नाशिकच्या तपोवनातील झाडांना तात्पुरता दिलासा – राष्ट्रीय हरित लवादाची वृक्षतोडीला स्थगिती – कुंभमेळ्यासाठी नाशिकच्या तपोवन परिसरातील प्रस्तावित वृक्षतोडीला अखेर मोठा धक्का बसला असून राष्ट्रीय हरित लवादाने 15 जानेवारीपर्यंत तात्पुरती स्थगिती जारी केली आहे. या ठिकाणी होणाऱ्या वृक्षतोडीविरोधात नागरिकांचा वाढता विरोध, पर्यावरणप्रेमींचे आंदोलन आणि मनसेने दाखल केलेल्या जनहित याचिकेनंतर आज लवादाने महत्त्वपूर्ण निर्णय देत सर्व प्रकारच्या तोडीवर स्थगिती दिली आहे. यामुळे तपोवनातील हरितपट्टा उद्ध्वस्त होणार की संरक्षित राहणार, याकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे. लवादासमोर सुनावणीदरम्यान वृक्षतोडीमागील परवानग्या, उद्देश आणि पर्यावरणीय आघाताशी संबंधित अनेक मुद्द्यांची दखल घेण्यात आली आणि अंतिम निर्णय येईपर्यंत तातडीची स्थगिती देणे आवश्यक असल्याचे लवादाने नमूद केले. रेरा नोंदणी नसलेल्या प्रकल्पांनाच ‘मोफा’ लागू – दुरुस्ती प्रस्तावाला मंत्रिमंडळाची मान्यता – महाराष्ट्र ओनरशिप ॲाफ फ्लॅट कायदा (मोफा) आता फक्त स्थावर संपदा प्राधिकरणात (रेरा) नोंदणी नसलेल्या गृहप्रकल्पांनाच लागू होणार आहे. या महत्त्वपूर्ण दुरुस्ती प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून, नागपूर अधिवेशनात विधेयक मांडले गेले आहे. यामुळे रेरा स्थापनेनंतर नोंदणी झालेल्या सर्व प्रकल्पांची मोफा कायद्यातील कठोर तरतुदीतून सुटका होणार आहे. मोफातील कलम १३(१) आणि (२) नुसार विकासकाने कसूर केल्यास दखलपात्र, अजामीनपात्र गुन्हा दाखल होऊन तीन वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. विकासकांच्या दीर्घकाळच्या मागणीनुसार ही दुरुस्ती करण्यात आली आहे. मुंबई ग्राहक पंचायतीचे कार्याध्यक्ष ॲड. शिरीष देशपांडे यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ही दुरुस्ती म्हणजे ‘विकासकांना मोकळं रान’ देण्यासारखे असून, विकासकांच्या फसवणुकीचे प्रकार थांबलेले नाहीत. रेरामध्ये मानीव हस्तांतरणाची तरतूद नसल्यामुळे रेरा-नोंदणीकृत प्रकल्पांना मोफातून वगळणे योग्य नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले. केवळ 98 जणांना कुणबी जातप्रमाणपत्र – मनोज जरांगे यांनी व्यक्त केली नाराजी – मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे यांनी मुंबईत आंदोलन केल्यानंतर त्यांच्या मागणीनुसार राज्य सरकारने हैदराबाद गॅझेटिअरनुसार नोंदी असलेल्या मराठा समाजातील अर्जदारांना कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात शासन निर्णय जाहीर केला होता. या घटनेला तीन महिने उलटून गेले आहेत. मात्र, या काळात मराठवाड्यातील केवळ ९८ जणांना कुणबी जातप्रमाणपत्र देण्यात आलंय. या प्रमाणपत्रासाठी आठ जिल्ह्यांमधून केवळ ५९४ अर्ज आले आहेत. यावर जरांगे यांनी नाराजी व्यक्त केलीय. जरांगे म्हणाले, “सरकारकडून कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात दिरंगाई चालू आहे. प्रशासनाने वेग वाढवायला हवा. जितके अर्ज आले आहेत त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करून सर्वांना कुणबी प्रमाणपत्र द्यावं. सर्वांना हैदराबाद गॅझेटप्रमाणे हे प्रमाणपत्र मिळणार आहे. मात्र, लोकांचे पुरेसे अर्ज आलेले नाहीत, कारण गाव पातळीवर यासंदर्भात अद्याप समित्या गठित झालेल्या नाहीत. सरकारने याचा प्रचार, प्रसार केलेला नाही.” लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी – ई-केवायसी दुरुस्तीची अंतिम संधी – महाराष्ट्र