सर्व महानगरपालिकांच्या मतदारयाद्या जाहीर करण्यास मुदतवाढ – मुंबईत ११ लाख नावे दुबार असल्याची पालिकेनेच दिली कबुली – महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रसिद्ध झालेल्या मतदारयाद्यांमधील अनेक चुका दुरुस्त करण्यास अधिक कालावधीची मागणी महापालिकांनी केल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने पाच दिवसांची वाढीव मुदत दिली आहे. राज्यातील २९ महापालिकांसाठीच्या याद्यांमध्ये मुंबईत ११ लाख नावे दुबार असल्याची कबुली पालिकेनेच दिली. तसेच, एकाच पत्त्यावर ३५ लोकांची नावे आढळल्याचा आणि विरोधकांच्या प्रभागांमध्ये मतदारांचे फेरफार झाल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गट आणि मनसेने केला होता. यापूर्वी हरकती आणि सूचनांसाठी सात दिवसांची मुदतवाढ देण्यात आली होती, जी उद्या संपणार होती. महापालिका आयुक्तांच्या मागणीनंतर, आयोगाने आता नवीन वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार, हरकतींवर निर्णय घेऊन प्रभागनिहाय याद्या १५ डिसेंबरला आणि मतदान केंद्रनिहाय यादी २७ डिसेंबरला प्रसिद्ध केली जाईल. विधानसभेत गाजला भटक्या कुत्र्यांचा मुद्दा – सर्वपक्षीय आमदारांकडून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी – राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस होता. आज दुसऱ्या दिवशी विधानसभेत मंगळवारी भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवावर तीव्र चर्चा झाली. राज्यातील बिबट्यांच्या प्रश्नापेक्षा भटक्या कुत्र्यांचा विषय अधिक गाजला, कारण गल्लीबोळात या कुत्र्यांमुळे नागरिक, विशेषतः लहान मुले भयभीत झाली आहेत. अतुल भातखळकर, महेश लांडगे, सुनील प्रभू यांच्यासह अनेक आमदारांनी लक्षवेधीद्वारे या समस्येकडे लक्ष वेधले. कुत्रे चावण्याचे व रेबीजचे वाढते धोके सदस्यांनी निदर्शनास आणले. नगर विकास राज्यमंत्र्यांच्या उत्तराने सदस्य असमाधानी झाले. अखेर, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हस्तक्षेप करत, या समस्येवर मंत्रालयात बैठक घेऊन तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. महेश लांडगे यांनी ‘भटक्या कुत्र्यांना पकडून प्राणीप्रेमींच्या घरी सोडावे’ अशी सूचनाही केली. आमदारांनी निर्बीजीकरण आणि शेल्टर होमची मागणी केली आहे. हिवाळी सुट्ट्यांसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या – मुंबई-नागपूर, पुणे-नागपूर, आणि पुणे-अमरावती – नाताळ आणि नवीन वर्षाच्या निमित्ताने प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने मुंबई-नागपूर, पुणे-नागपूर, आणि पुणे-अमरावती या मार्गांवर विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाड्यांना भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. सीएसएमटी-नागपूर साप्ताहिक विशेष २० डिसेंबरपासून दर शनिवारी धावणार आहे. पुणे-नागपूर साप्ताहिक विशेष १९ डिसेंबरपासून दर शुक्रवारी/शनिवारी सुटणार आहे. पुणे-अमरावती साप्ताहिक विशेष २० डिसेंबरपासून दर शनिवारी/रविवारी धावेल. विशेष गाडीचे आरक्षण १० डिसेंबरपासून सुरू होत आहे, तर इतर गाड्यांचे आरक्षण सध्या सुरू आहे. या गाड्यांचे आरक्षण सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर तसेच www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू आहे. प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वेने केले आहे. समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात- कार जळून खाक, प्रवासी सुखरूप- समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून, सोमवारी दुपारी लाहुकी फाट्यावरील चौकात भीषण अपघात