जिल्हा परिषद निवडणुकांना मुदतवाढ; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला दिलासा राज्यातील प्रलंबित जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला मोठा दिलासा दिलाय. या निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी न्यायालयाने १५ दिवसांची मुदतवाढ दिली असून, आता १५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत मुदत निश्चित केलीय. यापूर्वी ही मुदत ३१ जानेवारीपर्यंत होती. ज्या जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडली गेलेली नाही, तिथे निवडणुका घेण्याचे आदेश न्यायालयाने दिलेत. सद्यस्थितीत १२ जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाचा पेच नसून, उर्वरित २० जिल्ह्यांबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे. दरम्यान, सर्व निवडणुका एकाच वेळी घेण्याबाबत सोलापूरमधून नवीन याचिकाही दाखल झालीय. आता आयोग टप्प्याटप्प्याने की एकत्रित निवडणुका घेणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेय. डोंबिवलीत मतदारांना पाकिटातून पैसे वाटप? भाजपने आरोप फेटाळले कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक २९ मध्ये मतदारांना पैसे वाटप केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ उडालीय. पांढऱ्या पाकिटातून पाचशेच्या सहा नोटा अर्थात ३ हजार रुपये वाटल्याचा आरोप मनसे नेते राजू पाटील आणि आमदार रोहित पवार यांनी केलाय. संबंधित महिलांच्या हातात भाजपची पत्रकेही दिसत आहेत. विशेष म्हणजे, येथे युती असूनही शिंदे गटाचे उमेदवार नितीन पाटील यांनी भाजप कार्यकर्त्यांवर पैसे वाटपाचा थेट आरोप केलाय. दरम्यान, भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी हे आरोप फेटाळले असून, कार्यकर्त्यांना अडवून त्यांच्या खिशात पैसे कोंबल्याचा दावा केलाय. मतदानाला काही तास उरले असताना या प्रकारामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापलेय. महाराष्ट्रात हुडहुडी वाढली, थंडीच्या लाटेचा इशारा; हिमवृष्टीमुळे थंडीचा जोर आठवडाभर कायम उत्तरेकडून येणाऱ्या तीव्र शीतलहरींमुळे महाराष्ट्रसह संपूर्ण देश गारठलाय. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात थंडीचा कडाका वाढला असून अनेक ठिकाणी किमान तापमानात मोठी घट झालीय. मुंबई आणि उपनगरातही हुडहुडी भरली असून, गोंदिया शहरात पुन्हा एकदा ९.५ इतकी कमी तापमानाची नोंद करण्यात आलीय. तर ब्रम्हपुरी येथे सर्वाधिक ३१ अंश सेल्सिअस इतके कमाल तापमान नोंदवण्यात आलेय. पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर पहाटे दाट धुक्यामुळे दृश्यमानता कमी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, हिमाचल आणि काश्मीरमध्ये होत असलेल्या हिमवृष्टीमुळे थंडीचा हा जोर आठवडाभर कायम राहील, असा अंदाज वर्तवण्यात आलाय. प्रशासनाने नागरिकांना, विशेषतः वृद्ध आणि बालकांना आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केलेय. ला-नीना प्रभाव संपत असल्याने हवामानात हे मोठे बदल जाणवत आहेत. 500% टॅरिफच्या धमकीनंतर ट्रम्प यांचा भारत दौरा; अमेरिकन राजदूतांचे मोठे विधान रशियाकडून तेल खरेदी केल्यास ५००% टॅरिफ लावण्याच्या धमकीनंतर आता भारत-अमेरिका संबंधांबाबत महत्त्वाची अपडेट समोर आलीय. अमेरिकेचे नवनियुक्त राजदूत सर्जियो गोर यांनी पदभार स्वीकारताच पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मैत्रीचा पुनरुच्चार केलाय. गोर यांच्या मते, दोन्ही देशांमधील मैत्री विश्वासावर आधारलेली असून छोटे-मोठे मतभेद चर्चेतून सुटतील. विशेष म्हणजे, आगामी १ ते २ वर्षांत राष्ट्राध्यक्ष ट्रम्प भारताचा दौरा करण्याची शक्यता त्यांनी वर्तवलीय. दरम्यान, व्यापार करारावर तोडगा काढण्यासाठी उभय देशांच्या अधिकाऱ्यांमध्ये उद्या, मंगळवारी महत्त्वाची चर्चा होणार आहे. ऊर्जा, संरक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्य वाढवण्यावरही दोन्ही देशांचा भर आहे. पीएम मोदी, जर्मन चांसलरने लुटला पतंगबाजीचा आनंद; भारतीयांसाठी ‘व्हिसा मुक्त’ सुविधेची घोषणा भारताच्या दौऱ्यावर असलेले जर्मनीचे चांसलर फ्रेडरिक मर्ज यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. अहमदाबादमध्ये सुरू असलेल्या ‘आंतरराष्ट्रीय पतंग उत्सवात’ दोन्ही नेत्यांनी सहभाग घेत पतंग उडवण्याचा आनंद लुटला. पंतप्रधान मोदींनी या भेटीचे फोटो शेअर करत चांसलर मर्ज यांचे स्वागत केले. या दौऱ्यात भारत आणि जर्मनी दरम्यान व्यापार, गुंतवणूक आणि संरक्षण क्षेत्रातील सहकार्य वाढवण्यावर सविस्तर चर्चा झाली. मोदींनी जर्मन विद्यापीठांना भारतात कॅम्पस सुरू करण्याचे निमंत्रण दिले, तर जर्मनीने भारतीयांसाठी ‘व्हिसा मुक्त’ सुविधेची महत्त्वाची घोषणा केली. तंत्रज्ञान, सेमीकंडक्टर आणि हवामान बदल यांसारख्या जागतिक मुद्द्यांवर दोन्ही देशांनी एकत्र काम करण्याचा निर्धार व्यक्त केलाय. आजपासून रेल्वे तिकीट बुकिंगचे नियम बदलले; आधार लिंक असल्याशिवाय आरक्षण नाही भारतीय रेल्वेने आज 12 जानेवारीपासून तिकीट बुकिंगच्या नियमांत महत्त्वाचे बदल केलेत. आता आगाऊ आरक्षण कालावधीच्या पहिल्या दिवशी तिकीट बुक करण्यासाठी IRCTC खाते आधार कार्डशी लिंक असणे अनिवार्य आहे. बोगस बुकिंग आणि एजंटवर आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. यासोबतच रेल्वेने भाडेवाढही केली असून, अंतराच्या नुसार तिकिटांच्या दरात ५ ते २० रुपयांपर्यंत वाढ करण्यात आलीय. आधार कार्ड आयआरसीटीसी सोबत लिंक करण्यासाठी IRCTC च्या अधिकृत वेबसाइट किंवा ॲपवर लॉग-इन करा. ‘My Account’ विभागातील ‘Link Your Aadhaar’ पर्यायावर क्लिक करा. तुमचा आधार क्रमांक आणि नाव टाकून ‘Send OTP’ वर क्लिक करा. मोबाईलवर आलेला ओटीपी प्रविष्ट करून व्हेरिफिकेशन पूर्ण करा. 5 दिवसांच्या घसरणी लागला ब्रेक; सेंसेक्स ३०२ अंकांनी वाढला भारतीय शेअर बाजारात गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या घसरणीला अखेर सोमवारी पूर्णविराम मिळाला. सुरुवातीच्या सत्रात विक्रीचा दबाव असूनही, बाजार सावरला आणि मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ‘सेंसेक्स’ ३०२ अंकांच्या वाढीसह ८३,८७८ वर बंद झाला. तसेच राष्ट्रीय शेअर बाजाराचा ‘निफ्टी’ १०७ अंकांनी वधारून २५,७९० च्या पातळीवर पोहोचला. अमेरिकेचे राजदूत सर्जियो गोर यांनी भारत-अमेरिका व्यापार कराराबाबत सकारात्मक संकेत दिल्याने गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. आज टाटा स्टील, एशियन पेंट्स आणि एसबीआय यांसारख्या शेअर्समध्ये मोठी खरेदी दिसून आली. मात्र, दुसरीकडे मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये विक्री कायम राहिल्याने ते लाल निशाण्यावर बंद झाले. टाटाच्या कारवर 85 हजार रुपयांपर्यंत सूट; ऑफर 31 जानेवारीपर्यंत लागू नवीन वर्षाच्या स्वागतासाठी टाटा मोटर्सने आपल्या पेट्रोल/डिझेल/सीएनजी मॉडेल्सवर आकर्षक सवलती जाहीर केल्या आहेत. ३१ जानेवारीपर्यंत लागू असलेल्या या ऑफरमध्ये ग्राहक तब्बल ८५,००० रुपयांपर्यंत बचत करू शकतात. या यादीत अल्ट्रोज मॉडेलवर सर्वाधिक ८५ हजार रुपयांची सूट मिळत आहे. लोकप्रिय नेक्सॉनवर ५०,००० रुपये, तर हॅरियर आणि सफारीवर प्रत्येकी ७५,००० रुपयांचा लाभ दिला जातोय. पंच आणि कर्व्ह यांसारख्या गाड्यांवर ४०,००० रुपयांपर्यंत डिस्काउंट उपलब्ध आहे. या व्यतिरिक्त ग्राहकांना एक्स्चेंज बोनस, लॉयल्टी बोनस आणि कॉर्पोरेट सवलतींचाही फायदा घेता येईल. टाटांच्या एन्ट्री लेव्हल कार टियागो आणि टिगोरवरही ३५,००० रुपयांपर्यंत सूट देण्यात आलीय. ही ऑफर शहर आणि स्टाॅकनुसार बदलते, त्यामुळे जवळच्या टाटा शोरूमला भेट देऊन अधिकृत माहिती घ्या. राणी मुखर्जीच्या ‘मर्दानी 3’ चा ट्रेलर प्रदर्शित; बेपत्ता मुलींच्या प्रश्नावर भाष्य करणारा चित्रपट यश राज फिल्म्सच्या बहुप्रतिक्षित ‘मर्दानी ३’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, राणी मुखर्जी पुन्हा एकदा ‘शिवानी शिवाजी रॉय’ या निर्भय पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत पडद्यावर धडकणार आहे. या तिसऱ्या भागात शिवानीचा सामना एका अत्यंत क्रूर आणि शक्तिशाली महिला खलनायिकेशी होणार आहे, जिची भूमिका मल्लिका प्रसाद साकारत आहे. हा चित्रपट देशातील बेपत्ता मुलींच्या गंभीर प्रश्नावर भाष्य करणारा असून, यामध्ये ‘शैतान’ फेम जानकी बोडीवाला देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसेल. अभिराज मिनावाला दिग्दर्शित हा चित्रपट सामाजिक वास्तवावर प्रहार करणारा आहे. मानवी तस्करी आणि सिरीयल रेपिस्टनंतर, आता समाजातील आणखी एका गडद सत्याचा पर्दाफाश करण्यासाठी सज्ज असलेला ‘मर्दानी ३’ येत्या ३० जानेवारी २०२६ रोजी जगभरात प्रदर्शित होईल. वॉशिंग्टन सुंदर न्यूझीलंड मालिकेतून बाहेर; टीम इंडियाला धक्का,आयुष बडोनीची वर्णी न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात भारतीय अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर याला बरगड्यांना दुखापत झाल्यामुळे तो संपूर्ण मालिकेतून बाहेर पडलाय. पहिल्या सामन्यात गोलंदाजी करताना त्याला हा त्रास जाणवला, त्यानंतर तो क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरला नव्हता. बीसीसीआयने सुंदरच्या जागी युवा फलंदाज आयुष बडोनी याचा संघात समावेश केलाय. बडोनी राजकोटमध्ये होणाऱ्या दुसऱ्या सामन्यापूर्वी भारतीय संघात सामील होईल. ऋषभ पंत आणि तिलक वर्मानंतर सुंदर हा मालिकेतून बाहेर पडलेला तिसरा भारतीय खेळाडू ठरलाय.