Todays Top 10 News: पार्थ पवार यांचा राज्यसभा प्रवेश निश्चित? भाजपचा ‘ग्रीन सिग्नल’ sunetra pawar met pm modi महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला असून पार्थ पवार यांचा राज्यसभा प्रवेश आता निश्चित मानला जात आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली, त्यांच्यात सुमारे ४० मिनिटे महत्त्वपूर्ण चर्चा झाली. या बैठकीत मोंदीनी अजित पवार यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. त्यानंतर गृहमंत्री अमित शाह यांच्याशी झालेल्या भेटीत पार्थ पवार यांना राज्यसभेवर पाठवण्यास भाजपने हिरवा कंदील दाखवला असल्याच्या चर्चा सुरु झाल्यात. सुनेत्रा पवार यांच्या जागी पार्थ पवार राज्यसभेची जागा भूषवतील. दरम्यान, राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून पुढील एका महिन्यात सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती होण्याची दाट शक्यता आहे. सविस्तर वृत्त -पार्थ पवारांचा राज्यसभा प्रवेश निश्चित! PM मोदी आणि DCM सुनेत्रा पवार यांच्यात 40 मिनिटे खलबते; भाजपचा ‘ग्रीन सिग्नल’ अजित पवारांच्या अपघाताभोवती संशयाचे जाळे; रोहित पवारांकडून सखोल चौकशीची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत खळबळजनक दावे करत या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी केलीय. गेल्या काही काळापासून अजितदादा राजकीय वर्तुळात एकटे पडल्याचे निरीक्षण नोंदवत रोहित पवारांनी यामागे ‘घातपाता’ची शक्यता व्यक्त केली. विशेषतः नरेश अरोरा यांच्या पॉलिटिकल कन्सल्टन्सी करारावरून पक्षात मतभेद होते आणि दादांचा या कराराला तीव्र विरोध होता, असे त्यांनी नमूद केले. २७ जानेवारीच्या रात्री विमानाचे बुकिंग अचानक शेवटच्या क्षणी होणे आणि बैठकीतील घडामोडी संशयास्पद असल्याचे सांगत त्यांनी सुनील तटकरे यांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले. विमानाचा ब्लॅक बॉक्स बंद असल्यास हा संशय अधिक गडद होईल, असेही ते म्हणाले. नांदेडच्या मुखेड तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांनी सतर्क राहण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास ३.० रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. याचा केंद्रबिंदू खपराळ गावाजवळ असून हिब्बट, कोळगाव, धामणगाव, मोटरगा यांसह लगतच्या गावांमध्ये भूगर्भातून आवाजासह जमीन हादरल्याने नागरिकांमध्ये भीती पसरली. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवित किंवा वित्त हानी झालेली नाही. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी नागरिकांना धीर देत अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केलेय. खबरदारीचा उपाय म्हणून पत्र्यांच्या छतांवरील दगड हटवून ते बोल्टने घट्ट करावेत आणि पुन्हा हादरे जाणवल्यास तात्काळ मोकळ्या जागेत यावे, अशा सूचना प्रशासनाने दिल्यात. आपत्कालीन मदतीसाठी (०२४६२) २३५०७७ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आलेय. सविस्तर वृत्त – महाराष्ट्रला मोठा हादरा; ‘या’ ८ गावांना भूकंपाचे जोरदार धक्के, परिसरात भीतीचं वातावरण दूरदर्शनचा आश्वासक चेहरा हरपला; ज्येष्ठ वृत्तनिवेदिका सरला माहेश्वरी यांचे निधन sarla maheshwari दूरदर्शनच्या सुवर्णकाळातील ओळख आणि आपल्या संयत शैलीने घराघरांत पोहोचलेल्या ज्येष्ठ वृत्तनिवेदिका सरला माहेश्वरी यांचे वयाच्या ७१ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या जाण्याने भारतीय वृत्त जगतातील एक अभ्यासू आणि आश्वासक आवाज काळाच्या पडद्याआड गेलाय. सरला माहेश्वरी यांनी दीर्घकाळ दूरदर्शनमध्ये वृत्तनिवेदनाचे कार्य केले. त्यांचे स्पष्ट शब्दोच्चार, सौम्य आवाज आणि बातमी सादर करण्याची ओघवती पद्धत यामुळे त्यांनी प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले होते. