TMC Election : ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या (जानेवारी २०२६) पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) जोरदार मोर्चेबांधणी करत आहे. अशातच मनसेचे ठाणे शहर प्रभाग अध्यक्ष आणि महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार सीमा महेश इंगळे यांचे पती महेश इंगळे यांनी सोशल मीडियावर केलेल्या गंभीर आरोपाने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. महेश इंगळे यांनी फेसबुकवर स्वतःचा एक व्हिडीओ पोस्ट करून दावा केला आहे की, प्रभाग क्रमांक ११ (क) मधील भाजप उमेदवार नंदा कृष्णा पाटील यांच्या दीराने (सचिन पाटील) त्यांना पैशांचे आमिष दाखवून पत्नीची उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव आणला. विकला जाणारा मी महाराष्ट्र सैनिक नाही ! माझी पत्नी सौ सीमा महेश इंगळे, वॉर्ड क्रमांक 11 क ,निशाणी रेल्वे इंजिन महाविकास आघाडी.उमेदवार. ठा.म.पा.इलेक्शन लढत असून.विरोधी उमेदवार 11 क भाजपा.यांच्या दीराने मला आमिष दाखवून उमेदवारी नामांकन मागे घ्यावे म्हणुन प्रयत्न केले. — Mahesh Ingale (@MaheshI82785078) January 12, 2026 काय म्हणाले महेश इंगळे? “मी गेल्या १८-१९ वर्षांपासून या प्रभागात विविध सामाजिक उपक्रम राबवत आहे. यावेळी ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत प्रभाग ११ (क) लेडीज वॉर्ड म्हणून जाहीर झाल्यामुळे मनसे प्रमुख राज ठाकरे, उद्धव ठाकरे, अविनाश जाधव आणि अभिजीत पानसे यांच्या आशीर्वादाने माझ्या पत्नी सीमा महेश इंगळे यांना महाविकास आघाडीतर्फे तिकीट देण्यात आले. तिने निशाणी ‘रेल्वे इंजिन’ या चिन्हावर नामांकन अर्ज दाखल केला. नामांकन मागे घेण्याची शेवटची तारीख जवळ आल्यावर, एक दिवस आधी विरोधी गटातील उमेदवार नंदा कृष्णा पाटील यांचे दीर सचिन पाटील यांनी मला दिवसभर फोन केले. मी फोन उचलला नाही. त्यानंतर रात्री मी एका ठिकाणाहून मिटिंग करून घरी परत येत असताना त्यांनी माझ्या गाडीचा पाठलाग केला. मला थांबवून ते म्हणाले, ‘माझ्या वहिनीला (नंदा पाटील) बिनविरोध निवडून आणायचं आहे. तू नामांकन मागे घे. तुला सेटल करू, तू सेटल होशील.’ तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगितलं, ‘विकला जाणारा मी महाराष्ट्र सैनिक नाही आहे. माझ्या रक्तात गद्दारी नाही.” प्रभाग क्रमांक ११ (क) मधील लढत महाविकास आघाडी (मनसे) : सीमा महेश इंगळे भाजप : नंदा कृष्णा पाटील या प्रभागात आता उमेदवारी मागे घेण्याची मुदत संपली असून, निवडणुकीत थेट सामना होणार आहे. महेश इंगळे यांनी हा व्हिडीओ पोस्ट करताच सोशल मीडियावर तो वेगाने व्हायरल झाला आहे. मनसेची भूमिका आणि प्रतिक्रिया मनसेकडून यापूर्वीच ठाणे महापालिकेत ‘मराठी अस्मिता’ आणि ‘स्थानिकांना प्राधान्य’ या मुद्द्यावर जोरदार प्रचार सुरू आहे. या प्रकरणामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये संताप व्यक्त होत असून, पक्षाकडून याबाबत अधिकृत प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, भाजपकडून अद्याप या आरोपांवर अधिकृत उत्तर आलेले नाही. मतदानाच्या तोंडावर अशा गंभीर आरोपांमुळे ठाणे महापालिका निवडणुकीतील राजकीय वातावरण तापले आहे. निवडणूक आयोग आणि पोलिसांकडून याबाबत चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.