शासनाच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी मोठी बातमी आहे. महिला व बालविकास विभागाने नोव्हेंबरच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या महिलांना ई-केवायसीमध्ये झालेल्या चुका दुरुस्त करण्याची एक अंतिम संधी दिली आहे. ई-केवायसी पूर्ण करताना काही महिलांकडून पर्याय निवडण्यात चुका झाल्या असल्यास, त्या योजनेच्या वेब पोर्टलवर काळजीपूर्वक दुरुस्त कराव्या लागतील. ई-केवायसीची मुदत ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे. वडील, पती हयात नसणाऱ्या महिलांनी पती अथवा वडील यांच्या मृत्यू प्रमाणपत्राची प्रत अंगणवाडी सेविकांकडे 31 डिसेंबर पर्यंत जमा करायची आहे. घटस्फोटित महिलांनी घटस्फोट प्रमाणपत्र किंवा न्यायालय आदेशाची प्रत अंगणवाडी सेविकांकडे द्यावी. ही प्रक्रिया ऑफलाईन असेल. मात्र, अशा महिलांना स्वताचा आधार क्रमांक पोर्टलवर नोंदवून स्वत: ची ई-केवायसी पूर्ण करुन घ्यावी लागेल. कोल्हापुरी चप्पल आता जगभरात सर्वांच्या पायात – प्राडाने लिडकॉम आणि लिडकारसोबत केला करार – भारतीय पारंपरिक कोल्हापुरी चपलांना जागतिक ओळख मिळवून देण्यासाठी प्राडा या लक्झरी ब्रँडने लिडकॉम (संत रोहिदास चर्मउद्योग आणि चर्मकार विकास महामंडळ) तसेच लिडकार (डॉ. बाबू जगजीवनराम चर्मउद्योग विकास महामंडळ) यांच्यासोबत महत्त्वाकांक्षी सामंजस्य करार केला आहे. मुंबईतील इटालियन वाणिज्य दूतावासात झालेल्या इटली–भारत व्यापारी परिषदेत या करारावर स्वाक्षरी झाली. या करारानुसार, कोल्हापुरी चप्पल बनवण्याच्या पारंपरिक कौशल्याला प्राडाच्या आधुनिक डिझाईनची जोड मिळणार आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील कुशल कारागिरांच्या मदतीने या खास चपला ‘प्राडा मेड इन इंडिया इन्स्पायर्ड बाय कोल्हापुरी चप्पल्स’ या नावाने विकसित केल्या जातील. फेब्रुवारी २०२६ पासून प्राडाच्या जागतिक विक्री केंद्रांमध्ये आणि संकेतस्थळावर या विशेष चपला उपलब्ध होतील. २०२७ मध्ये दोन टप्प्यात होणार जनगणना – ११७१८ कोटी खर्चाला केंद्राची मंजुरी – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने २०२७ मध्ये होणाऱ्या जनगणनेसाठी ११,७१८ कोटी रुपयांच्या खर्चाला नुकतीच मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली. कोरोनामुळे २०२१ मध्ये होऊ न शकलेली ही जनगणना दोन टप्प्यात पूर्ण केली जाईल. ही देशाची १६ वी आणि स्वातंत्र्यानंतरची ८ वी जनगणना असेल. कायदेशीर संरक्षण असलेल्या या जनगणनेचा पहिला टप्पा (घरांची गणना) एप्रिल ते सप्टेंबर २०२६ दरम्यान होईल. लोकसंख्येची नोंदणी दुसऱ्या टप्प्यात फेब्रुवारी २०२७ मध्ये केली जाईल. ही जनगणना मोबाईल ॲप्सद्वारे डिजिटल पद्धतीने केली जाईल, ज्यात सामाजिक-आर्थिक माहितीसह जात देखील नोंदवली जाईल. या माहितीचा उपयोग धोरण आणि मतदारसंघांची फेररचना करण्यासाठी होईल. नवीन कामगार कायद्यांमुळे ‘इन-हँड’ सॅलरी कमी होणार? कामगार मंत्रालयाने दूर केली चिंता – नवीन कामगार कायदे लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या हातात येणारा पगार कमी होईल का? याबाबतची चिंता कामगार मंत्रालयाने दूर केली आहे. मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, जोपर्यंत भविष्य निर्वाह निधी ची कपात 15,000 रुपयांच्या निश्चित वेतन मर्यादेनुसार होत राहील, तोपर्यंत पगारात कपात होणार नाही. नवीन नियमांनुसार मूळ वेतन एकूण वेतनाच्या 50\% असावे, यामुळे अनेकांना पीएफ योगदान वाढेल आणि पगार कमी होईल अशी भीती होती. मात्र, मंत्रालयाने सांगितले की, पीएफची गणना नेहमीप्रमाणे 15,000 रुपयांच्या मर्यादेवरच होईल. या मर्यादेपलीकडील योगदान ऐच्छिक असेल, अनिवार्य नाही. पगार कमी होण्याची शक्यता तेव्हाच आहे, जेव्हा कर्मचारी आणि कंपनी दोघे मिळून 15,000 रुपयांपेक्षा जास्त वेतनावर पीएफ कपात करण्याचा निर्णय घेतील. कर्मचाऱ्यांनी अनावश्यक भीती बाळगू नये. या आठवड्यात गुंतवणूकदारांना फटका – १.