Today Top 10 News: नांदेडमध्ये माणुसकीचे दर्शन! भावाच्या मृत्यूनंतर दिराने सावरला वहिनीचा संसार, पुतण्यांना दिले पितृछत्र नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील वझरा बुद्रुक येथे रक्ताच्या नात्याला आणि माणुसकीला महत्त्व देणारी एक हृदयस्पर्शी घटना घडलीय. अष्टपाल पाटील यांच्या अकाली निधनानंतर त्यांचे कुटुंब उघड्यावर आले होते, मात्र धाकटा भाऊ प्रफुल्ल पाटील यांनी आपल्या वैयक्तिक सुखाचा त्याग करून भावजय विजयालक्ष्मी यांच्याशी विवाह करण्याचा धाडसी निर्णय घेतला. व्यवसायाने ऑटोचालक असलेल्या प्रफुल्ल यांनी भावाच्या दोन अनाथ मुलांच्या भविष्यासाठी आणि वहिनीला सन्मानाने जगता यावे यासाठी हे पाऊल उचलले. या विवाहामुळे विखुरलेले कुटुंब पुन्हा एकत्र आले असून, सामाजिक जबाबदारीचे भान राखणाऱ्या प्रफुल्लच्या या निर्णयाचे संपूर्ण जिल्ह्यातून कौतुक होतेय. शिवसेना मंत्र्यांचा सामूहिक राजीनाम्याचा इशारा; महायुतीमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवड प्रक्रियेत भाजपने ऐतिहासिक विजय मिळवत पहिल्यांदाच आपली सत्ता प्रस्थापित केली. मात्र, या प्रक्रियेदरम्यान झालेल्या प्रचंड गोंधळात जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या डाव्या हाताला जखम झाली. भाजप कार्यकर्त्यांकडूनच धक्काबुक्की झाल्याचा गंभीर आरोप करण्यात येतोय. यानंतर सत्ताधारी शिवसेना आणि भाजपमधील संघर्ष विकोपाला गेलाय. धक्काबुक्कीमुळे शिवसेनेचे मंत्री आणि आमदार आक्रमक झालेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत, भाजपकडून दुय्यम वागणूक आणि गळचेपी होत असल्याची खदखद मंत्र्यांनी बोलून दाखवली. ही परिस्थिती न सुधारल्यास सामूहिक राजीनामे देण्याचा इशाराही त्यांनी दिला. साताऱ्यात केवळ एका मताने सत्तांतर घडवताना भाजपने लोकशाहीचा खून केल्याचा आरोप शिंदे गटाने केला असून, या प्रकरणाचे तीव्र पडसाद विधिमंडळात उमटल्याने महायुतीमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आलाय. सविस्तर वृत्त – मोठा राजकीय भूकंप..! शिंदे गटाचे सर्व मंत्री राजीनामा देणार? महायुतीतून बाहेर पाडण्याचे दिले संकेत नागपुरात संघ मुख्यालयावर ‘जनआक्रोश’ मोर्चा; प्रकाश आंबेडकरांचा पंतप्रधान मोदींवर हल्ला नागपूरमध्ये आज राजकीय वातावरण चांगलेच तापले. वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस यांनी संयुक्तपणे काढलेल्या विशाल ‘जनआक्रोश मोर्चा’ने आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयावर धडक दिली. ‘एपस्टीन फाईल्स’मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव आल्याचा खळबळजनक दावा करत, आंदोलकांनी केंद्र सरकार आणि संघाच्या विचारसरणीविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. “देशाला एपस्टीन फाईलवाला पंतप्रधान नको,” अशा घोषणांनी रेशीमबाग परिसर दणाणून गेला होता. वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली निघालेला हा मोर्चा सकाळी नागपूरच्या मुख्य भागातून सुरू झाला. कार्यकर्त्यांच्या हातात केंद्र सरकार आणि संघाचा निषेध करणारे बॅनर्स होते. मोर्चा संघ मुख्यालयाच्या दिशेने सरकत असताना पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता. आता 14 किलोच्या सिलिंडरमध्ये मिळणार केवळ 10 किलो गॅस; दरातही होणार कपात इराण युद्धामुळे उद्भवलेल्या एलपीजी टंचाईवर मात करण्यासाठी सरकारी तेल कंपन्यांनी आता १४.