Smriti Mandhana : भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मंधाना (Smriti Mandhana) गेल्या काही आठवड्यांत वैयक्तिक आयुष्यातील मोठ्या संकटांचा सामना करत आहे. ऐतिहासिक महिला वनडे विश्वचषक विजयानंतर स्मृतीचे संगीतकार पलाश मुच्छल याच्यासोबत लग्न ठरले होते, जे सांगलीत होणार होते. मात्र, लग्नाच्या तयारीदरम्यान अनेक अडथळे आले. लग्नाच्या दिवशी स्मृतीचे वडील श्रीनिवास मंधाना यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पलाश याचीही प्रकृती बिघडली आणि त्यालाही रुग्णालयात दाखल करण्यात आले. या दुहेरी संकटामुळे लग्न अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले. या घटनांनंतर सोशल मीडियावर अफवा पसरल्या आणि नंतर स्मृती आणि पलाश यांनी स्वतंत्रपणे इंस्टाग्राम स्टोरीजवर स्पष्ट केले की, त्यांचे लग्न रद्द झाले आहे. स्मृतीने तिच्या पोस्टमध्ये म्हटले की, गेल्या काही आठवड्यांत खूप अफवा पसरल्या आणि आता पुढे जाण्याची वेळ आली आहे. तिने दोन्ही कुटुंबांसाठी गोपनीयतेची विनंती केली. पलाशनेही आपल्या पोस्टमध्ये भावनिक आवाहन करताना सांगितले की, त्याने वैयक्तिक संबंधातून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे आणि अफवांवर कायदेशीर कारवाई करण्याची धमकी दिली. या प्रकरणाने क्रिकेट आणि मनोरंजन विश्वात खळबळ उडाली यानंतर स्मृतीने सोशल मीडियावर लग्नाशी संबंधित सर्व पोस्ट्स डिलीट केल्या होत्या. A splendid series against Ireland helped Laura Wolvaardt regain her No.1 spot in the ICC Women’s ODI Batting Rankings 🙌 🇿🇦 pic.twitter.com/xSWfFfif5z — ICC (@ICC) December 23, 2025 या वैयक्तिक संकटांवर मात करत स्मृती खंबीरपणे क्रिकेट मैदानावर परतली आहे. सध्या भारतीय महिला संघ मायदेशात श्रीलंकेविरुद्ध ५ सामनांच्या टी-२० मालिकेत व्यस्त आहे. पहिल्या सामन्यात भारताने श्रीलंकेविरुद्ध ८ गडी राखून विजय मिळवला आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत १२१/६ अशी धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरात भारताने १४.४ षटकांतच २ गडी गमावून १२२ धावा करत लक्ष्य गाठले. स्मृतीने या सामन्यात २५ धावा केल्या, तर जेमिमाह रॉड्रिग्सने नाबाद ६९ धावांची खेळी करत सामनावीर पुरस्कार पटकावला. मालिकेतील दुसरा सामना आज होणार आहे. ICC रँकिंगमध्ये स्मृतीला झटका आयसीसीने नुकतीच महिला खेळाडूंची नवीन रँकिंग जाहीर केली असून, स्मृती मंधानाला वनडे फलंदाजी रँकिंगमध्ये मोठा झटका बसला आहे. ती अव्वल स्थानी असताना दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधार लॉरा वॉल्वार्टने तिला मागे टाकत पहिले स्थान पटकावले आहे. लॉराने आयर्लंडविरुद्धच्या मायदेशातील तीन सामनांच्या वनडे मालिकेत सलग शतके झळकावली (१२४ आणि नाबाद १००) आणि ३-० अशी मालिका जिंकली. यामुळे तिचे रेटिंग पॉइंट्स करिअरच्या सर्वोत्तम ८२० पर्यंत पोहोचले असून, स्मृती दुसऱ्या स्थानावर घसरली आहे. लॉरा याआधीही अव्वल स्थानी राहिली आहे. दीप्ती शर्माची ऐतिहासिक कामगिरी दुसरीकडे, भारतीय ऑलराउंडर दीप्ती शर्माने कारकीर्दीतील सर्वोत्तम कामगिरी करत टी-२० गोलंदाजी रँकिंगमध्ये पहिले स्थान पटकावले आहे. श्रीलंके विरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात दीप्तीने ४ षटकांत २० धावा देत १ बळी घेतला, ज्यामुळे तिला ऑस्ट्रेलियाच्या ॲनाबेल सदरलँडला मागे टाकता आले. ही दीप्तीची टी-२० गोलंदाजी रँकिंगमध्ये अव्वल स्थानी पोहोचण्याची हि पहिलीच वेळ आहे. जेमिमाह रॉड्रिग्सचा धमाका टी-२० फलंदाजी रँकिंगमध्ये जेमिमाह रॉड्रिग्सने ५ स्थानांची झेप घेत टॉप-१० मध्ये प्रवेश केला आहे. ती १४ व्या स्थानावरून थेट ९ व्या क्रमांकावर पोहोचली. स्मृती मंधाना टी-२० फलंदाजी रँकिंगमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे, तर शफाली वर्मा दहाव्या क्रमांकावर कायम आहे. या रँकिंगमुळे भारतीय महिला संघाची ताकद अधिक दिसून येते. स्मृती मंधानाने वैयक्तिक आव्हानांवर मात करत मैदानावर लक्ष केंद्रित केले असून, भारतीय संघ श्रीलंका मालिकेत मजबूत स्थितीत आहे. दीप्ती आणि जेमिमाहच्या कामगिरीमुळे संघाला आणखी बळ मिळाले आहे.