मालदा (पश्चिम बंगाल): “पश्चिम बंगालसमोर आज घुसखोरीचे मोठे संकट उभे राहिले असून, सत्ताधारी तृणमूल काँग्रेस (TMC) राजकीय फायद्यासाठी या घुसखोरांना मतदार बनवत आहे. यामुळे स्थानिक गरिबांचे हक्क हिरावले जात असून लोकसंख्येचे संतुलन बिघडत आहे. राज्यात भाजपचे सरकार येताच प्रत्येक घुसखोराची हकालपट्टी केली जाईल,” असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी मालदा येथे दिला. मालदा येथे आयोजित जनसभेला संबोधित करताना पंतप्रधानांनी टीएमसी सरकारवर भ्रष्टाचाराचे आणि महिलांवरील अत्याचाराचे गंभीर आरोप केले. तसेच, त्यांनी हावडा ते गुवाहाटी दरम्यान धावणाऱ्या देशातील पहिल्या ‘वंदे भारत स्लीपर’ ट्रेनचे उद्घाटनही केले. दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये आगामी विधानसभा निवडणुका (West Bengal Assembly Elections 2026) येत्या मार्च–एप्रिल दरम्यान होण्याची शक्यता आहे, कारण राज्य विधानसभा वर्तमान सरकारचा कार्यकाळ ७ मे २०२६ रोजी संपतो आहे. त्यामुळे नवीन निवडणूक त्याआधी करणे आवश्यक आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या बड्या नेत्यांचे पश्चिम बंगालमध्ये दौरे वाढलेत. पंतप्रधानांच्या भाषणातील ७ महत्त्वाचे मुद्दे: घुसखोरी हे सर्वात मोठे आव्हान: पंतप्रधान म्हणाले की, जगातील प्रगत देशही आज घुसखोरी रोखण्यासाठी कडक पावले उचलत आहेत. मात्र, बंगालमध्ये टीएमसीच्या संरक्षणामुळे घुसखोरांचे धाडस वाढले आहे. हे घुसखोर येथील जमिनी आणि लेकी-बाळींच्या सुरक्षेसाठी धोका बनले आहेत. भाजप सरकार येताच यावर कडक कारवाई केली जाईल. ‘आयुष्मान भारत’ रोखणारी ‘पत्थरदिल’ सरकार: देशातील गरिबांना ५ लाखांपर्यंत मोफत उपचार देणारी ‘आयुष्मान भारत’ योजना केवळ बंगालमध्ये लागू होऊ दिली जात नाही. “टीएमसी नेत्यांना लोकांच्या दु:खाशी काहीही देणेघेणे नाही, त्यांना फक्त स्वतःच्या तिजोऱ्या भरायच्या आहेत. अशा निर्मम सरकारची बंगालमधून विदाई करण्याची वेळ आली आहे,” असे मोदी म्हणाले. मुंबईतील विजयाचा उल्लेख: महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीतील यशाचा उल्लेख करत पंतप्रधान म्हणाले की, “मुंबईत भाजपने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. जिथे विजय अशक्य मानला जात होता, तिथे जनतेने भाजपला अभूतपूर्व पाठिंबा दिला आहे. हेच चित्र आता बंगालमध्येही पाहायला मिळेल.” महिलांवरील अत्याचार आणि सुशासनाचा अभाव: बंगालमध्ये महिला पत्रकार आणि सामान्य विद्यार्थिनीही सुरक्षित नाहीत. पीडितांना न्यायासाठी सतत न्यायालयाचे दरवाजे ठोठावे लागतात. “तुमचे एक मत हे चित्र बदलू शकते,” असे आवाहन त्यांनी जनतेला केले. भ्रष्टाचाराचा ‘कॅग’ अहवाल: मालदा येथील पूरग्रस्तांच्या मदतीत मोठा घोटाळा झाल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. ‘कॅग’ अहवालाचा हवाला देत त्यांनी आरोप केला की, टीएमसीच्या जवळच्या कार्यकर्त्यांच्या खात्यात ४०-४० वेळा मदतीचे पैसे जमा झाले, तर प्रत्यक्ष गरजूंना काहीच मिळाले नाही. पूर्व भारताचा विश्वास भाजपवर: २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्यासाठी पूर्व भारताचा विकास अनिवार्य आहे. दशकांपासून या भागाला द्वेषाच्या राजकारणाने जखडून ठेवले होते, मात्र आता येथील जनतेचा विश्वास भाजपवर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बंगालमध्येही वाहणार विकासाची गंगा: बिहारमध्ये एनडीएचे सरकार आल्यामुळे आता बंगालच्या सर्व दिशांना भाजपचे सुशासन आहे. “आई गंगेच्या आशीर्वादाने आता बंगालमध्येही विकासाची गंगा वाहणार आणि भाजप हे करूनच दाखवेल,” असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.