Todays Top 10 News: लाडक्या बहिणींचे E-Kyc पोर्टल पुन्हा सुरू; 31 मार्चपर्यंत दुरुस्तीची संधी ladki bahin yojana मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला असून तांत्रिक चुकांमुळे रखडलेले हप्ते आता लवकरच मार्गी लागणार आहेत. ई-केवायसी करताना सरकारी नोकरी किंवा निवृत्तीवेतनाबाबत चुकीचा पर्याय निवडला गेल्याने अनेक पात्र महिलांचे अर्ज प्रलंबित राहिले होते. या पार्श्वभूमीवर, महिला व बाल विकास विभागाने ई-केवायसी पोर्टल पुन्हा कार्यान्वित केलेय. ज्या महिलांनी अर्जात त्रुटी ठेवल्या आहेत, त्यांना आता ३१ मार्च २०२६ पर्यंत ऑनलाईन दुरुस्ती करता येईल. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत होणारी प्रत्यक्ष पडताळणी क्लिष्ट ठरत असल्याने प्रशासनाने हा सुटसुटीत मार्ग निवडलाय. यामुळे हजारो महिलांच्या खात्यात प्रलंबित हप्ते जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला असून, महायुती सरकारने लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याचे आश्वासनही दिलेय. सविस्तर वृत्त – लाडक्या बहिणींसाठी अखेरची संधी! e-KYC मधील चूक दुरुस्त करा, शेवटची तारीख काय? अजित पवारांच्या मृत्यूचे राजकारण बंद झाले पाहिजे; देवेंद्र फडणवीसांनी सर्वांनाच खडसावले devendra fadnavis राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनानंतर सुरू असलेल्या राजकीय वादावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र संताप व्यक्त केलाय. या दुर्दैवी घटनेचे भांडवल करून खालच्या पातळीचे राजकारण करणे अत्यंत चुकीचे आणि दुर्दैवी असल्याचे त्यांनी सांगितले. बारामतीकडे जाताना झालेल्या या भीषण अपघाताची सखोल चौकशी सुरू असून, अशा काळात संयम राखणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. दरम्यान, सुनेत्रा पवार यांचा शपथविधी ही प्रशासकीय गरज असून त्यावरून तर्कवितर्क लढवू नयेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. याचवेळी फडणवीस यांनी विदर्भातील औद्योगिक विकासावर भाष्य करत नागपूरमधील महिंद्रा समूहाच्या १५ हजार कोटींच्या गुंतवणुकीचे स्वागत केले, ज्यामुळे राज्याच्या प्रगतीला नवी चालना मिळणार आहे. पोलिसांना पाहताच नवरदेव पळत सुटला, बीडमध्ये बालविवाह उधळला; 100 जणांवर गुन्हा बीड जिल्ह्यातील कपिलधार येथे एका अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावून देण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सामाजिक कार्यकर्त्यांसह लग्नस्थळी छापा टाकला. पोलिसांची चाहूल लागताच नवरदेवाने लग्नमंडपातून पळ काढला. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात वधू-वरांचे आई-वडील, नातेवाईक, वऱ्हाडी आणि देवस्थानच्या विश्वस्तांसह एकूण १०० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. राज्यात बालविवाहास सक्त बंदी असतानाही छुप्या पद्धतीने असे प्रकार घडत असल्याने संताप व्यक्त होत आहे. सध्या पोलीस फरार नवरदेवाचा शोध घेत असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. सविस्तर वृत्त – नटून थटून आलेला नवरदेव भर मंडपातून पळाला; नेमकं काय घडलं? अजित पवारांच्या विमानात बॉम्ब होता का? खासदार बजरंग सोनवणेंचा गंभीर सवाल bajrang sonawane and ajit pawar उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी या घटनेबाबत गंभीर शंका उपस्थित केल्यात. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी विमानातील मृतांच्या संख्येवरून प्रश्नचिन्ह उपस्थित केले. विमानात एकूण सहा प्रवासी असताना केवळ पाचच मृतदेह कसे सापडले, असा सवाल त्यांनी केला. विमानाचा हवेतच झालेला स्फोट पाहता त्यात बॉम्ब होता का, याची सखोल चौकशी करण्याची मागणी सोनवणे यांनी केली. या प्रकरणाचे सत्य समोर येण्यासाठी अजित पवारांच्या प्रवासाचे सीसीटीव्ही फुटेज जाहीर करावे, असेही ते म्हणाले. आपल्या राजकीय प्रवासात अजित पवारांचे योगदान मोठे असून, येडेश्वरी कारखाना परिसरात त्यांचे भव्य स्मारक उभारणार असल्याचे सोनवणे यांनी यावेळी जाहीर केले. जालन्यात 25 कोटींचा अतिवृष्टी अनुदान घोटाळा; मुख्य आरोपीला अखेर बेड्या जालना जिल्हयातील अंबड आणि घनसावंगी तालुक्यात अतिवृष्टीच्या नावाखाली तब्बल २४ कोटी ९० लाख ७७ हजार ८११ रुपयांचा महाघोटाळा उघडकीस आलाय. या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने मुख्य आरोपी, सहायक महसूल अधिकारी आशिष पैठणकर याला अटक केलीय. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या यादीत बनावट नावे घुसवून हा सरकारी निधी लाटण्यात आला. विशेष म्हणजे, या लाभार्थ्यांच्या नावे कोणतीही शेतजमीन नव्हती. या गैरव्यवहारात २२ तलाठ्यांसह एकूण २८ जणांविरुद्ध गुन्हे दाखल असून, आतापर्यंत ३२ जणांना अटक करण्यात आलीय. गेल्या पाच महिन्यांपासून फरार असलेला पैठणकर जामिनासाठी प्रयत्न करत असताना पोलिसांनी त्याला तांत्रिक तपासाच्या आधारावर जाळ्यात ओढले. या कारवाईमुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडालीय. Jalna: महसूल विभागात खळबळ! 25 कोटींचा अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यातील मुख्य आरोपी आशिष पैठणकरला बेड्या बँकेचे कर्ज घेतलेल्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी; लोन रिकव्हरी एजंटचा त्रास थांबणार rbi बँकेचे कर्ज घेतलेल्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अनेकदा कर्ज वसुलीसाठी रिकव्हरी एजंट ग्राहकांना मानसिक त्रास देतात, पण आता रिझर्व्ह बँकेने यावर कडक निर्बंध आणलेत. आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितले की, वसुलीच्या नावाखाली ग्राहकांना आता कोणीही छळू शकणार नाही. तसेच, बँका आता ग्राहकांना फसवून कोणतीही चुकीची पॉलिसी किंवा स्कीम विकू शकणार नाहीत. जर तुमच्या बँक खात्यातून ऑनलाईन फसवणुकीद्वारे पैसे चोरीला गेले, तर आता तुमची जबाबदारी मर्यादित असेल आणि तुम्हाला २५ हजार रुपयांपर्यंतची भरपाई मिळू शकेल. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांचे डिजिटल व्यवहार अधिक सुरक्षित करण्यासाठी नवीन नियम लागू केले जाणार आहेत. सामान्यांची फसवणूक टाळण्यासाठी आणि बँकिंग व्यवहार अधिक पारदर्शक करण्यासाठी आरबीआयने हे पाऊल उचलले आहे. आज झालेल्या पतधोरण बैठकीत हे निर्णय घेण्यात आलेत. दरम्यान रेपो दर 5.25 वर स्थिर ठेवण्यात आलाय. सविस्तर वृत्त – MPC meeting: बँक ग्राहकांच्या सुरक्षेसाठी RBIचा मोठा निर्णय; फसवणूक आणि ‘मिस-सेलिंग’ला बसणार लगाम नवी कार खरेदी करताय? ‘या’ 5 गोष्टी नक्की लक्षात ठेवा नवी कार खरेदी करणे हा एक महत्त्वाचा निर्णय असतो, मात्र योग्य नियोजनाअभावी अनेकदा ग्राहकांना नंतर पश्चाताप करावा लागतो. म्हणूनच कार घेण्यापूर्वी सर्वप्रथम आपले बजेट निश्चित करणे आवश्यक आहे. तुमच्या कुटुंबाची गरज आणि आवडीनुसार हॅचबॅक, सेडान किंवा एसयूवी यांपैकी योग्य पर्यायाची निवड करावी. कारचा वापर प्रामुख्याने शहरात होणार की हायवेवर, यानुसार इंजिनची क्षमता आणि इंधन प्रकार (पेट्रोल, डिझेल, सीएनजी किंवा इलेक्ट्रिक) ठरवणे फायद्याचे ठरते. आजच्या काळात केवळ लूक किंवा मायलेजवर अवलंबून न राहता कारमधील फीचर्स आणि सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे. स्वस्त कारच्या नादात सुरक्षेशी तडजोड करणे जीवावर बेतू शकते, त्यामुळे किमान ६ एअरबॅग्स आणि आधुनिक सुरक्षा यंत्रणा असलेली कारच निवडावी. धावपळीच्या युगात मायलेज आणि परफॉर्मन्स यांचा योग्य समतोल साधणारी कार निवडल्यास तुमची गुंतवणूक सार्थ ठरेल. पाकिस्तानात मशिदीवर आत्मघाती हल्ला; 69 ठार, 169 जखमी पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद शुक्रवारी भीषण आत्मघाती हल्ल्याने हादरलीय. येथील एका शिया मशिदीत शुक्रवारच्या नमाजदरम्यान झालेल्या स्फोटात ६९ जणांचा मृत्यू झाला असून १६९ गंभीर जखमी झालेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती सुरक्षा यंत्रणांनी व्यक्त केली असून शहरात आणीबाणी घोषित करण्यात आलीय. राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनी या घटनेचा तीव्र निषेध करताना हा हल्ला मानवतेच्या विरोधात असल्याचे म्हटलेय. गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तानातील दहशतवादी कारवायांमध्ये मोठी वाढ झाली असून, जागतिक दहशतवाद निर्देशांकात पाकिस्तान आता दुसऱ्या क्रमांकावर पोहोचलाय. टीटीपी आणि आयएस-के सारख्या संघटनांकडून सातत्याने नागरी भागांना लक्ष्य केले जात असल्याने देशातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेय. सविस्तर वृत्त – पाकिस्तानात शुक्रवारच्या नमाजानंतर भीषण स्फोट, 69 जणांचा मृत्यू, 169 हून अधिक जखमी शून्यातून विश्व निर्माण करणारा अभिनेता; शाहिद कपूरचा प्रेरणादायी प्रवास shahid kapoor बॉलिवूडचा सुपरस्टार शाहिद कपूरचा यशस्वी प्रवास अत्यंत खडतर संघर्षातून सुरू झाला. आज कोट्यवधींच्या मालमत्तेचा मालक असलेल्या शाहिदकडे सुरुवातीच्या काळात साधे कपडे खरेदी करण्यासाठीही पैसे नव्हते. बॅकग्राउंड डान्सर म्हणून कारकीर्द सुरू करणाऱ्या शाहिदला अनेकदा ‘हिरो मटेरियल नाही’ म्हणून नाकारले गेले. वडिलांचे नाव पंकज कपूर असूनही त्याने स्वतःच्या बळावर २५० पेक्षा जास्त ऑडिशन्स दिल्या. ‘इश्क विश्क’मधून पदार्पण केल्यानंतर सलग ६ चित्रपट फ्लॉप झाल्याने त्याने अभिनय सोडण्याचा विचार केला होता, मात्र ‘विवाह’ आणि ‘जब वी मेट’ चित्रपटांनी त्याचे नशीब बदलले. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्याने आज बॉलिवूडच्या सर्वात यशस्वी कलाकारांमध्ये आपले स्थान निश्चित केलेय. टी-20 वर्ल्ड कपपूर्वी रिंकू सिंगला सायबर धक्का; फेसबुक अकाऊंट हॅक, पोलिसांत धाव ७ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कपमधील पहिल्या सामन्यापूर्वी टीम इंडियाचा फिनिशर रिंकू सिंग सायबर हल्ल्याचा बळी ठरलाय. रिंकूचे १६ लाख फॉलोअर्स असलेले फेसबुक अकाऊंट हॅक झाले असून, त्यावरून संशयास्पद हालचाली सुरू होत्या. रिंकूने स्वतः अलिगड पोलिसांना फोनवरून याची माहिती दिली, त्यानंतर त्याचा भाऊ सोनू याने लेखी तक्रार केली असून पोलिसांनी एफआयआर (FIR) नोंदवला. अद्याप कोणतीही आर्थिक फसवणूक झालेली नाही, मात्र सुरक्षेच्या कारणास्तव सायबर सेल हॅकर्सचा शोध घेत आहे. या मानसिक तणावानंतरही रिंकू उद्या अमेरिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात मैदानात उतरण्यासाठी सज्ज आहे. सविस्तर वृत्त – टी-२० वर्ल्डकपपूर्वी रिंकू सिंग अडचणीत! फेसबुक अकाऊंट हॅक; अलिगडमध्ये FIR दाखल