Today Top 10 News: अजित पवार विमान अपघातात आगीमुळे ब्लॅक बॉक्स जळाला, सरकारकडून तपासाबाबत धक्कादायक माहिती समोर बारामती येथे झालेल्या अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत नागरी उड्डाण मंत्रालयाने महत्त्वाची माहिती दिलीय. या अपघातात विमान जळाल्याने त्यातील ‘ब्लॅक बॉक्स’ला आगीची मोठी झळ बसली. विमानातील ‘फ्लाइट डेटा रेकॉर्डर’मधील माहिती काढण्यात तपास यंत्रणेला यश आले असले, तरी वैमानिकांचे बोलणे रेकॉर्ड करणाऱ्या ‘कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर’चे प्रचंड नुकसान झालेय. यातील डेटा परत मिळवण्यासाठी आता थेट विमान बनवणाऱ्या कंपनीची मदत घेतली जातेय. या प्रकरणाचा तपास पूर्णपणे तांत्रिक नियमांनुसार आणि पारदर्शक पद्धतीने सुरू असून, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन सरकारने केलेय. हेही वाचा – अजित पवारांच्या विमान अपघातातील ब्लॅक बॉक्सबाबत धक्कादायक माहिती समोर स्मार्ट मीटरमध्ये महाराष्ट्र देशात अव्वल; वीज बिलात ग्राहकांना कोट्यवधींची सवलत smart meter देशात स्मार्ट मीटर बसवण्याच्या मोहिमेत महाराष्ट्र राज्याने बाजी मारली असून १० फेब्रुवारीपर्यंत तब्बल ८७ लाख ५७ हजार मीटर बसवून महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर पोहोचलाय. उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यांना मागे टाकत महाराष्ट्राने हे यश मिळवलेय. या नवीन मीटरमुळे ग्राहकांना ‘टाईम ऑफ डे’ म्हणजेच वेळेनुसार वीज वापरण्याच्या सुविधेचा मोठा फायदा मिळतोय. विशेष म्हणजे, जुलै २०२५ ते जानेवारी २०२६ या सात महिन्यांत राज्यातील घरगुती ग्राहकांनी ५१ कोटी रुपयांची बचत केलीय, तर उद्योग आणि व्यापारी मिळून एकूण २१५ कोटी रुपयांची सवलत मिळालीय. स्मार्ट मीटरमुळे वीज वापराची अचूक नोंद होत असल्याने बिलाच्या तक्रारींचे प्रमाण आता केवळ अर्ध्या टक्क्यावर आलेय. घरबसल्या मोबाईल ॲपवर प्रत्येक तासाचा वीज वापर पाहता येत असल्याने ग्राहकांना आपले बिल नियंत्रित करणे सोपे झालेय. आता शेतजमिनीवर घर बांधणं झालं सोपं; NA परवानगीची गरज नाही महाराष्ट्र सरकारने सर्वसामान्यांना मोठा दिलासा देत शेतजमिनीवर घर किंवा इतर बांधकाम करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून घेतली जाणारी ‘एनए’ परवानगी रद्द केलीय. आता नगररचना विभाग किंवा स्थानिक प्रशासनाने तुमचा घराचा नकाशा मंजूर केला, तर तीच तुमची ‘एनए’ परवानगी मानली जाईल. यामुळे आता नागरिकांना सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवण्याची गरज उरणार नाही. विशेष म्हणजे, दरवर्षी भरावा लागणारा ‘अकृषिक कर’ देखील आता बंद झाला असून, त्याऐवजी फक्त एकदाच ‘रूपांतरण शुल्क’ भरावे लागेल. या निर्णयामुळे बँकांकडून कर्ज मिळणे सोपे होईल आणि ७/१२ उताऱ्यावरही याची नोंद ऑनलाइन पद्धतीने केली जाईल. आरटीई प्रवेशासाठी 1 किमीचा नवा नियम; गरिबांच्या शिक्षणावर टाच? शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (RTE) खासगी शाळांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी सरकारने आता घरापासून १ किलोमीटर अंतराची अट सक्तीची केलीय. या नव्या निर्णयामुळे शिक्षण क्षेत्रात मोठा वाद निर्माण झालाय. तज्ज्ञांच्या मते, हा नियम मुलांच्या हिताचा नसून यामुळे त्यांना शाळा निवडण्याचे पर्याय कमी मिळतील. सरकारला