अकोला: अकोला जिल्ह्यातील अकोट नगरपालिकेत राजकीय समीकरणे पुन्हा एकदा थक्क करणारी ठरली आहेत. गेल्या आठवड्यात झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर, आज स्वीकृत नगरसेवक निवडीच्या प्रक्रियेत भाजप आणि एमआयएम (MIM) मधील ‘छुप्या’ युतीचा दुसरा अंक पाहायला मिळाला. भाजपचे माजी नगराध्यक्ष रामचंद्र बरेठिया यांचे पुत्र जितेन बरेठिया यांना एमआयएमच्या पाचही नगरसेवकांनी पाठिंबा दिल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. नेमकं प्रकरण काय? अकोट नगरपालिकेत स्वीकृत सदस्य निवडीसाठी एमआयएमकडून ताज राणा यांचे नाव चर्चेत होते. मात्र, एमआयएमने भाजप नेते जितेन बरेठिया यांनाही उमेदवारी दिली. तांत्रिक कारणास्तव ताज राणा यांचा अर्ज उशिरा दाखल झाल्याचे सांगत तो फेटाळण्यात आला. परिणामी, एमआयएमकडून एकमेव उमेदवार उरलेले जितेन बरेठिया आता एमआयएमच्या पाठिंब्यावर स्वीकृत नगरसेवक होणार हे स्पष्ट झाले आहे. पक्षादेशाला केराची टोपली? यापूर्वी अकोट विकास आघाडीच्या निमित्ताने भाजप-एमआयएम एकत्र आल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत ही युती तोडण्याचे आदेश दिले होते. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक पदाधिकाऱ्यांना नोटिसाही बजावण्यात आल्या होत्या. मात्र, या नव्या घडामोडीमुळे स्थानिक नेत्यांनी पक्षश्रेष्ठींच्या आदेशाला बगल दिल्याची चर्चा आहे. या प्रकरणावर काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजप आणि एमआयएम हे एकाच नाण्याच्या दोन बाजू असून ही ‘अभद्र’ युती जनतेची फसवणूक करणारी असल्याची टीका काँग्रेस नेत्यांनी केली आहे. दरम्यान, एमआयएमचे उमेदवार ताज राणा यांनी या प्रक्रियेविरोधात न्यायालयात जाण्याची तयारी दर्शवली आहे. या राजकीय घडामोडींनंतर आता भाजपचे प्रदेश नेतृत्व स्थानिक आमदार प्रकाश भारसाकळे आणि शहराध्यक्षांवर काय ठोस कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.