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या निधनाची बातमी समजताच सर्व स्तरांतून शोक व्यक्त करण्यात आला. दूरदर्शननेही त्यांना आदरांजली वाहताना त्यांच्या योगदानाचा गौरव केलाय. त्यांच्या पार्थिवावर दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. एका पिढीसाठी बातम्या पाहण्याचा अनुभव समृद्ध करणाऱ्या या दिग्गज निवेदिकेला माध्यमे आणि चाहत्यांकडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येतेय. भ्रष्टाचार निर्देशांकात भारताची कामगिरी सुधारली; जागतिक क्रमवारीत 91व्या स्थानी झेप ग्लोबल ट्रान्सपरन्सीने जाहीर केलेल्या २०२५ च्या ‘करप्शन परसेप्शन इंडेक्स’मध्ये भारताच्या स्थितीत सकारात्मक बदल दिसून आलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचाराविरुद्ध पुकारलेल्या मोहिमेनंतर भारत १८० देशांच्या यादीत ९१ व्या स्थानावर आहे. २०२३ मध्ये ९३ व्या आणि २०२४ मध्ये ९२ व्या क्रमांकावर असलेला भारत आता हळूहळू पारदर्शकतेकडे सरकत असल्याचे अहवालातून स्पष्ट होतेय. यंदा भारताला ३९ गुण मिळाले असून, मागील तीन वर्षांपासून ही सुधारणा सातत्याने सुरू आहे. या यादीत डेन्मार्क सर्वात प्रामाणिक देश ठरला आहे, तर दक्षिण सुदान आणि सोमालिया सर्वाधिक भ्रष्ट देशांयादीत अव्वल आहेत. युरोप आणि अमेरिकेत भ्रष्टाचाराच्या घटना वाढत असताना भारताची सुधारलेली रँकिंग आश्वासक मानली जातेय. किम जोंग उन यांनी निवडला वारसदार; मुलगी किम जू ऐ कडे जाणार उत्तर कोरियाची सूत्रे Kim Jong उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांनी अखेर आपल्या राजकीय वारसदाराची निवड केल्याची माहिती समोर आलीय. दक्षिण कोरियाच्या राष्ट्रीय गुप्तचर संस्थेने (NIS) दावा केलाय की, किम जोंग उन यांची अल्पवयीन मुलगी किम जू ऐ ही उत्तर कोरियाची पुढील शासक असेल. अलीकडच्या काळात विविध लष्करी कार्यक्रम आणि क्षेपणास्त्र चाचण्यांच्या वेळी किम जू ऐ आपल्या वडिलांसोबत सातत्याने दिसून येतेय, ज्यामुळे तिच्या निवडीच्या चर्चांना उधाण आलेय. किम जू ऐ ही साधारण १३ वर्षांची असून, तिला आगामी मोठ्या राजकीय संमेलनात अधिकृत स्थान मिळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे किम जोंग यांना एक मोठा मुलगा असल्याचे बोलले जात असले तरी, सार्वजनिक कार्यक्रमांमधील वाढती उपस्थिती पाहता मुलीच्या नावारच शिक्कामोर्तब होण्याची चिन्हे आहेत. टोयोटा फॉर्च्युनरला टक्कर; एमजी मेजेस्टरचे आगमन, बुकिंग सुरू mg majester भारतीय वाहन बाजारात एमजी मोटर्सने आपली नवीन आलिशान फुल-साईज एसयूव्ही ‘एमजी मेजेस्टर’ अधिकृतपणे सादर केली असून, टोयोटा फॉर्च्युनरसारख्या प्रस्थापित गाड्यांना आता तगडे आव्हान मिळणार आहे. ग्लॉस्टरची वारसदार मानल्या जाणाऱ्या या कारमध्ये २.