खासगी शाळांचे शुल्क भरावे लागते, ते पैसे वाचवण्यासाठीच हा अडथळा आणल्याचा आरोप सामाजिक संस्थांनी केलाय. पूर्वी ३ किलोमीटरपर्यंत शाळा निवडता येत होत्या, मात्र आता ही मर्यादा कमी केल्याने अनेक गरीब विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहण्याची भीती आहे. हा नियम अन्यायकारक असून सरकारने याचा पुनर्विचार करावा, अशी मागणी आता जोर धरतेय. बांगलादेशात सत्तांतर; तारिक रहमान यांनी घेतली पंतप्रधानपदाची शपथ Tarique-Rahman बांगलादेश नॅशनल पार्टीचे (बीएनपी) प्रमुख तारिक रहमान यांनी मंगळवारी बांगलादेशचे नवे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांनी त्यांना संसदेच्या दक्षिण प्लाझा येथे पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत बीएनपीने २९७ पैकी २०९ जागा जिंकून प्रचंड बहुमत मिळवलेय, तर शेख हसीना यांच्या अवामी लीगवर निवडणुकीत बंदी घालण्यात आली होती. रहमान यांच्यासोबत २५ मंत्री आणि २४ राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली असून, यात अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आलीय. या ऐतिहासिक सोहळ्याला भारताचे प्रतिनिधी म्हणून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला उपस्थित होते. त्यांनी या बदलामुळे दोन्ही देशांतील लोकशाही मूल्ये अधिक दृढ होतील असा विश्वास व्यक्त केला. दुसरीकडे, जमात-ए-इस्लामीचे शफीकुर रहमान यांची संसदेत विरोधी पक्षनेते म्हणून निवड करण्यात आलीय. सविस्तर वृत्त – तारिक रहमान बनले बांगलादेशचे पंतप्रधान, ‘या’ नेत्यांनीही घेतली मंत्रिपदाची शपथ शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; आता एका फोनवर मिळणार शेतीची सर्व माहिती शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी सरकारने ‘भारत विस्तार’ नावाचे एक नवीन एआय (AI) पोर्टल सुरू केलेय. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मंगळवारी याचे उद्घाटन केले. हे एक प्रकारचे ‘डिजिटल कृषी तज्ज्ञ’ आहे, जे शेतकऱ्यांना त्यांच्या स्वतःच्या भाषेत शेतीविषयक मार्गदर्शन करेल. या सुविधेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे शेतकऱ्यांना आता माहितीसाठी कोठेही जाण्याची गरज नाही. तुमच्याकडे साधा मोबाईल असला तरी तुम्ही १५५२६१ या क्रमांकावर फोन करून हवामान, बाजारातील पिकांचे भाव (मंडी भाव), खते, बियाणे आणि पिकांवरील रोगांची माहिती घेऊ शकता. यामध्ये ‘भारती’ नावाची एक बोलणारी एआय मदतनीस आहे, जी तुमच्या प्रश्नांना एखाद्या माणसाप्रमाणे सोप्या भाषेत उत्तरे देते. सध्या ही सेवा हिंदी आणि इंग्रजीमध्ये उपलब्ध असून लवकरच ती मराठीसह इतर ११ भाषांमध्ये सुरू होईल. या माध्यमातून पीएम-किसान योजनेचा हप्ता, पीक विमा आणि सॉईल हेल्थ कार्ड यांसारख्या सरकारी योजनांची माहितीही घरबसल्या मिळेल. थोडक्यात सांगायचे तर, आता प्रत्येक शेतकऱ्याच्या खिशात एक हुशार कृषी सल्लागार २४ तास उपलब्ध असेल. मारुती सुझुकीची पहिली इलेक्ट्रिक कार ‘ई-व्हिटारा’ लाँच; फक्त 21 हजार रुपये भरून करा बुकिंग e vitara मारुती सुझुकीने आपली पहिली इलेक्ट्रिक एसयुव्ही ‘ई-व्हिटारा’ भारतीय बाजारात लाँच केलीय. या कारची किंमत १० लाख ९९ हजार रुपयांपासून सुरू होते. विशेष म्हणजे, कंपनीने बॅटरीसाठी एक नवीन योजना आणलीय, ज्यामध्ये ग्राहकांना सुरुवातीला बॅटरीचे पूर्ण