भाजपची काॅंग्रेससोबत झाली युती; अंबरनाथमध्ये राजकीय भूकंप ठाणे जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली असून, अंबरनाथ नगरपरिषदेत सत्ता स्थापनेसाठी भाजपने चक्क काँग्रेससोबत हातमिळवणी केलीय. यामुळे राज्यात महायुतीत असलेल्या शिंदे गटाला मोठा धक्का बसलाय. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ५९ जागांपैकी शिंदे गटाने सर्वाधिक २३ जागा जिंकल्या, तर भाजपने १६, काँग्रेसने १२ आणि अजित पवार गटाने ४ जागांवर विजय मिळवला. भाजपने काँग्रेस आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या मदतीने ३२ नगरसेवकांचे संख्याबळ जुळवत सत्ता काबीज केली. भाजपच्या तेजश्री करंजुले नगराध्यक्षपदी विराजमान झाल्यात. शिंदे गटाचे आमदार बालाजी किणीकर यांनी याला ‘विश्वासघात’ म्हणत ही अभद्र युती असल्याची टीका केली. दुसरीकडे, शिंदे गटाचा भ्रष्टाचार रोखण्यासाठीच ही भूमिका घेतल्याचे भाजप उपाध्यक्ष गुलाबराव करंजुले यांनी स्पष्ट केले. या घडामोडीमुळे जिल्ह्यातील महायुतीच्या समीकरणांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेय. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मागितील माफी; म्हणाले, त्यांच्या मुलांच्या भावना दुखावल्या… “लोकांसाठी जगलेल्या माणसांची नावं मनावर कोरलेली असतात. लिहिलेलं पुसता येतं, कोरलेलं नाही,” अशा शब्दांत अभिनेते रितेश देशमुख यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना प्रत्युत्तर दिलेय. लातूरमधील प्रचारसभेत चव्हाण यांनी ‘विलासराव देशमुखांच्या आठवणी पुसल्या जातील’ असे वादग्रस्त विधान केले होते. यावर अमित देशमुख यांनीही ‘बाहेरच्यांनी सांगून आठवणी पुसल्या जात नाहीत’ असा टोला लगावला, तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर सत्तेच्या मदातून टीका केल्याचा आरोप केला. सर्व स्तरांतून उमटलेल्या तीव्र प्रतिक्रियांनंतर आणि वादाचे गांभीर्य ओळखून रवींद्र चव्हाण यांनी अखेर दिलगिरी व्यक्त केलीय. विलासराव देशमुख यांच्या नावाने काँग्रेस मते मागत आहेत. त्यामुळे मी तसे वक्तव्य केले होते. मात्र, त्यांच्या मुलांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करत असल्याचे चव्हाण यांनी म्हटलेय. 70 हजार कोटींच्या प्रकरणाचा निकाल…; बावनकुळेंचा अजित पवारांना सूचक इशारा महापालिका निवडणुकीच्या तोंडावर महायुतीतील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. ‘ज्यांनी ७० हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यांच्यासोबतच मी सत्तेत बसलोय’, या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विधानाचा भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी समाचार घेतलाय. “आम्ही जर मागची पाने चाळली, तर अजितदादांना बोलता येणार नाही,” असा थेट इशारा बावनकुळेंनी दिला. ७० हजार कोटींच्या प्रकरणाचा निकाल अद्याप लागलेला नसून हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महायुतीत मनभेद निर्माण होतील असे विधान करू नये, असा सल्लाही त्यांनी पवारांना दिला. पिंपरी-चिंचवडमधील राजकीय वर्चस्वावरून उभय पक्षांतील हा संघर्ष आता टोकाला पोहोचल्याचे दिसून येतेय. सोनिया गांधी रुग्णालयात दाखल; श्वसनाचा त्रास जाणवल्याने उपचार सुरू काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांना श्वसनाचा त्रास जाणवल्याने दिल्लीतील सर गंगा राम रुग्णालयात दाखल करण्यात आलेय. वाढते प्रदूषण आणि थंडीमुळे त्यांच्या ‘ब्रॉन्किअल अस्थमा’चा त्रास बळावल्याने खबरदारी म्हणून त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलेय. रुग्णालयाचे