२ किलोच्या घरगुती सिलिंडरमध्ये १० किलो गॅस भरण्याची योजना आखलीय. होर्मुझ जलमार्ग विस्कळीत झाल्याने गॅसचा मर्यादित साठा जास्तीत जास्त कुटुंबांपर्यंत पोहोचवणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. या बदलामुळे सिलिंडरच्या किमतीतही घट होणार असून ग्राहकांना केवळ १० किलो गॅसचेच पैसे द्यावे लागतील. १० किलोचा हा साठा एका कुटुंबाला महिनाभर पुरेल, असा कंपन्यांचा अंदाज आहे. सध्या भारताचे गॅस टँकर पर्शियन आखातात अडकल्याने पुरवठा साखळीवर मोठा परिणाम झालाय. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सरकारने यापूर्वीच गॅस बुकिंगचा कालावधी वाढवला असून आता ‘बॉटलिंग प्लांट्स’मध्ये तांत्रिक बदल करण्याची तयारी सुरू आहे. इराणवरील हल्ले 5 दिवस थांबवले; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय अमेरिका-इस्त्राईल आणि इराणमध्ये गेल्या २३ दिवसांपासून सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक महत्त्वपूर्ण घोषणा केलीय. गेल्या दोन दिवसांत अमेरिका आणि इराणमध्ये झालेली चर्चा फलदायी राहिल्याचे ट्रम्प यांनी स्पष्ट केले. या चर्चेचा सकारात्मक परिणाम म्हणून, ट्रम्प यांनी संरक्षण विभागाला पुढील पाच दिवस इराणमधील पॉवर प्लांट आणि ऊर्जा केंद्रांवर कोणतेही नियोजित लष्करी हल्ले न करण्याचे निर्देश दिलेत. ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’ या आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून ही माहिती दिली. दोन्ही देशांमधील दीर्घकाळ चाललेली शत्रूता संपवणे हा या चर्चेचा मुख्य उद्देश असून, पुढील पाच दिवसांतील चर्चेच्या यशावरच भविष्यातील रणनीती अवलंबून असेल, असेही त्यांनी नमूद केलेय. सविस्तर वृत्त – 23 दिवसांच्या युद्धानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा अचानक यू-टर्न; अमेरिका-इराण युद्धात मोठं वळण तमिळनाडू विधानसभा निवडणूक: जागावाटप जाहीर; भाजप 27 तर अण्णा द्रमुक 178 जागा लढवणार तमिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (NDA) सोमवारी जागावाटपाचा तिढा सोडवला असून अधिकृत घोषणा केलीय. चेन्नईत झालेल्या या करारानुसार, अण्णा द्रमुक १७८ जागांसह सर्वात मोठा पक्ष म्हणून रिंगणात उतरणार आहे, तर भाजप २७ जागांवर निवडणूक लढवेल. याशिवाय पीएमके १८ आणि एएमएमके ११ जागांवर आपले नशीब आजमावतील. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल आणि अण्णा द्रमुक प्रमुख एडप्पाडी पलानीस्वामी यांनी या करारावर स्वाक्षरी केली. राज्यातील जनता द्रमुक आणि काँग्रेस आघाडीला नाकारून विकासाला साथ देईल, असा विश्वास गोयल यांनी व्यक्त केला. तमिळनाडूच्या २३४ जागांसाठी २३ एप्रिल रोजी मतदान होणार असून, या जागावाटपामुळे निवडणुकीतील चुरस वाढली आहे. ४ मे २०२६ रोजी या निवडणुकांचे निकाल जाहीर होतील. पॅन कार्ड नियमांत 1 एप्रिलपासून मोठा बदल; केवळ आधारकार्ड आता पुरेसे ठरणार नाही १ एप्रिल २०२६ पासून पॅन कार्ड अर्जाच्या नियमांत मोठे बदल होणार असून, केवळ आधार कार्डाच्या आधारे पॅन मिळवण्याची सुविधा बंद होणार आहे. नवीन नियमांनुसार, अर्जदारांना आता जन्मतारखेचा स्वतंत्र पुरावा देणे अनिवार्य असेल, ज्यासाठी जन्म दाखला, १० वीची गुणपत्रिका किंवा