Prayagraj Magh Mela 2026: प्रयागराज येथील पवित्र त्रिवेणी संगमावर शुक्रवारपासून ‘माघ मेळा-२०२६’चा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. मेळ्याच्या पहिल्याच दिवशी ‘पौष पौर्णिमा’ या पहिल्या मुख्य स्नान पर्वाचे औचित्य साधून गंगा, यमुना आणि सरस्वतीच्या पवित्र संगमात पुण्यस्नान करण्यासाठी देशभरातून भाविकांचा जनसागर लोटला होता. प्रशासनाने केलेल्या चोख नियोजनामुळे पहिले स्नान पर्व शांततेत पार पडले. ४४ दिवसांचा भक्तिसोहळा – यंदाचा हा माघ मेळा ३ जानेवारीपासून सुरू झाला असून तो १५ फेब्रुवारी २०२६ (महाशिवरात्री) पर्यंत चालणार आहे. पहाटेपासूनच भाविकांनी संगम तटाकडे धाव घेतली होती. कडाक्याच्या थंडीची तमा न बाळगता अबालवृद्धांनी संगमात श्रद्धेची डुबकी लावली. ४४ दिवस चालणाऱ्या या मेळ्यात विविध धार्मिक विधी, कल्पवास आणि प्रवचनांचे आयोजन करण्यात आले आहे. सुरक्षेसाठी ‘एआय’ आणि ड्रोनचा पहारा – मेळ्याची भव्यता लक्षात घेता सुरक्षा व्यवस्थेत प्रथमच आधुनिक तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला आहे. संपूर्ण मेळा क्षेत्रात ४०० हून अधिक ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (AI) युक्त सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर केला जात आहे. जलसुरक्षेसाठी एनडीआरएफ (NDRF) आणि एसडीआरएफ (SDRF) चे जवान तैनात आहेत. तसेच दहशतवाद विरोधी पथक (ATS) आणि बॉम्ब शोधक-नाशक पथक (BDS) कडूनही सातत्याने तपासणी केली जात आहे. पोलिसांना विशेष प्रशिक्षण अतिरिक्त पोलीस आयुक्त अजय पाल शर्मा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “पहिल्या स्नान पर्वासाठी आम्ही सज्ज आहोत. केवळ तंत्रज्ञानच नाही, तर जमिनीवरही आमचे जवान सक्रिय आहेत. या मेळ्यासाठी तैनात असलेल्या प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्याला महिनाभराचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. गर्दी व्यवस्थापन आणि आपत्ती व्यवस्थापनात हे जवान निष्णात असून भाविकांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.” मेळा क्षेत्राचे विविध सेक्टरमध्ये विभाजन करण्यात आले असून, प्रत्येक ठिकाणी पुरेशी पोलीस कुमक तैनात करण्यात आली आहे. प्रशासनाच्या या चोख नियोजनामुळे भाविकांनी समाधान व्यक्त केले आहे.