Pune Weather | सलग दुसऱ्या दिवशी पुणे शहरासह जिल्ह्यातील किमान तापमानात घट झाली असून, थंडीचा पारा १० अंशाच्या खाली आला आहे. तर एनडीए परिसरात पारा एक आकडी ८.७ अंश सेल्सिअस इतके नोंदविले. त्यामुळे शहरातील थंडीचा जोर वाढला असून, गायब झालेली हुडहुडीला पुन्हा सुरुवात झाली आहे. मागील आठ दिवसांपासून शहरातील किमान तापमानात सातत्याने वाढ होत असल्यामुळे थंडीचा जोर कमी झाला होता. काही भागातील किमान तापमान १६ ते १८ अंशाच्या पुढे गेल्यामुळे शहराच्या काही भागांत थंडी गायब झाली तर उपनगरातील कोथरूड, एनडीए, पाषाण, कात्रज, खडकवासला या परिसरात थंडीचा हलकासा जोर होता. मात्र, गेल्या ४८ तासांत गायब झालेल्या थंडी पुन्हा वाढली असून, सलग दुसऱ्या दिवशी किमान तापमानात दोन ते तीन अंशाने घट झाली. त्यामुळे एनडीए परिसरात थंडीचा पारा ११ अंशावरून ८ अंशापर्यंत खाली आला. तर अन्य परिसरात पारा १० ते ११ अंशाच्या आसपास होता. दरम्यान, पुढील दोन दिवस शहरासह जिल्ह्यातील किमान तापमानात काही अंशी घट होईल आणि आकाश निरभ्र राहील, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे. शहरासह जिल्ह्यातील काही भागातील किमान तापमान एनडीए ८.७, पाषाण १०.१, माळीण १०.२, शिरूर १०.४, शिवाजीनगर १०.६, बारामती १०.८, आंबेगाव ११.६, दौंड १२.३, हडपसर १२.९, कोरेगाव पार्क १४.९, चिंचवड १५.८ आणि वडगावशेरी १६.६ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.