Arjun Singh Mohite Patil : राज्यासह सोलापूरात जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी शनिवारी मतदानाची प्रक्रिया पार पडली. यावेळी फोंडशिरस येथे जिल्हा परिषद निवडणुकीतील उमेदवार अर्जुन सिंह मोहिते पाटील यांनी मतदान करताना आपल्या मुलाला सोबत नेले होते. त्या मुलानेच ईव्हीएमचे बटन दाबल्याचे व्हिडिओत दिसून येत आहे. त्याबाबत उपजिल्हाधिकारी संतोष देशमुख यांनी पोलीस कर्मचारी, मतदान केंद्राध्यक्ष यांची चूक आहे, असे सांगून संबंधित मतदार, पोलीस आणि केंद्राध्यक्षांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. उपजिल्हाधिकारी संतोष देशमुख म्हणाले, ही घटना मतदानाची गोपनीयता भंग करणारी आहे. उमेदवाराला अल्पवयीन मुलाला मतदान कक्षात नेण्यापासून रोखण्याची जबाबदारी मतदान अधिकाऱ्यांची होती. मतदान केंद्राबाहेर तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनीही अल्पवयीन मुलाला मतदान केंद्रात प्रवेश करण्यापासून प्रतिबंध करण्यास हवा होता. हा व्हिडिओ पाहता मतदानाची गोपनीयता भंग होण्यापासून रोखण्यासाठी पीठासीन अधिकाऱ्याने पोलीस कर्मचाऱ्यांची मदत घेतल्याचे दिसत नाही, असेही ते म्हणाले. या व्हिडिओमध्ये उमेदवार आपल्या मुलाला ईव्हीएमजवळ घेऊन जाताना आणि त्याला मतदान कसे करायचे हे समजावून सांगताना स्पष्टपणे दिसत आहे. यामुळे अर्जुन सिंह मोहिते पाटील, पोलीस कर्मचारी आणि मतदान केंद्राच्या पीठासीन अधिकाऱ्यावर कारवाई सुरू करण्यात येत आहे, अशी माहिती त्यांनी दिली. दरम्यान, मतदान केल्यानंतर मोहिते पाटील यांनी पत्रकारांना सांगितले की, त्यांच्या मुलाला फक्त मतदान कसे करतात हे पाहायचे होते. मतदान अधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला, पण मी मतदान करत असताना त्याला माझ्या शेजारी उभे राहण्याची परवानगी देण्याची विनंती केली. यात काहीही आक्षेपार्ह आहे असे मला वाटत नाही, असे ते म्हणाले होते.