झाला. नागपूरहून पुण्याकडे निघालेली एक कार गतिरोधकाचा अंदाज न आल्याने दुभाजकाला धडकली आणि त्यानंतर कारने अचानक पेट घेतला. सुदैवाने, कारमधील पाचही प्रवाशांनी अनिकेत दत्तात्रय झिरपे, दत्तात्रय गणपत झिरपे, केतकी दत्तात्रय झिरपे, कोमल अशोक गायकवाड आणि कल्पना अशोक गायकवाड प्रसंगावधान राखून वेळीच कारमधून उडी मारल्याने मोठी जीवितहानी टळली. या थरारक घटनेत प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. हा या ठिकाणचा तिसरा अपघात असून, हे गतिरोधक अपघाताला निमंत्रण ठरत असल्याची प्रवाशी सांगत आहेत. त्यामुळे, येथे दिशादर्शक फलक लावण्याची मागणी जोर धरत आहे. अग्निशमन दलाने आग विझवली, पण तोपर्यंत कार पूर्णपणे जळून खाक झाली होती. करमाड पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली आहे. सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाला वर्ष पूर्ण – नराधमांना कठोर शिक्षा कधी? – मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येला आज एक वर्ष पूर्ण झाले. 9 डिसेंबर रोजी खंडणीच्या वादातून वाल्मिक कराड आणि त्याच्या गुंडांनी त्यांचे अपहरण करून गॅस पाईप, लोखंडी रॉडने तब्बल दोन तास अमानुष मारहाण केली. शरीरावर ५६ जखमा आढळून आल्या, इतक्या क्रूरपणे त्यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला, तर वाल्मिक कराडसह गँग तुरुंगात गेली. सीआयडी तपासानंतरही, अजून एक आरोपी कृष्णा आंधळे फरार आहे. देशमुखांच्या कुटुंबीयांना न्याय मिळून सर्व आरोपींना लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत. इंडिगोच्या गोंधळाबाबात पंतप्रधान मोदींचं मोठं वक्तव्य – FDTL नियमांना फेब्रुवारीपर्यंत स्थगिती – गेल्या आठवड्यापासून इंडिगो विमानसेवेत मोठा गोंधळ उडाला असून, अनेक विमाने रद्द किंवा विलंबित होत असल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या परिस्थितीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिंता व्यक्त केली आहे. पंतप्रधान मोदींनी नियम आणि कायदे व्यवस्था सुधारण्यासाठी असावेत, लोकांना त्रास देण्यासाठी नसावेत, असे मत व्यक्त केल्याची माहिती केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी दिली. दरम्यान, केंद्रीय नागरी विमान उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी इंडिगोच्या ढिसाळ नियोजनावर बोट ठेवत कारवाईचा इशारा दिला आहे. ‘फ्लाइट ड्यूटी टाइम लिमिटेशन’ नियमांच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही परिस्थिती ओढवल्याचे त्यांनी स्पष्ट केले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने तातडीने पाऊले उचलली असून, FDTL नियमांना फेब्रुवारीपर्यंत स्थगिती दिली आहे. तसेच, DGCA ने इंडिगोला कारणे दाखवा नोटीस बजावत चौकशीसाठी चार सदस्यीय समिती नेमली आहे. समितीच्या अहवालानंतर पुढील कारवाई केली जाईल, असे मंत्री मोहोळ यांनी सांगितले. ११ वर्षांचं लग्न कांदा-लसणाच्या वादामुळं मोडलं – पती-पत्नीचा क्षुल्लक कारणावरून घटस्फोट – बदललेल्या जीवनशैलीमुळे नात्यात तणाव वाढून घटस्फोटांची प्रकरणे वाढत असताना, गुजरात उच्च न्यायालयात आलेल्या एका प्रकरणाने अनेकांना आश्चर्यचकित केले. २००२ मध्ये विवाहबद्ध झालेल्या एका जोडप्यात जेवणात कांदा आणि लसून वापरण्यावरून वाद सुरू झाला, जो तब्बल दोन दशकांच्या न्यायालयीन लढ्यानंतर संपुष्टात आला. पत्नी स्वामीनारायण पंथाची अनुयायी असल्याने तिच्या धार्मिक श्रद्धेनुसार तिला कांदा-लसून चालत नव्हता. मात्र, पती आणि सासू हे पदार्थ खात असत. सुरुवातीला मान्य असलेला हा फरक पुढे वादाचे कारण बनला. वादाला कंटाळून पत्नी २०१३ मध्ये मुलासह