० लिटरचे ट्विन-टर्बो डिझेल इंजिन असून ते २१६ एचपीची ताकद निर्माण करते. आकर्षक ड्रॅगन-आय डीआरएल आणि १९ इंचाचे अलॉय व्हील्स यामुळे या गाडीला एक मस्कुलर लूक मिळालाय. आतील भागात व्हेंटिलेटेड मसाज सीट्स, जेबीएल ऑडिओ सिस्टम आणि पॅनोरॅमिक सनरूफ यांसारख्या प्रीमियम सुविधा देण्यात आल्यात. सुरक्षिततेसाठी यात एडास (ADAS) लेव्हल २ सह ३६०-डिग्री कॅमेरा देखील आहे. ग्राहक ४१,००० रुपयांत या कारचे बुकिंग करू शकतात, तर किमतींची घोषणा एप्रिल २०२६ मध्ये केली जाईल. iPhone 18 Pro सीरीजच्या चर्चांना उधाण; भारतातील अंदाजे किंमत 1,54,900 रुपये अॅपल प्रेमींसाठी २०२६ हे वर्ष अत्यंत खास ठरणार असून आगामी iPhone 18 Pro सीरीजच्या चर्चांना आता उधाण आलेय. ताज्या माहितीनुसार, iPhone 18 Pro आणि Pro Max येत्या ३ ते ९ सप्टेंबर २०२६ दरम्यान जागतिक बाजारपेठांसह भारतात लाँच होण्याची शक्यता आहे. या नवीन मॉडेलच्या डिझाइनमध्ये मोठे बदल नसले तरी ‘बर्गंडी’ आणि ‘कॉफी’ सारख्या नवीन आकर्षक रंगांची भर पडणार आहे. तांत्रिकदृष्ट्या हा फोन अत्यंत प्रगत असेल, ज्यामध्ये २nm तंत्रज्ञानावर आधारित वेगवान A20 प्रोसेसर आणि ३००० निट्स ब्राइटनेस असलेला ६.३ इंचाचा OLED डिस्प्ले मिळेल. कॅमेऱ्याच्या बाबतीत यात ४८-४८-४८ मेगापिक्सेलचा ट्रिपल रियर सेटअप आणि २४ मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा असण्याची शक्यता आहे. ५१००mAh बॅटरी आणि ४०W फास्ट चार्जिंगसह येणाऱ्या या फोनच्या २५६GB व्हेरिएंटची भारतातील अंदाजे किंमत १,५४,९०० रुपये असू शकते. राजपाल यादवचा मुक्काम तुंगातच; जामीन अर्जावर सोमवारी होणार फैसला rajpal yadav प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता राजपाल यादवला चेक बाऊन्स प्रकरणात अद्याप दिलासा मिळालेला नाही. दिल्ली उच्च न्यायालयाने त्याच्या जामीन अर्जावरील सुनावणी सोमवार, १६ फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकललीय. २०१० मध्ये ‘अता पता लापता’ चित्रपटासाठी घेतलेल्या ५ कोटींच्या कर्जाची परतफेड न झाल्याने, व्याजासह ही रक्कम ९ कोटींवर पोहोचलीय. याप्रकरणी सात चेक बाऊन्स झाल्यामुळे राजपाल सध्या तिहार जेलमध्ये शिक्षा भोगतोय. न्यायालयात राजपालच्या वकिलांनी कौटुंबिक लग्नाचे कारण देत जामिनाची मागणी केली, मात्र न्यायालयाने ‘कायदा सर्वांसाठी समान आहे’ असे म्हणत तात्काळ दिलासा नाकारला. दरम्यान, राजपालच्या समर्थनार्थ चित्रपटसृष्टी सरसावली असून सलमान खान, अजय देवगण आणि सोनू सूद यांनी मदतीचा हात पुढे केलाय. गायक मीका सिंगने ११ लाख तर अनुप जलोटा यांनी ५ लाखांची मदत जाहीर केलीय. आता सर्वांचे लक्ष सोमवारच्या निकालाकडे लागलेय. श्रीलंकेचा ओमानवर दिमाखदार विजय; ४३ वर्षीय नदीमचा जागतिक विक्रम यजमान श्रीलंकेने टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये ओमानचा १०५ धावांनी पराभव करत सलग दुसरा विजय मिळवला. श्रीलंकेने दासुन शनाकाचे विक्रमी १९ चेंडूतील अर्धशतक आणि कुसल मेंडिस, पवन रत्नायके यांच्या फटकेबाजीच्या जोरावर २२५ धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरात ओमानचा संघ ९ बाद १२० धावांपर्यंतच मजल मारू शकला. या सामन्यात ओमानच्या ४३ वर्षीय मोहम्मद नदीमने ५३ धावांची झुंजार खेळी करत इतिहास रचला. आयसीसी स्पर्धेत अर्धशतक झळकावणारा तो सर्वात वयस्कर खेळाडू ठरला असून त्याने ३० वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला. या विजयामुळे श्रीलंकेचा सुपर-८ मधील मार्ग सुकर झाला आहे. सविस्तर वृत्त – पल्लेकलेत लंकन वाघांची गर्जना! ओमानवर १०५ धावांनी मिळवला ‘महाविजय’; शनाकाचं १९ चेंडूत वादळी अर्धशतक