पैसे न भरता ती भाड्याने वापरता येईल. यासाठी ग्राहकांना दर किलोमीटरला 4 रुपये भाडे द्यावे लागेल. या बातमीमुळे मारुती कंपनीच्या शेअरच्या किमतीतही वाढ झाली. ही एसयुव्ही खरेदी करणाऱ्यांना ५० हजार रुपयांचा चार्जर आणि त्याचे फिटिंग मोफत मिळणार आहे, तसेच वर्षभर चार्जिंगही मोफत असेल. कारमध्ये सुरक्षिततेसाठी आधुनिक फीचर्स देण्यात आले असून ती कडाक्याच्या थंडीत किंवा प्रचंड उन्हातही उत्तम चालते. ग्राहक फक्त २१ हजार रुपये भरून नेक्सा शोरूममध्ये या गाडीचे बुकिंग करू शकतात. भारत-फ्रान्स मैत्रीचा नवा अध्याय; 3.25 लाख कोटींचा संरक्षण करार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यात आज मुंबईत एक महत्त्वाची बैठक पार पडली. या भेटीचे मुख्य आकर्षण म्हणजे दोन्ही देशांमध्ये होणारा सुमारे ३.२५ लाख कोटी रुपयांचा संरक्षण करार आहे. या करारांतर्गत भारताला ११४ नवीन ‘राफेल’ लढाऊ विमाने मिळणार असून, भारताच्या लष्करी इतिहासातील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा व्यवहार ठरण्याची शक्यता आहे. या बैठकीत केवळ संरक्षणावरच नाही, तर तंत्रज्ञान आणि उद्योगावरही भर देण्यात आला. दोन्ही नेत्यांनी ‘भारत-फ्रान्स इयर ऑफ इनोव्हेशन २०२६’ चे उद्घाटन केले. विशेष म्हणजे, अध्यक्ष मॅक्रॉन यांनी मुंबईत अनिल कपूर आणि मनोज बाजपेयी यांसारख्या बॉलिवूड कलाकारांची भेट घेऊन भारतीय संस्कृतीचे कौतुक केले. या दौऱ्यामुळे भारत आणि फ्रान्समधील मैत्री आता अधिक घट्ट झालीय. ज्येष्ठ लेखक सलीम खान रुग्णालयात दाखल; प्रकृती जाणून घेण्यासाठी सलमान खान पोहोचला salim khan प्रसिद्ध लेखक सलीम खान यांची तब्येत खालावल्याने त्यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात भरती करण्यात आलेय. त्यांना सध्या आयसीयूमध्ये ठेवण्यात आले असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. वडिलांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी अभिनेता सलमान खान तातडीने रुग्णालयात पोहोचला. ९० वर्षांचे सलीम खान यांनी ‘शोले’ आणि ‘जंजीर’ सारख्या सुपरहिट चित्रपटांचे लेखन केलेय. त्यांच्या प्रकृतीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नसली, तरी चाहते ते लवकर बरे व्हावेत म्हणून प्रार्थना करत आहेत. सविस्तर वृत्त – सलमान खानच्या वडिलांची तब्येत बिघडली; सलीम खान तातडीने लीलावती रुग्णालयात दाखल कॅनडावर विजय मिळवत न्यूझीलंड सुपर-8 मध्ये; युवराज समराचे ऐतिहासिक शतक टी-२० विश्वचषकातील ३१ व्या सामन्यात न्यूझीलंडने कॅनडाचा ८ गडी राखून पराभव करत सुपर-८ फेरीत दिमाखात प्रवेश केलाय. चेपॉक स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात कॅनडाने प्रथम फलंदाजी करताना ४ बाद १७३ धावांचे आव्हानात्मक लक्ष्य ठेवले होते. कॅनडाच्या १९ वर्षीय युवराज समराने ६५ चेंडूत ११० धावांची तुफानी खेळी करत विश्वचषकाच्या इतिहासात सर्वात तरुण शतकवीर होण्याचा मान पटकावला. त्याने पाकिस्तानच्या अहमद शहजादचा विक्रम मोडीत काढला. मात्र, न्यूझीलंडने हे लक्ष्य अवघ्या १५.१ षटकांत गाठले. न्यूझीलंडकडून ग्लेन फिलिप्सने नाबाद ७६ धावांची खेळी करत सामनावीराचा किताब पटकावला, तर रचिन रवींद्रने ५९ धावांचे मोलाचे योगदान दिले. किवी गोलंदाजांच्या शिस्तबद्ध माऱ्यापुढे कॅनडाचे शतक व्यर्थ ठरले आणि न्यूझीलंडने आपली विजयी घोडदौड कायम राखली.