माहेरी गेली. पतीने कुटुंब न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला आणि पत्नीचा हा आक्षेप ‘क्रूरता’ असल्याचे नमूद केले. २०२४ मध्ये न्यायालयाने घटस्फोट मंजूर केला. या निर्णयाविरोधात पत्नीने उच्च न्यायालयात धाव घेतली, मात्र अखेरीस तिने घटस्फोटाला विरोध नसल्याचे सांगितले. पतीने देखभाल खर्च देण्याचे मान्य केल्यानंतर उच्च न्यायालयाने याचिका रद्द करत या प्रेमविवाहाचा वाद संपुष्टात आणला. अनिल अंबानींचे पुत्र जय अनमोल यांच्यावर गुन्हा दाखल – २२८ कोटींच्या फसवणूक प्रकरणी CBIची कारवाई – केंद्रीय अन्वेषण विभागाने युनियन बँक ऑफ इंडियाच्या २२८ कोटी रुपयांच्या कथित फसवणूक प्रकरणात मोठे पाऊल उचलले आहे. उद्योगपती अनिल अंबानी यांचे पुत्र आणि रिलायन्स होम फायनान्स लिमिटेडचे संचालक जय अनमोल अंबानी यांच्यासह रवींद्र शरद सुधाकर आणि कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. युनियन बँक ऑफ इंडियाने केलेल्या तक्रारीनुसार, RHFL ने मुंबईतील शाखेतून व्यवसायासाठी ४५० कोटी रुपयांची क्रेडिट मर्यादा घेतली होती. बँकेच्या अटींचे उल्लंघन करत कंपनीने कर्जाचे हप्ते थकवले, ज्यामुळे ३० सप्टेंबर २०१९ रोजी खाते ‘नॉन-परफॉर्मिंग असेट’ म्हणून घोषित करण्यात आले. या कथित फसवणुकीमुळे बँकेला सुमारे २२८ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अधिकाऱ्यांचा अंदाज आहे. यापूर्वीही जय अनमोल अंबानी यांची अन्य एका बँक फसवणूक प्रकरणी चौकशी झाली होती. तब्बल १५ वर्षांनी ‘3 इडियट्स’चा सिक्वेल – चित्रपट २०२६ मध्ये चित्रपटगृहात होणार प्रदर्शित – तब्बल १५ वर्षांनंतर ‘3 इडियट्स’ या आयकॉनिक सिनेमाचा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही बॉलिवूडमधील सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आहे. आमिर खान, करीना कपूर, आर माधवन आणि शर्मन जोशी ही मूळ स्टारकास्ट पुन्हा एकदा एकत्र येणार आहे. राजकुमार हिराणी हेच या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. ‘पिंकविला’ने दिलेल्या माहितीनुसार, या बहुप्रतिक्षित सिक्वेलची स्क्रिप्ट लॉक झाली असून हा चित्रपट २०२६ मध्ये चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. २००९ मध्ये रिलीज झालेला ‘3 इडियट्स’ हा भारतीय सिनेमातील एक ‘कल्ट क्लासिक’ ठरला होता. शिक्षण पद्धतीवर भाष्य करणाऱ्या या चित्रपटाने २०० कोटींहून अधिक कमाई केली होती. आता रँचो-राजू-फरहान यांचा ट्रायो नवा ताजेपणा घेऊन परतणार असल्याने चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. त्यामुळे ‘ऑल इज वेल’ हे पुन्हा एकदा ऐकायला मिळणार आहे. पुनरागमनापूर्वी हार्दिक पंड्याचा पापाराझींवर संताप- गर्लफ्रेंडचे आक्षेपार्ह फोटो क्लिक करून पोस्ट – भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-२० मालिकेसाठी पुनरागमन करण्यापूर्वी अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. पापाराझींनी त्याची गर्लफ्रेंड, अभिनेत्री माहिका शर्मा हिचे रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना आक्षेपार्ह कोनातून फोटो क्लिक करून पोस्ट केले. यामुळे हार्दिकने इन्स्टाग्रामवर आपली तीव्र नाराजी व्यक्त केली. त्याने सांगितले की, ‘कॅमेऱ्यांचा पाठलाग’ स्वीकारार्ह आहे, पण यावेळी सर्व मर्यादा ओलांडल्या गेल्या आहेत. “हा केवळ ‘क्लिक’चा प्रश्न नाही, तर सन्मानाचा आहे. प्रत्येक महिला सन्मानाची हक्कदार आहे,” असे त्याने स्पष्ट केले. पापाराझींनी माणुसकी आणि मर्यादांचे भान ठेवावे, असे आवाहन त्याने केले. दुखापतीमुळे आशिया कपनंतर बाहेर असलेला हार्दिक आता टी-२० मालिकेतून पुनरागमन करत आहे.