‘माझ्याकडेही खूप व्हिडिओ आहेत- युतीच्या घोषणेनंतर राज ठाकरेंचा भाजपला इशारा – आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ऐतिहासिक युतीची औपचारिक घोषणा आज करण्यात आली. ‘आता चुकलात तर संपलात’ अशी साद घालत उद्धव ठाकरे यांनी मुंबई तोडण्याचे मनसुबे रचणाऱ्यांचा राजकीय खात्मा करण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी राज ठाकरे यांनी भाजपवर जोरदार तोफ डागली. युतीच्या चर्चेपासून भाजपकडून जुने व्हिडिओ काढून कोंडी करण्याचा प्रयत्न होत असल्याचा समाचार घेत राज म्हणाले, “मुख्यमंत्र्यांचेही ‘अल्लाहू अकबर’ म्हणतानाचे व्हिडिओ फिरत आहेत. माझ्याकडेही अशा अनेक व्हिडिओंचा साठा असून, ते काय बोलतात त्यावर माझे व्हिडिओ तयार असतील.” या सूचक इशाऱ्याने आगामी निवडणुकीत ‘लाव रे तो व्हिडिओ’चा रोख सत्ताधाऱ्यांकडे असण्याचे संकेत मिळत आहेत. राज्य मंत्रिमंडळाचे चार मोठे निर्णय – धाराशिवमध्ये अण्णाभाऊ साठेंचे स्मारक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज चार महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. नगरपरिषद अधिनियमात सुधारणा करून आता थेट निवडून आलेल्या नगराध्यक्षांना नगरपालिकेत सदस्यत्व आणि मतदानाचा अधिकार बहाल करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. यासाठी लवकरच अध्यादेश काढला जाईल. दुसऱ्या एका मोठ्या निर्णयात, धाराशिव शहरात साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारण्यासाठी दुग्धविकास विभागाची एक एकर जमीन देण्यास मंजुरी दिली. यासोबतच जिल्हा परिषद आरोग्य सेविकांच्या नियुक्त्या नियमित करणे आणि ‘जिल्हा कर्मयोगी २.०’ व ‘सरपंच संवाद’ कार्यक्रम राबवण्यावर शिक्कामोर्तब झाले. दरम्यान, दिल्ली मेट्रोच्या १२ हजार कोटींच्या विस्तारीकरण प्रकल्पालाही केंद्र सरकारने मंजुरी दिलीय. भाजपचे 1 मंत्री 2 आमदारांविरूद्ध अटक वॉरंट – मंत्री नितेश राणे, आमदार दरेकर, लाड अडचणीत – कोरोना काळातील आंदोलनाप्रकरणी कुडाळ न्यायालयाने भाजपच्या बड्या नेत्यांना जोरदार दणका दिलाय. राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे, आमदार प्रवीण दरेकर आणि आमदार प्रसाद लाड यांच्याविरोधात न्यायालयाने अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केलेय. २६ जून २०२१ रोजी सिंधुदुर्गात झालेल्या ओबीसी आरक्षण आणि ‘संविधान बचाव’ आंदोलनाप्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले होते. या खटल्याच्या सुनावणीस नितेश राणे वारंवार अनुपस्थित राहिल्याने न्यायालयाने त्यांच्या वकिलांचा विनंती अर्ज फेटाळून लावत हे कठोर पाऊल उचलले. दरम्यान, माजी आमदार निलेश राणे आणि राजन तेली न्यायालयात हजर होते, मात्र नितेश राणेंसह अन्य पाच जण गैरहजर राहिल्याने कोर्टाने त्यांना दणका दिलाय. लाडकी बहीणींसाठी महत्वाची बातमी – ई-केवायसीसाठी शेवटचा आठवडा शिल्लक – ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याची ३१ डिसेंबर ही अंतिम मुदत असून, आता केवळ एक आठवडा शिल्लक आहे. ज्या महिलांची ई-केवायसी अपूर्ण आहे किंवा ज्यात चुका झाल्या आहेत, त्यांना ही दुरुस्तीची शेवटची