वाहन परवाना यांसारखी कागदपत्रे जोडावी लागतील. प्राप्तिकर विभागाने आर्थिक व्यवहारांच्या मर्यादेतही काही बदल प्रस्तावित केलेत. ५ लाख रुपयांपेक्षा कमी किमतीच्या वाहन खरेदीसाठी आता पॅन कार्डची गरज भासणार नाही, तर मालमत्ता खरेदी-विक्रीसाठी पॅन अनिवार्यतेची मर्यादा १० लाखांवरून २० लाख रुपये करण्यात आलीय. हॉटेल बिल भरण्यासाठीची पॅन सक्तीची मर्यादाही ५० हजारांवरून १ लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली असून, जुन्या अर्जाऐवजी आता नवीन फॉर्म भरावा लागणार आहे. 1 एप्रिलपासून ऑनलाइन पेमेंटच्या नियमांत मोठे बदल; आरबीआयने सुरक्षा केली कडक डिजिटल व्यवहारांमधील वाढती फसवणूक रोखण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) १ एप्रिल २०२६ पासून ऑनलाइन पेमेंटच्या नियमांत महत्त्वाचे बदल जाहीर केलेत. नवीन नियमांनुसार, आता सर्व ऑनलाइन ट्रान्झॅक्शनसाठी ‘टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन’ (2FA) अनिवार्य असेल, ज्यामध्ये प्रत्येक पेमेंट दोन वेगवेगळ्या स्तरांवर पडताळले जाईल. ग्राहकांना आता पासवर्ड किंवा पिनसोबतच ओटीपी, फिंगरप्रिंट किंवा फेस आयडी यांसारख्या डायनॅमिक सुरक्षा साधनांचा वापर करावा लागेल. विशेष म्हणजे, या नियमांचे उल्लंघन होऊन फसवणूक झाल्यास त्याची सर्व जबाबदारी बँका किंवा पेमेंट कंपन्यांची असेल आणि त्यांना ग्राहकांचे पैसे परत करावे लागतील. रिस्क-बेस्ड ऑथेंटिकेशनमुळे मोठ्या रकमेच्या व्यवहारांवर आता अधिक कडक पाळत ठेवली जाणार असून, १ ऑक्टोबरपासून हे नियम आंतरराष्ट्रीय व्यवहारांनाही लागू होतील. कंगना रणौतचा 40 वा वाढदिवस पंतप्रधान मोदींसोबत साजरा; सहकुटुंब घेतली भेट बॉलिवूड अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौतने आज आपला ४० वा वाढदिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन अत्यंत खास पद्धतीने साजरा केला. याप्रसंगी कंगनासोबत बहीण रंगोली आणि भाऊ अक्षत देखील उपस्थित होते. भेटीदरम्यान कंगनाने पंतप्रधानांना हिमाचली परंपरेची शाल भेट दिली, तर भावाने भगवान विष्णूच्या दशावताराची पितळी प्रतिमा भेट म्हणून दिली. सोशल मीडियावर या भेटीचे फोटो शेअर करत कंगनाने हा क्षण आपल्या आयुष्यातील अत्यंत प्रेरणादायी आणि संस्मरणीय असल्याचे म्हटलेय. अभिनयासोबतच राजकारणात सक्रिय असलेल्या कंगना सध्या आर. माधवनसोबतच्या आगामी थ्रिलर चित्रपटामुळे चर्चेत असून, या भेटीमुळे वाढदिवसाला एक वेगळेच महत्त्व प्राप्त झालेय. “पाहुणचार हक्क समजू नका”; गावस्करांचा परदेशी खेळाडूंना खणखणीत टोला आयपीएल २०२६ पूर्वी मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स आणि जोश हेजलवूड यांसारख्या खेळाडूंनी वर्कलोडचे कारण देत माघार घेतल्याने सुनील गावस्कर संतापलेत. काही विदेशी खेळाडू विनाकारण अनुपलब्ध राहून भारतीय फ्रँचायझींना गृहीत धरतात, अशी टीका त्यांनी केलीय. “फ्रँचायझी खेळाडूंच्या कुटुंबाचाही खर्च उचलतात, हा भारतीय पाहुणचार आहे, पण त्याचा गैरफायदा घेऊ नका,” असे गावस्कर यांनी सुनावलेय. या भूमिकेला आर. अश्विननेही पाठिंबा दिला असून, पूर्णवेळ उपलब्ध नसणाऱ्या खेळाडूंच्या पगार कपातीची मागणी केलीय. सविस्तर वृत्त – ‘त्या खेळाडूंना संघातून काढा…’, IPL 2026 पूर्वी संतप्त सुनील गावस्करांनी फ्रँचायझींना दिला सल्ला, नेमकं कारण काय?