डॉ. अजय स्वरूप यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनिया गांधी यांची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा होतेय. त्यांना तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली उपचार दिले जाताहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांना खोकल्याचा त्रास जाणवत होता, त्यामुळे नियमित तपासणीसाठी त्यांना सोमवारी सायंकाळी रुग्णालयात आणले गेले. प्रकृतीचा आढावा घेऊन पुढील एक-दोन दिवसांत त्यांना डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. EPFO कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; वेतन मर्यादेत होणार वाढ, SCचे केंद्राला आदेश कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजनेच्या वेतन मर्यादेत वाढ करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला महत्त्वपूर्ण आदेश दिलाय. गेल्या ११ वर्षांपासून ही मर्यादा १५,००० रुपयांवर स्थिर असल्याने, त्यावर चार महिन्यांच्या आत निर्णय घेण्याचे निर्देश न्यायालयाने दिलेत. न्यायमूर्ती जे. के. माहेश्वरी आणि न्यायमूर्ती ए. एस. चंदुरकर यांच्या खंडपीठाने सामाजिक कार्यकर्ते नवीन प्रकाश नौटियाल यांच्या याचिकेवर हा निकाल दिला. याचिकेत म्हटलेय की, अनेक राज्यांमध्ये किमान वेतन १५,००० रुपयांपेक्षा जास्त असूनही ईपीएफ मर्यादा न वाढवल्याने लाखो कामगार सामाजिक सुरक्षेपासून वंचित आहेत. ईपीएफओच्या उपसमितीने २०२२ मध्येच मर्यादा वाढवण्याची शिफारस केली होती, मात्र केंद्र सरकारने अद्याप त्यावर शिक्कामोर्तब केलेले नाही. न्यायालयाने स्पष्ट केले की, वेतन मर्यादा वाढवण्याबाबत सरकारला आता अधिक काळ प्रतीक्षा करता येणार नाही. या निर्णयामुळे खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या पेन्शन आणि भविष्य निर्वाह निधीत मोठी वाढ होण्याची शक्यता निर्माण झालीय. महिंद्राची XUV 7XO बाजारात दाखल; ‘हे’ 8 फीचर्स आता सर्व व्हेरिएंट्समध्ये महिंद्रा अँड महिंद्राने आपल्या लोकप्रिय XUV700 चे फेसलिफ्ट मॉडेल ‘XUV 7XO’ या नावाने भारतीय बाजारपेठेत लाँच केलेय. या एसयूव्हीची सुरुवातीची किंमत १३.६६ लाख एक्स-शोरूम असून, याची स्पर्धा टाटा सफारी आणि एमजी हेक्टरशी असेल. या नव्या मॉडेलचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे कंपनीने सर्व व्हेरिएंट्समध्ये ८ स्टँडर्ड फीचर्स दिलेत. यामध्ये ट्रिपल ३१.२४ सेमी कोस्ट-टू-कोस्ट एचडी स्क्रीन, ९३ कनेक्टेड फीचर्ससह ‘अॅड्रिनॉक्स+’, अलेक्सा आणि चॅटजीपीटी सपोर्ट, वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ॲपल कारप्ले यांचा समावेश आहे. सुरक्षिततेसाठी सर्व मॉडेल्समध्ये ६ एअरबॅग्ज देण्यात आल्यात. याशिवाय क्रूझ कंट्रोल, पुश बटन स्टार्ट/स्टॉप आणि बाय-एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प्स देखील स्टँडर्ड मिळतील. ८ जानेवारीपासून बुकिंग सुरू होणार असून, डिलिव्हरी एप्रिल 2026 पर्यंत टप्प्याटप्प्याने केली जाईल. Redmi Note 15 5G आणि Pad 2 Pro भारतात लाँच; 9 आणि 12 जानेवारीपासून विक्री सुरू प्रसिद्ध टेक ब्रँड ‘रेडमी’ने नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच भारतीय बाजारपेठेत Redmi Note 15 5G स्मार्टफोन आणि Redmi Pad 2 Pro 5G टॅबलेट सादर केलेत. Redmi Note 15 5G या फोनमध्ये ६.७७ इंच AMOLED डिस्प्ले, Snapdragon 6 Gen 3 प्रोसेसर आणि १०८ MP मुख्य कॅमेरा आहे. ८/१२८ GB व्हेरिएंटची किंमत २२,९९९ रुपये असून ९ जानेवारीपासून याची विक्री सुरू होईल. Redmi Pad 2 Pro 5G या १२.