४१ लाख कोटी पाण्यात – या आठवड्यात ८ ते १२ डिसेंबरदरम्यान भारतीय शेअर बाजारात गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला. डाॅलरच्या तुलनेत रुपया कमकुवत झाल्याने आणि विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी केलेल्या जोरदार विक्रीमुळे बाजारावर दबाव आला. परिणामी, सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही प्रमुख निर्देशांकांत ०.५ टक्क्यांची साप्ताहिक घसरण नोंदवली गेली. गुंतवणूकदारांच्या संपत्तीत या आठवड्यात १,४१,८१३ कोटींची घट झाली. एकूण १६ प्रमुख क्षेत्रांपैकी ११ क्षेत्रांत लाल निशाण दिसले. स्मॉलकॅप आणि मिडकॅप कंपन्यांचे शेअर्सही अनुक्रमे ०.७% आणि ०.५% घसरले. आठवड्याच्या शेवटच्या दोन दिवशी अमेरिकेच्या ‘फेडरल रिझर्व्ह’ने व्याजदर कपातीचा निर्णय घेतल्याने बाजारात तेजी आली. मात्र, आठवड्याच्या सुरुवातीच्या घसरणीमुळे साप्ताहिक नुकसान टळले नाही. कुस्तीपटू विनेश फोगाट पुन्हा मैदानात – लॉस एंजिल्स २०२८ ऑलिम्पिकवर लक्ष – भारताची स्टार महिला कुस्तीपटू विनेश फोगाटने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ नंतर घेतलेला निवृत्ती मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ५० किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत १०० ग्रॅम वजन अधिक आढळल्याने तिला अपात्र ठरवण्यात आले होते, ज्यामुळे निराश होऊन तिने निवृत्ती घेतली होती. परंतु, कुस्तीची आवड आणि ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याचे स्वप्न कायम असल्याने, विनेशने लॉस एंजिल्स २०२८ ऑलिम्पिकवर लक्ष केंद्रित केले आहे. सोशल मीडियावर भावनिक पोस्ट करत तिने ही घोषणा केली. “आता मी निडर मनाने लॉस एंजिल्स २०२८ ऑलिम्पिकच्या दिशेने पाऊल टाकत आहे आणि माझा मुलगाही माझ्या टीममध्ये सामील होत आहे,” असे तिने नमूद केले. विनेशने यापूर्वी वर्ल्ड, एशियन आणि कॉमनवेल्थ गेम्समध्ये पदके जिंकली आहेत, मात्र ऑलिम्पिक पदकाचे तिचे स्वप्न अजूनही अपूर्ण आहे. बस कंडक्टर ते ‘थलायवा’: रजनीकांत@75- सुपरस्टार चाहत्यांसाठी बनले दैवत – दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत आज १२ डिसेंबर रोजी त्यांचा ७५ वा वाढदिवस साजरा करत आहेत. एकेकाळी बस कंडक्टरची नोकरी करणाऱ्या रजनीकांतची ‘थलायवा’ म्हणून ओळख होण्यामागे एक खास कहाणी आहे. त्यांच्या गर्लफ्रेंडच्या सांगण्यावरून आणि मित्र राज बहादूर यांच्या मदतीने त्यांनी फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतला. के. बालचंदर यांनी त्यांना पहिला चित्रपट दिला, पण सुरुवातीला त्यांना नकारात्मक भूमिका कराव्या लागल्या. मात्र, त्यांची खास चालण्याची आणि बोलण्याची शैली नेहमीच प्रभावी ठरली. ‘बाशा’मधील माणिक बाशा, ‘शिवाजी: द बॉस’मधील शिवाजी, आणि ‘रोबोट’मधील चिट्टी यांसारख्या दमदार भूमिकांमुळे ते केवळ एक अभिनेता न राहता, चाहत्यांसाठी एक दैवत बनले. त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. यावरून त्यांची अफाट लोकप्रियता दिसून येते. ‘बिल्ला’ (1980) चित्रपटानंतर रजनीकांत यांचा चित्रपट सृष्टीत दबदबा कायम राहिला.