Todays Top 10 News : मुंबई महापौर पदासाठी भाजपाकडून रितू तावडे चार वर्षांनंतर पार पडलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीनंतर आता महापौरपदाची लढत अंतिम टप्प्यात पोहोचलीय. मुंबई महापौर आणि उपमहापौर निवडणूक बुधवार, ११ फेब्रुवारी रोजी होणार आहे. भाजपकडून महापौरपदासाठी रितू तावडे यांनी अधिकृतपणे अर्ज दाखल केलाय. तर उपमहापौरपदासाठी शिंदे गटाचे नगरसेवक संजय घाडी यांचा अर्ज सादर करण्यात आलाय. शनिवारी सकाळी ११.३० वाजता मुंबई महापालिका मुख्यालयातील सचिव विभागात ही अर्ज प्रक्रिया पार पडली. दुसरीकडे उबाठा गटाकडून अद्याप कोणताही अर्ज दाखल करण्यात आलेला नसून आज मातोश्री येथे सर्व नगरसेवकांची बैठक बोलावण्यात आलीय. या बैठकीनंतर उबाठाची भूमिका स्पष्ट होण्याची शक्यता आहे. महापौर निवडीकडे संपूर्ण मुंबईचे लक्ष लागलंय. २) कोल्हापूरच्या इतिहासात प्रथमच भाजपचा महापौर कोल्हापूर महानगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच भाजपचा महापौर झालाय. रूपाराणी संग्रामसिंह निकम या ५१ व्या महापौरपदी निवडून आल्यात. उपमहापौरपदी जनसुराज्य शक्ती पक्षाचे अक्षय विक्रम जरग यांची निवड झालीय. या निवडीमुळे महायुतीने कोल्हापूर महापालिकेत प्रथमच सत्ता स्थापन केलीय. महापौर निवडणुकीत रूपाराणी निकम यांना महायुतीच्या ४६ मते मिळाली, तर काँग्रेस आघाडीच्या सचिन शेंडे यांना ३५ मते मिळाली. ११ मतांच्या फरकाने निकम विजयी ठरल्या. उपमहापौर निवडणुकीतही अक्षय जरग यांनी ४६ मते मिळवत विजय मिळवला. निकालानंतर महायुतीकडून गुलाल, फटाके आणि जल्लोष करण्यात आला. दरम्यान, काँग्रेसला सर्वाधिक जागा असूनही सत्ता गमवावी लागलीय. ३) एकनाथ खडसेंना कोर्टाचा दणका भोसरी जमीन व्यवहार प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना मोठा धक्का बसलाय. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एमपीएमएलए न्यायालयाने खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केलंय. आरोप निश्चितीच्या सुनावणीला एकनाथ व मंदाकिनी खडसे दोघेही गैरहजर राहिल्यामुळे कोर्टाने ही कठोर कारवाई केलीय. खडसे महसूलमंत्री असताना MIDC च्या भूखंडाची नियमबाह्य व कमी दरात खरेदी केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणात दोषमुक्तीचा अर्ज आधीच फेटाळण्यात आला असून हायकोर्टाकडूनही दिलासा मिळालेला नाही. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी १३ फेब्रुवारी रोजी होणार आहे. ४) पंचांसमोरच क्रिकेटपटूचा हृदयविकाराच्या धक्क्याने अंत Young Cricketer Death रत्नागिरीत क्रिकेट खेळत असतानाच एका खेळाडूवर काळाने घाला घातल्याची हृदयद्रावक घटना घडलीय. युवा स्पोर्टचे मालक आणि क्रिकेटपटू प्रवीण बबन पवार यांचे क्रिकेट सामन्यादरम्यान हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालंय. तालुक्यातील चिंचखरी येथे सुरू असलेल्या क्रिकेट स्पर्धेत ही घटना घडलीय. सहकाऱ्याने मारलेला चेंडू खेळल्यानंतर धाव घेऊन परत येताना प्रवीण पंचांसमोरच अचानक कोसळले. त्यांना तातडीने उपचारासाठी हलवण्यात आले. मात्र रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांना दुसरा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या अचानक निधनाने संपूर्ण क्रिकेट विश्वात शोककळा पसरलीय. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई आणि बहीण असा परिवार आहे. ५) तीन किंवा अधिक मुले असलेले निवडणूक लढवू शकणार राजस्थान सरकारने मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेण्याचे संकेत दिलेत. दोनपेक्षा जास्त मुले असलेल्या व्यक्तींना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्यास मनाई करणारा सुमारे ३० वर्षांपूर्वीचा कायदा रद्द करण्याचा निर्णय भजनलाल शर्मा सरकार घेणारय. या बदलानंतर तीन किंवा त्याहून अधिक मुले असलेले पालकही पंचायत, नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका लढवू शकणार आहेत. “दोन मुलांची अट” असल्यामुळे अनेक इच्छुक उमेदवार निवडणुकीपासून वंचित राहत होते. त्यामुळे ही अट रद्द करण्याची मागणी दीर्घकाळापासून होत होती. अखेर सरकारने या मागणीची दखल घेत पावले उचलली आहेत. भाजपच्या आमदारांनीही या निर्णयाला पाठिंबा दिला असून, या निर्णयामुळे राजस्थानच्या राजकारणावर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. ६) लग्नाच्या वऱ्हाडावर काळाचा घाला राजस्थानमधील बांसवाडा जिल्ह्यात लग्नाच्या वऱ्हाडावर काळाने घाला घातल्याची धक्कादायक घटना घडलीय. जिल्हा मुख्यालयापासून सुमारे २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या घोटिया अंबा परिसरात वऱ्हाडाची बस महामार्गावर उलटली. या भीषण अपघातात चौघांचा मृत्यू झाला असून ४४ जण गंभीर जखमी झालेत. सज्जनगड पोलीस स्टेशन हद्दीतील सांडलाई गावात शुक्रवारी लग्न पार पडल्यानंतर पाहुणेमंडळी बसमधून घरी परतत होते. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास उतारावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस पलटी झाली. जखमींना तातडीने बांसवाडा येथील महात्मा गांधी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल असून घटनास्थळी ग्रामस्थांनी मदतकार्य केले. जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांनी रुग्णालयात भेट देत उपचारांचे आदेश दिले. ७) मद्यप्रेमींसाठी गुड न्यूज मद्यप्रेमींसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आलीय. भारताने युरोपियन युनियन आणि अमेरिकेसोबत केलेल्या ऐतिहासिक व्यापार करारांमुळे परदेशी मद्याच्या किमतीत मोठी घट होण्याची शक्यताय. १० दिवसांच्या अंतरात झालेल्या या दोन ‘ट्रेड फ्रेमवर्क’ करारांमुळे आयात मद्यावर असलेले सुमारे १६६ टक्के आयात शुल्क मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. नव्या करारानुसार हे शुल्क ३० ते ४० टक्क्यांपर्यंत खाली येऊ शकते. त्यामुळे स्कॉच, बोर्बोनसारखी परदेशी ब्रँडेड दारू ४० टक्क्यांपर्यंत स्वस्त होण्याची शक्यता आहे. सध्या ४५०० ते ६००० रुपयांना मिळणारी दारू आता २५०० ते ३००० रुपयांत मिळू शकते. या निर्णयामुळे दिल्ली, नोएडा, गुरुग्रामसह देशभरातील मद्य बाजारात मोठी स्वस्ताई दिसण्याची शक्यता आहे. ८) ट्रम्पचा आणखी एक कारनामा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा अपमानजनक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केल्याने मोठा वाद निर्माण झालाय. ६२ सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये बराक ओबामा आणि मिशेल ओबामा यांचे चेहरे प्राण्यांच्या शरीरावर दाखवण्यात आले होते. या व्हिडिओला अनेकांनी वर्णद्वेषी आणि अमानवीय असल्याची टीका केलीय. डेमोक्रॅट्ससह काही रिपब्लिकन नेत्यांनीही या कृत्याचा तीव्र निषेध केलाय. सुरुवातीला व्हाईट हाऊसने याला ‘साधा इंटरनेट मीम’ असे संबोधत बचाव केलाय. मात्र नागरी हक्क संघटनांचा संताप वाढल्यानंतर सुमारे १२ तासांनी हा व्हिडिओ हटवण्यात आला. प्रशासनाने हा व्हिडिओ चुकून शेअर झाल्याचे सांगितले. मात्र ट्रम्प यांनी माफी मागण्यास नकार देत, आपण जबाबदार नसल्याचे स्पष्ट केलंय. ९) ड्रामा क्वीन राखी सावंतची ‘बिग बॉस’च्या घरात एन्ट्री होणार ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या पर्वात आता खरा धमाका होणार. प्रेक्षकांमध्ये खळबळ उडवणारी अभिनेत्री राखी सावंत पुन्हा एकदा ‘बिग बॉस मराठी’च्या घरात एन्ट्री घेणार असल्याचं कळतय. सध्या सुरू असलेल्या चौथ्या आठवड्यात हा सर्वात मोठा ट्विस्ट मानला जातोय. राजश्री मराठीने दिलेल्या वृत्तानुसार राखी सावंत वाइल्ड कार्ड नव्हे, तर पाहुणी कलाकार म्हणून घरात दाखल होणार आहे. ती फक्त १५ दिवस म्हणजेच दोन आठवडे घरात राहणारय. राखीचा बेधडक स्वभाव, स्पष्ट वक्तव्ये आणि नाट्यमय अंदाज पाहता, घरातील सदस्यांना पळो की सळो करून सोडणार हे निश्चित आहे. तिच्या एन्ट्रीमुळे घरातील समीकरणे बदलणार असून, वाद, ड्रामा आणि भरपूर मनोरंजन पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांसाठी हे पर्व आणखी रंगतदार ठरणार आहे. १०) जसप्रीत बुमराह पहिल्याच सामन्यातून बाहेर गतविजेता आणि सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये आज आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. पहिला सामना अमेरिकेविरुद्ध मुंबईतील प्रतिष्ठित वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. मात्र, या महत्त्वाच्या सामन्यापूर्वीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह पहिल्याच सामन्याला मुकणार आहे. बुमराहला व्हायरल ताप आल्याने तो या सामन्यात खेळताना दिसणार नाही. संघ व्यवस्थापनाने त्याला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या जागी मोहम्मद सिराजला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे.