TMC Election Mayor : ठाणे महानगरपालिका निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने (शिंदे गट) जबरदस्त कामगिरी करत एकहाती वर्चस्व प्रस्थापित केले आहे. १३१ सदस्यीय सभागृहात शिवसेनेने ७१ जागांवर स्पष्ट विजय मिळवला असून, ४ जागांवर आघाडी कायम असल्याने हा आकडा ७५ पर्यंत पोहोचला आहे. या दणदणीत विजयानंतर आता सर्वांचे लक्ष ठाण्याच्या महापौरपदावर कुणाची वर्णी लागणार याकडे लागले आहे. विजयाचा गुलाल उधळल्यानंतर आता खऱ्या अर्थाने प्रथम नागरिकपदासाठी राजकीय रस्सीखेच सुरू झाली असून, ज्येष्ठ आणि अनुभवी नगरसेवकांची अनेक नावे चर्चेत आली आहेत. ठाण्यावर शिवसेनेचे निर्विवाद वर्चस्व निकालानंतरची स्थिती स्पष्ट आहे. शिवसेनेने (शिंदे गट) ठाणे महापालिकेत ७५ जागा मिळवून बहुमतापेक्षा खूप पुढे गेले आहे. यामुळे महापौर निवडीसाठी शिवसेनेची एकहाती मक्तेदारी निर्माण झाली आहे. इतर पक्षांची स्थिती अशी आहे: – भाजप – २८ जागा – राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) – ९ जागा – राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) – १२ जागा – एमआयएम – ५ जागा (सर्वांना चकित करणारी कामगिरी) – उद्धव ठाकरे गट शिवसेना – केवळ १ जागा – काँग्रेस आणि मनसे – खातेही उघडता आले नाही महापौरपदाच्या शर्यतीत आघाडीवर कोण? १. भोईर कुटुंबाचा प्रबळ दावा प्रभाग क्रमांक ०८ मधून गेल्या पाच दशकांपासून वर्चस्व गाजवणारे भोईर कुटुंब या शर्यतीत आघाडीवर मानले जात आहे. देवराम भोईर, संजय भोईर आणि उषा भोईर ही प्रमुख नावे चर्चेत आहेत. ग्रामपंचायत काळापासून राजकारणात सक्रिय असलेल्या या कुटुंबाचा प्रदीर्घ अनुभव पक्षासाठी मोलाचा ठरला आहे. विशेषतः देवराम भोईर यांनी महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्षपद भूषवले असून, त्यांच्या अनुभवाचा विचार करून पक्षाकडून त्यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. २. मुख्यमंत्री शिंदेंचे विश्वासू – राम रेपाळे किसन नगर प्रभाग क्रमांक १७ मधून सलग तीन दशकांपासून निवडून येणारे राम रेपाळे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात. पक्षाचे सचिव म्हणून जबाबदारी सांभाळणाऱ्या रेपाळे यांच्यावर शिंदे यांनी मुंबई महापालिका निवडणुकीचीही महत्त्वाची जबाबदारी सोपवली होती. संकटकाळात आणि राजकीय स्थित्यंतराच्या वेळी त्यांनी दिलेली खंबीर साथ लक्षात घेता, सध्या महापौरपदाच्या शर्यतीत राम रेपाळे यांचे नाव सर्वात आघाडीवर आहे. ३. आक्रमक नेत्या मीनाक्षी शिंदे माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. ठाणे शिवसेना महिला जिल्हा संघटक म्हणून कार्यरत असलेल्या मीनाक्षी शिंदे यांनी २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांनी उठाव केल्यावेळी असंख्य महिला कार्यकर्त्यांना सोबत घेऊन त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहिले होते. आक्रमक नेतृत्व आणि बड्या नेत्यांना अंगावर घेण्याची क्षमता असणाऱ्या या नेत्यांची कार्यकर्त्यांसाठी पदाचा त्याग करण्याची वृत्ती पाहता, त्यांच्या नावाचा विचार पुन्हा होऊ शकतो. ४. अनुभवी हनुमंत जगदाळे प्रभाग क्रमांक ०६ मधून गेल्या पाच दशकांपासून सातत्याने निवडून येणारे हनुमंत जगदाळे हे ठाणे राजकारणातील एक मोठे नाव आहे. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसला ठाण्यात वाढवण्यासाठी त्यांनी मोठी मेहनत घेतली होती, परंतु आता ते शिवसेना शिंदे गटात सक्रिय आहेत. प्रशासकीय कामाचा आणि राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव असल्याने ज्येष्ठ नगरसेवक म्हणून त्यांच्या नावाचा विचार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ५. जयश्री फाटक आणि सुखदा मोरे माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या पत्नी जयश्री फाटक यांचे नावही या शर्यतीत आहे. प्रभाग क्रमांक १७ मधून गेल्या चार दशकांपासून निवडून येणाऱ्या जयश्री फाटक यांचा जनसंपर्क दांडगा आहे. त्याचबरोबर शिवसेनेचे सचिव आणि माजी महापौर संजय मोरे यांच्या पत्नी सुखदा मोरे यांचेही नाव चर्चेत आहे. संजय मोरे यांनी सुखदा मोरे यांची ही शेवटची निवडणूक असल्याचे सूतोवाच केल्याने, त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा सन्मान म्हणून त्यांना संधी मिळेल का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. ठाणे महापालिकेत शिवसेनेने मिळवलेला हा विजय एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाची ताकद दाखवणारा आहे. आता महापौरपदाच्या निवडीत कोणता निर्णय होतो आणि कोण ठाण्याचे प्रथम नागरिक म्हणून निवडले जाते, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.