी क्रिकेटमध्ये रचला नवा जागतिक विक्रम प्रतिष्ठेच्या ॲशेस कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा ४-१ ने धुव्वा उडवत दिमाखदार विजय मिळवला. सिडनी येथे झालेल्या पाचव्या सामन्यात ५ गडी राखून विजय मिळवत ऑस्ट्रेलियाने मालिका आपल्या नावे केली. या मालिकेत कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील एका अनोख्या विक्रमाची नोंद झाली. ४ किंवा अधिक सामन्यांच्या मालिकेत प्रथमच दोन्ही संघांनी मिळून ४ पेक्षा अधिकच्या धावगतीने धावा केल्या. यापूर्वीचा २०२३ मधील ३.९३ धावगतीचा विक्रम मोडीत निघालाय. पाचव्या कसोटीत इंग्लंडच्या जो रूटने (१६०) शतक झळकावले, मात्र ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅव्हिस हेड १६३ आणि स्टीव्ह स्मिथ १३८ यांच्या झंझावाती शतकांनी कांगारूंना १८३ धावांची आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या डावात जेकब बेथेलने १५४ धावांची झुंज दिली, पण ती अपुरी ठरली. अखेर ऑस्ट्रेलियाने १६० धावांचे लक्ष्य गाठत इतिहासाला गवसणी घातली.