१ इंच डिस्प्ले असलेल्या या टॅबलेटमध्ये १२,००० mAh ची शक्तिशाली बॅटरी देण्यात आलीय. वाय-फाय मॉडेलची किंमत २२,९९९ तर ५जी मॉडेलची किंमत २५,९९९ रुपये आहे. १२ जानेवारीपासून हा टॅबलेट खरेदीसाठी उपलब्ध होईल. निवडक बँकांच्या कार्डवर ग्राहकांना ३,००० रुपयांपर्यंत सवलत देखील मिळणार आहे. शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी घसरण; घसरणीमागे काय आहेत प्रमुख कारणे ? भारतीय शेअर बाजारात मंगळवारी ६ जानेवारी रोजी सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण पाहायला मिळाली. व्यवहारादरम्यान सेन्सेक्स ५०० अंकांनी कोसळला, तर निफ्टीने २६,१५० च्या खाली धाव घेतली. प्रामुख्याने ट्रेन्ट, रिलायन्स, आयटीसी यांसारख्या दिग्गज शेअर्समधील नफावसुली आणि परदेशी गुंतवणूकदारांच्या सततच्या विक्रीमुळे बाजाराचे मनोबल खचले. या घसरणीमागे रशियाकडून तेल खरेदी केल्यास अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर ‘टॅरिफ’ वाढवण्याचे संकेत दिल्याने गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. जानेवारीच्या सुरुवातीलाच विदेशी गुंतवणूकदारांनी ३,००० कोटींहून अधिक रकमेचे शेअर्स विकले आहेत. व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांच्या अटकेमुळे भू-राजकीय अस्थिरता वाढली आहे, अशी कारणे सांगितली जात आहेत. दरम्यान, दिवसाअखेर सेन्सेक्स 376 अंकांनी घसरून ८५,०६३ वर, तर निफ्टी 74 अंकांनी घसरून २६,१७५ अंकांवर बंद झाला. तज्ज्ञांच्या मते, निफ्टीला २६,१०० स्तरावर आधार मिळू शकतो. आज ट्रेन्ट कंपनीचा शेअर सर्वाधिक 8 टक्कयांनी घसरला. प्रभासच्या ‘द राजा साब’चा धमाकेदार रिव्ह्यू; संक्रांतीला चित्रपटगृहात येणार नवा थरार दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासचा बहुप्रतीक्षित हॉरर-कॉमेडी चित्रपट ‘द राजा साब’ ९ जानेवारी २०२६ रोजी प्रदर्शित होत आहे. सेन्सॉर बोर्डाने याला ‘UA’ प्रमाणपत्र दिले असून, ३ तास १० मिनिटांच्या या चित्रपटाचा पहिला रिव्ह्यू अत्यंत सकारात्मक आलाय. दिग्दर्शक मारुतीने यात हॉरर, कॉमेडी आणि ॲक्शनचा जबरदस्त मेळ घातलाय. चित्रपटाचा क्लायमॅक्स आणि संजय दत्तची भूमिका प्रेक्षकांसाठी मोठे सरप्राईज ठरेल. भव्य सेट्स आणि थमन एस. यांच्या संगीताने चित्रपटाला भव्यता दिलीय. आर्थिक तंगीशी झुंजणारा राजा साब प्रभास आपल्या रहस्यमयी महालात परतल्यावर काय घडते, याची ही रंजक कथा यात दिलीय. संक्रांतीच्या मुहूर्तावर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाका करण्यासाठी सज्ज झालाय. शिखर धवन सोफी शाइनसोबत करणार विवाह; फेब्रुवारी 2026 मध्ये दिल्लीत लग्नगाठ बांधणार भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर शिखर धवन पुन्हा एकदा विवाहबंधनात अडकणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिखर आपली दीर्घकाळाची मैत्रीण आणि आयर्लंडची मॉडेल सोफी शाइन हिच्याशी फेब्रुवारी २०२६ मध्ये दिल्ली-एनसीआरमध्ये लग्नगाठ बांधणार आहे. गेल्या काही काळापासून त्यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ दरम्यान सोफीला शिखरसोबत स्टँड्समध्ये पाहिल्यानंतर या चर्चांना उधाण आले होते. दुबईत सुरू झालेल्या मैत्रीचे रूपांतर आता प्रेमात झाले असून, या शाही विवाहात क्रिकेट आणि बॉलिवूडमधील दिग्गज उपस्थित राहण्याची शक्यता आहे. सोफी शाइन ही आयर्लंडमधील एक यशस्वी प्रॉडक्ट कन्सल्टंट असून, सध्या ती अबू धाबी येथे कार्यरत आहे. शिखरचे पहिले लग्न आयशा मुखर्जीशी झाले होते, मात्र २०२३ मध्ये त्यांचा कायदेशीर घटस्फोट झाला. आता शिखर आपल्या आयुष्याची ही नवी इनिंग सुरू करण्यासाठी सज्ज झालाय.