Maharashtra-Gujarat Border| महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांच्या सीमेवरील वाद वाढण्याची शक्यता आहे. पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यात वेवजी गावात गुजरातची घुसखोरी सुरू असल्याचा दावा गावकऱ्यांनी केला आहे. मागील २५-३० वर्षापासून याठिकाणी सीमावाद असून वेवजी ग्रामस्थांनी केलेल्या आरोपामुळे महाराष्ट्र गुजरात सीमावाद पुन्हा उफाळून आला आहे. महाराष्ट्र राज्यातील तलासरी तालुक्यातील वेवजी व गुजरात राज्यातील उंबरगाव तालुक्यातील सोलसुंबा येथील हद्दीच्या भागात अतिक्रमण वाढून महाराष्ट्र व गुजरात राज्यात वादाचे प्रसंग वारंवार उद्भवत आहेत. दोन्ही राज्यांच्या अधिकाऱ्यांकडून सीमा मोजणी महाराष्ट्र आणि गुजरात राज्याचा पालघर जिल्ह्याच्या हद्दीत सुरू असलेला हा सीमावाद लवकरात लवकर मिटवण्यासाठी प्रशासनाने गंभीर पाऊले उचलावीत, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. या घटनेची दखल घेत आता दोन्ही राज्यांच्या अधिकाऱ्यांकडून सीमा मोजणी सुरू करण्यात आली आहे. पालघरच्या जिल्हा प्रशासनासह गुजरातच्या उंबरगाव तहसिल कार्यालयाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत संयुक्त सीमा मोजणी पार पडत आहे. दरम्यान, दोन्ही राज्यात भाजपाचं सरकार असल्यानं प्रशासनाने योग्य निर्णय घ्यावा, आम्ही ग्रामस्थांच्या पाठीशी ठामपणे आहोत अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी दिली. Maharashtra-Gujarat Border| गुगल नकाशात महाराष्ट्र सीमेवरील गावे गुजरात राज्यात महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांच्या सीमेवर तलासरी तालुक्यातील वेवजी, गिरगाव, घीमाणीया, झाई, संभा, अच्छाड या ग्रामपंचायतींच्या हद्दीवरील महाराष्ट्र-गुजरात राज्यांच्या सीमा निश्चित करण्याची मागणी होऊ लागली आहे. वेवजी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील सर्वे नं. २०४ चा भूखंड आणि सोलसुंभा ग्रामपंचायतीच्या हद्दीत सर्वे नं. १७३ या दोन भूखंडांवर दोन राज्यांची सीमा आहे. हद्द निश्चित नसल्याने वेवजीमध्ये गुजरात राज्याच्या इमारती उभ्या राहात आहेत. गूगल नकाशात महाराष्ट्र सीमेवरील वेवजी, गिरगाव, गिमाणीया, झाई, अच्छाड, संभा ही गावे गुजरात राज्यात दाखवण्यात आल्याने प्रशासनाकडून चूक दुरुस्त करण्यासाठी पत्रव्यवहार करण्यात आल्याचे सांगण्यात आले. Maharashtra-Gujarat Border| काय आहे प्रकरण? पालघर जिल्ह्यातील वेवजी ग्रामपंचायत महाराष्ट्राच्या हद्दीत येते. मात्र याठिकाणी गुजरातकडून ६०० ते ७०० मीटर घुसखोरी करण्यात आल्याचा आरोप स्थानिकांचा आहे. १९९७ पासून या दोन्ही राज्यांचा वाद सुरू आहे. पालघर जिल्हाधिकारी यांनी महाराष्ट्र व गुजरात राज्य यांच्यातील सीमेची हद्द निशाणी निश्चित करण्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १३३ नुसार कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार मोजणी करण्यात आल्याचं सांगण्यात आलं. हेही वाचा : मोठी बातमी !अमेरिकेनंतर आता ‘या’ देशाने भारतावर लावला ५० % टॅरिफ