महाराष्ट्रातील उपमुख्यमंत्रीपद रद्द होणार? – उद्धव ठाकरेंच्या मागणीने शिंदे-पवारांचं वाढलं टेन्शन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारला ५ डिसेंबर रोजी एक वर्ष पूर्ण झालंय. यातच आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकारकडे एक मोठी मागणी केली आहे. महायुती सरकारला सत्तेत येऊन एक वर्ष पूर्ण झालं आहे तरी देखील विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेतेपद देण्यात आलेलं नाही. ‘विरोधी पक्षनेतेपद द्या, अन्यथा उपमुख्यमंत्रिपद रद्द करा’, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ठाकरेंच्या या मागणीमुळे एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचं टेन्शन वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. “महायुतीमधील तीनही पक्षाचे नेते एकच आहेत. तिन्ही पक्षाचं चिन्ह, नाव, वेगवेगळं असलं तरी त्यांचा मालक एकच आहे. त्यांच्या (भाजपाच्या) या बी टीम आहेत. मी काही दिवसांपूर्वी एक शब्द वापरला होता की अॅनाकोंडा. आता या अॅनाकोंडाचा प्रत्येय महायुतीमधील पक्षांना यायला लागलाय. त्यामुळे या दोन्ही पक्षांना अॅनाकोंडा गिळल्याशिवाय राहणार नाही”, अशी खोचक टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली. ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव आयसीयूमध्ये – शरद पवारांनी घेतली प्रकृतीची माहिती – ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना पुण्यातील पुना हॉस्पिटलमध्ये आयसीयूत दाखल केले आहे. गेल्या दहा दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असली तरी सध्या स्थिर आहे. त्यांना हृदयाशी संबंधित समस्यांमुळे रुग्णालयात भरती केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रुग्णालयात भेट देऊन त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली आणि कुटुंबीयांशी संवाद साधला. आढाव यांच्या कुटुंबीयांनी जनतेला अफवांवर विश्वास न ठेवण्याची आणि केवळ अधिकृत माहितीवरच लक्ष ठेवण्याची विनंती केली आहे. सामाजिक चळवळीतील एक महत्त्वपूर्ण नाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बाबा आढाव यांच्या आरोग्याबाबत अनेक नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि कामगार संघटनांनीही चिंता व्यक्त केली आहे. त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहनही अनेकांनी केले आहे. महाराष्ट्रातील कामगार, शेतमजूर, कष्टकरी यांच्यासाठी आयुष्यभर कार्य केलेल्या या ज्येष्ठ समाजसेवकांचे स्वास्थ्य लवकर सुधारावे, अशी अपेक्षा सर्वांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढणार – या जिल्ह्यात सर्वाधिक कमी किमान तापमानाची नोंद – उत्तरेकडील शीतलहरींमुळे महाराष्ट्रात किमान तापमानात मोठी घट झाली आहे. नागपूर (९.६°C) आणि गोंदिया (९.८°C) येथे राज्यातील सर्वाधिक कमी किमान तापमानाची नोंद झाली आहे. हवामान खात्यानुसार, येत्या २४ तासांत उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात थंडीचा कडाका वाढेल, जी पुढील काही दिवस कायम राहील. विदर्भासाठी थंडीच्या लाटेचा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. उत्तरेकडील थंड वारे विदर्भातून राज्याच्या अंतर्गत भागांमध्ये सक्रिय झाले असून हळूहळू दक्षिणेकडे सरकत आहेत. यामुळे नागपूर, गोंदिया, अमरावतीसह मराठवाडा आणि त्यानंतर पुणे-दक्षिणेकडील भागांतही थंडीची तीव्रता वाढेल. पुढील दोन-चार दिवसांत विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात तापमान १० अंश सेल्सिअसपेक्षा खाली येण्याची दाट शक्यता आहे. शनिवार ठरला अपघातवार, राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी 13 ठार – कुठे – कुठे घडले अपघात? आज ६ डिसेंबर शनिवार हा दिवस महाराष्ट्रासाठी अपघातवार ठरला. विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या घटनांमध्ये तब्बल १३ जण ठार झाले असून ३० हून अधिक जण जखमी झाले आहेत. परभणी, गोंदिया, आणि रायगड येथे प्रत्येकी ३ जण ठार झाले. परभणी-वसमत महामार्गावर कार अपघातात ३, गोंदियातील देवरी येथे उभ्या ट्रकला ट्रॅव्हल्सने धडकल्याने ३ आणि रायगडच्या कोलाडमध्ये दोन दुचाकींच्या धडकेत २ जणांनी जीव गमावला. लातूरच्या अहमदपूर येथे ट्रक-कार अपघातात २ तरुण ठार झाले, तर लोणावळ्यातील लायन्स पॉइंटजवळ कार-टेम्पो अपघातात २ पर्यटकांचा बळी गेला. याव्यतिरिक्त, जळगावच्या भाविकांच्या वाहनाचा उत्तर प्रदेशातील अयोध्येत अपघात झाला, ज्यात एका महिलेचा मृत्यू झाला आणि सुमारे २५ ते ३० जण जखमी झाले. पुणे, नाशिक आणि जालना येथेही अपघाताच्या घटना घडल्या, ज्यात काही जण जखमी झाले. अमित ठाकरेंच्या मुलाला पाहून मोदींना आवरला नाही मोह – किआनला पाहताच मोदींनी हसून प्रेमाने ओढले त्याचे गाल – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्या पत्नी मिताली ठाकरे यांच्या भावाचा, डॉ. राहुल बोरुडे यांचा विवाह सोहळा नुकताच दिल्लीत पार पडला. या विवाह सोहळ्याला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावली, त्यामुळे सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले. कार्यक्रमात फोटोसेशन सुरू असताना सर्वांचे लक्ष वेधले ते एका निरागस क्षणाने. अमित ठाकरे यांनी आपला मुलगा आणि राज ठाकरेंचा नातू, किआन ठाकरे याला पंतप्रधानांच्या जवळ नेले. किआनला पाहताच मोदींनी हसून प्रेमाने त्याचे गाल ओढले आणि प्रेम व्यक्त केले. पंतप्रधानांचा हा प्रेमळ आणि बालसुलभ स्वभाव पाहून उपस्थित असलेल्या मान्यवरांनी हसत टाळ्या वाजवल्या. सोहळ्यानंतर सोशल मीडियावरही या निरागस क्षणाची जोरदार चर्चा रंगली आहे. सरकारचा निर्देश- इंडिगोने उद्यापर्यंत प्रवाशांना पैसे परत करावे – विमान भाडे निश्चित, 500 किमीपर्यंत 7,500 रुपये लागतील – देशातील सर्वात मोठी एअरलाइन कंपनी इंडिगोच्या कामकाजात सलग पाचव्या दिवशी शनिवारीही सुधारणा दिसून आली नाही. दिल्ली, मुंबई, बेंगळूरु आणि चेन्नई विमानतळांवर रात्रभर प्रवासी त्रस्त दिसले. यापूर्वी चार दिवसांत रद्द झालेल्या विमानांची संख्या 2,000 पेक्षा जास्त झाली आहे. यामुळे सुमारे 3 लाख प्रवाशांना थेट फटका बसला. आज आणि उद्या इंडिगोच्या 25-30% अधिक विमानांना रद्द किंवा उशीर होऊ शकतो. विमानसेवा सामान्य होण्यासाठी 15 डिसेंबरपर्यंत वेळ लागेल, असे इंडिगोचे म्हणणे आहे. मात्र, नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी सांगितले, नवीन FDTL नियम 1 नोव्हेंबरपासून लागू आहेत, परंतु इतर कोणत्याही एअरलाइनला अडचण आली नाही, यावरून स्पष्ट होते की चूक इंडिगोची आहे. एअरलाइनच्या निष्काळजीपणाची चौकशी केली जाईल आणि कारवाई निश्चित आहे. इंडिगोने उद्यापर्यंत प्रवाशांना बुकिंगचे पैसे परत करावे, असे निर्देश सरकारने दिले आहेत. तर विमान भाडे 500 किमीपर्यंत 7,500 रुपये निश्चित करण्यात आले आहे. नेहरूंना बदनाम करणे हे आजच्या सत्तेचे मुख्य उद्दिष्ट: सोनिया गांधी – नेहरूंच्या कार्याची समीक्षा व्हावी, पण…. काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज शनिवारी दिल्लीतील नेहरू सेंटर इंडियाच्या उद्घाटन समारंभात भाजप सरकारवर जोरदार टीका केली. माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना बदनाम करणे आणि त्यांना इतिहासातून पुसून टाकणे, तसेच देशाच्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक आधारांना कमकुवत करणे हे आजच्या सत्तेचे मुख्य उद्दिष्ट आहे, असे त्या म्हणाल्या. नेहरूंच्या कार्याची समीक्षा व्हावी, पण त्यांना बदनाम करणे आणि तोडून-मोडून सादर करणे अस्वीकार्य आहे. त्यांचा बहुआयामी वारसा संपवण्याचा प्रयत्न होत आहे. या शक्ती त्या विचारधारेच्या आहेत, ज्यांनी स्वातंत्र्य लढ्यात कोणतेही योगदान दिले नाही आणि महात्मा गांधींच्या हत्येसाठी द्वेषाचे वातावरण निर्माण केले, अशी टीका सोनिया गांधींनी केली. चांदी एका आठवड्यात 13,851, सोने 2001 रुपयांनी वाढले – या वर्षी सोन्याने 69%, चांदीने 107% दिला परतावा – सोने आणि चांदीच्या दरात सलग दुसऱ्या आठवड्यात वाढ झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार, सोन्याची किंमत २८ नोव्हेंबर रोजी 1,26,591 वरून ५ डिसेंबरपर्यंत 2,001 रुपयांनी वाढून 1,28,592 रुपये प्रति १० ग्रॅम झाली. १७ ऑक्टोबर रोजी सोन्याने 1,30,874 या सर्वात उच्चांकी दराची नोंद केली होती. चांदीच्या दरातही मोठी वाढ झाली असून, ती २८ नोव्हेंबरच्या 1,64,359 वरून 1,78,210 रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे, जी चांदीची सर्वाधिक उच्चांकी किंमत आहे. या वर्षी सोन्याच्या दरात 52,430 (६९%) आणि चांदीच्या दरात 92,193 (१०७%) रुपयांची वाढ झाली आहे. केंद्रीय बँकांची खरेदी, क्रिप्टोमधून सोन्याकडे वळलेले गुंतवणूकदार आणि महागाईच्या काळात सोन्याचे दीर्घकालीन मालमत्ता म्हणून असलेले महत्त्व, ही या वाढीची प्रमुख कारणे आहेत. IBJA च्या सोन्याच्या दरांमध्ये 3% GST, मेकिंग चार्ज आणि ज्वेलर्स मार्जिन समाविष्ट नसते, त्यामुळे वेगवेगळ्या शहरांमधील दर वेगवेगळे असतात. पंजाब नॅशनल बँकसह अनेक बँका गोल्ड लोनचे दर निश्चित करण्यासाठी या किमतींचा वापर करतात. सारा खानने हिंदू आणि मुस्लिम दोन्ही रितीरिवाजानुसार केले लग्न- कुबूल है पासून सात फेऱ्यांपर्यंत – टीव्ही अभिनेत्री सारा खान पुन्हा एकदा तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. साराने कृष पाठकसोबत कोर्ट मॅरेज केल्यानंतर आता हिंदू आणि मुस्लिम रितीरिवाजानुसार लग्न केले आहे. अभिनेत्रीने दोन्ही लग्नाचे फोटो तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले – ‘कुबूल है’ पासून सात फेऱ्यांपर्यंत… आमच्या प्रेमाने स्वतःची कथा लिहिली आणि आमच्या दोघांच्या जगाने होकार दिला. सारा वधूच्या वेशात खूप सुंदर दिसत आहे. जिथे हिंदू रितीरिवाजानुसार लग्न करण्यासाठी अभिनेत्रीने लाल रंगाचा लेहेंगा परिधान केला आहे. तर, निकाहसाठी ती गोल्डन रंगाच्या लेहेंग्यात दिसत आहे. साराच्या या नवीन प्रवासासाठी तिला इंडस्ट्री आणि चाहत्यांकडून खूप शुभेच्छा मिळत आहेत. भारताविरुद्ध शतक ठोकत वर्ल्ड रेकॉर्डसह केले अनेक विक्रम – क्विंटन डी कॉकचा कहर – भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा यष्टिरक्षक-फलंदाज क्विंटन डी कॉकने शानदार शतक झळकावले. हे त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील 23वे शतक होते. या शतकासह डी कॉकने अनेक मोठे विक्रम आपल्या नावावर केले. तो आता एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताविरुद्ध सर्वाधिक सात शतके ठोकणारा दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू बनला आहे. त्याने एबी डिव्हिलियर्सला मागे टाकले आहे. शिवाय, तो यष्टिरक्षक-फलंदाज म्हणून एकाच संघाविरुद्ध सर्वाधिक सात शतके ठोकणारा जागतिक क्रिकेटमधील पहिला खेळाडू ठरला. तसेच, तो एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक 23 शतके झळकावण्याच्या बाबतीत कुमार संगकारासह संयुक्तपणे अव्वल स्थानी पोहोचला आहे.