संधी देण्यात आलीय. दरम्यान, ऑक्टोबरचा हप्ता मिळाल्यानंतर आता डिसेंबर महिना संपत आला तरी नोव्हेंबरचा हप्ता जमा न झाल्याने महिलांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. एकल, विधवा किंवा घटस्फोटीत महिलांनी पोर्टलवर ई-केवायसी करून संबंधित कागदपत्रे अंगणवाडी सेविकांकडे जमा करण्याचे आवाहन करण्यात आलेय. आतापर्यंत सुमारे पावणे दोन कोटींहून अधिक महिलांनी ही प्रक्रिया पूर्ण केली असून, उर्वरित महिलांनी तातडीने ई-केवायसी करून घेण्याचे निर्देश प्रशासनाने दिलेत. चांदी सव्वा दोन लाखांवर, सोने १.४० लाखांवर – यंदा चांदीत १.३२ लाख रुपयांची दरवाढ – जागतिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मौल्यवान धातूंच्या किमतींनी आज नवा उच्चांक प्रस्थापित केलाय. अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीचे संकेत आणि डॉलरच्या कमकुवतपणामुळे बाजारात मोठी तेजी दिसून आली. चांदीच्या दरात तब्बल ७,९५४ रुपयांची वाढ होऊन जीएसटीसह प्रति किलोचा दर २,२५,५२२ रुपयांवर पोहोचलाय. सोन्याच्या दरातही मोठी वाढ झाली असून, २४ कॅरेट सोन्याचा भाव जीएसटीसह १,४०,७३४ रुपये प्रति तोळा झालाय. तसेच २२ कॅरेटसाठी ग्राहकांना १,२८,९१२ रुपये मोजावे लागताहेत. विशेष म्हणजे, यंदा सोन्यात ६०,८९५ रुपये तर चांदीत १.३२ लाख रुपयांची दरवाढ झालीय. या दरवाढीमुळे सोने-चांदी खरेदी आता सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलीय. EPFO चे कर्मचाऱ्यांना नवीन वर्षाचे गिफ्ट – PF ट्रान्सफरपासून पासबुकपर्यंत १० मोठे बदल – कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने २०२५ मध्ये पीएफ धारकांसाठी १० क्रांतिकारी बदल लागू केलेत. या सुधारणांमुळे आता नोकरी बदलल्यावर पीएफ ट्रान्सफर करण्यासाठी जुन्या कंपनीच्या मंजुरीची गरज लागणार नाही, ही प्रक्रिया ३ ते ५ दिवसांत पूर्ण होईल. महत्त्वाच्या बदलांमध्ये ‘केंद्रीकृत पेन्शन पेमेंट सिस्टम’ द्वारे कोणत्याही बँकेत थेट पेन्शन जमा होणे, ‘पासबुक लाइट’ सुविधेद्वारे विना पासवर्ड बॅलेन्स पाहणे आणि जॉइंट डिक्लेरेशन ऑनलाइन सबमिट करणे यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, आता काही अटींवर पीएफ खात्यातून १००% रक्कम काढण्याची मुभा देण्यात आलीये. ज्या कर्मचाऱ्यांची नोंदणी २०१७ ते २०२५ दरम्यान सुटली होती, त्यांच्यासाठी ‘वन-टाइम एनरोलमेंट’ योजनाही सुरू करण्यात आली असून या सर्व बदलांमुळे पीएफचे काम अधिक पारदर्शक आणि गतिमान झालेय. तैवानमध्ये शक्तिशाली भूकंप- चीन, जपानपर्यंत जाणवले धक्के – तैवानच्या आग्नेय भागात बुधवारी संध्याकाळी ६.१ तीव्रतेच्या भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. भूकंपाचे केंद्र तैतुंग काउंटीपासून १० किमी अंतरावर आणि ११ किमी खोलीवर होते. या भूकंपाचे पडसाद चीन, फिलिपिन्स आणि जपानपर्यंत उमटले. सुदैवाने, राष्ट्रीय अग्निशमन संस्थेने अद्याप कोणत्याही जीवितहानीची किंवा मोठ्या नुकसानीची नोंद केलेली नाही. जगातील सर्वात मोठी चिप उत्पादक कंपनी ‘TSMC’ ने देखील त्यांचे कामकाज सुरक्षित असल्याचे स्पष्ट केलेय. तैवान हे दोन टेक्टोनिक प्लेट्सच्या जंक्शनवर असल्याने येथे भूकंपाचा धोका मोठा असतो. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये ७.४ तीव्रतेच्या भूकंपाने मोठी हानी झाली होती, मात्र यावेळी वेळीच अलर्ट जारी केल्याने मोठी दुर्घटना टळलीय. पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सची विक्री – १५३ अब्ज रुपयांना व्यवहार पूर्ण – आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तान सरकारने अखेर आपली राष्ट्रीय विमान कंपनी ‘पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्स’ खासगी समूहाला विकलीये. आरिफ हबीब कन्सोर्टियमने १३५ अब्ज पाकिस्तानी रुपयांची सर्वोच्च बोली लावून ही कंपनी खरेदी केली. लकी सिमेंट आणि एअरब्लू यांसारख्या कंपन्यांना मागे टाकत आरिफ हबीब समूहाने हा ऐतिहासिक व्यवहार पूर्ण केला. पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी या प्रक्रियेला पारदर्शक ठरवले. या विक्रीसोबतच पीआयएच्या कर्मचाऱ्यांच्या पगाराची चर्चा पुन्हा सुरू झालीय. खासगी विमान कंपन्यांच्या तुलनेत पीआयए आपल्या एअर होस्टेसना अधिक वेतन देते. एका एअर होस्टेसचा सुरुवातीचा पगार ८० हजार ते १.२० लाख रुपये असून, अनुभवानुसार तो ५ लाख रुपयांपर्यंत पोहोचतो. आता खासगीकरणानंतर या वेतनश्रेणीत काय बदल होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेय. रोशन कुटुंबात नव्या सुनेचे आगमन – हृतिकची भावजय ऐश्वर्या सिंह आहे तरी कोण? बॉलिवूडचा ‘ग्रीक गॉड’ हृतिक रोशनच्या कुटुंबात सध्या लग्नाचा उत्साह पाहायला मिळतोय. प्रसिद्ध संगीतकार राजेश रोशन यांचा मुलगा आणि हृतिकचा लहान भाऊ ईशान रोशन याने ऐश्वर्या सिंह हिच्याशी लग्नगाठ बांधलीय. ऐश्वर्याच्या सौंदर्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली असून ती बॉलिवूड अभिनेत्रींनाही टक्कर देतेय. ऐश्वर्या ही व्यवसायाने एक मॉडेल आणि अभिनेत्री असून तिने अनेक जाहिरातींमध्ये काम केलेय, २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘फौजा’ या चित्रपटात ती झळकली होती. अभिनयासोबतच ऐश्वर्या सोशल मीडियावर सक्रिय असून तिला फिरण्याची प्रचंड आवड आहे. दुसरीकडे, ईशान रोशन हा ‘एचआरएक्स फिल्म्स’मध्ये निर्माता म्हणून कार्यरत आहे. रोशन कुटुंबातील या शाही विवाहसोहळ्याचे फोटो सध्या इंटरनेटवर तुफान व्हायरल होतायेत. विराटचा विजय हजारे ट्रॉफीत मोठा धमाका – सचिन तेंडुलकरचा मोडला वर्ल्ड रेकॉर्ड – विराट कोहली सध्या विध्वंसक फॉर्ममध्ये असून विजय हजारे ट्रॉफीत त्याने आंध्र प्रदेशविरुद्ध केवळ ८३ चेंडूंमध्ये शतक झळकावले. तब्बल १६ वर्षांनंतर या स्पर्धेत विराटने शतकी खेळी केली असून, यापूर्वी २००९ मध्ये त्याने हरियाणाविरुद्ध शतक केले होते. या शतकासह त्याने सचिन तेंडुलकरचा विश्वविक्रम मोडीत काढलाय. लिस्ट-ए क्रिकेटमध्ये सर्वात जलद १६,००० धावा पूर्ण करण्याचा मान आता विराटला मिळालाय. त्याने हे यश ३३० डावांत मिळवले, तर सचिनला ३९१ डाव लागले होते. विराटची ही फलंदाजी पाहण्यासाठी चाहत्यांनी चक्क झाडावर चढून आपला जीव धोक्यात घातला होता. आगामी न्यूझीलंड मालिकेपूर्वी विराटचा हा फॉर्म टीम इंडियासाठी शुभसंकेत आहे.